Nandurbar Crime News : मलगाव (ता. शहादा) शिवारातील पिपल्यापाडा येथे शेतीच्या वादातून एकाच कुटुंबातील दोन गटांत तुफान हाणामारी झाली. हा वाद विकोपाला जात थेट गोळीबार करण्यात आला.
या गोळीबारात पिता व पुत्र ठार, तर अन्य पाच जण जखमी झाले. जखमींवर नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यात एकाची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांच्या ताफा घटनास्थळी दाखल झाला. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे. (Father and son killed in same family due to agricultural dispute Nandurbar Crime News)
मध्य प्रदेशच्या सीमेलगत असलेल्या मलगाव शिवारातील पिपल्यापाडा येथे भाऊबंदकीत शेतजमिनीचा वाद होता. याच वादातून आज दोन्ही गटांत शेतातच वाद निर्माण झाला. हा वाद विकोपाला जाऊन थेट हाणामारीत रूपांतर झाले. या हाणामारीत तलवारी, विळा, लाकडी दांडके आदी हत्यारांचा वापर करण्यात आला. हाणामारी एवढ्यावरच न थांबता थेट गावठी पिस्तूलातून दोन राउंड फायर करण्यात आले.
या गोळीबारात अविनाश सुकराम खर्डे (वय २६, रा. मलगाव, ता. शहादा) जागीच ठार झाला; तर त्याचे वडील सुकराम कलजी खर्डे (५२) यांचा उपचारांदरम्यान जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. रायसिंग कलजी खर्डे (५४), गणेश दिवाण खर्डे (२४), रामीबाई दिवाण खर्डे (सर्व रा. मलगाव), सुनील राजेंद्र पावरा (वय २३), अरुण राजेंद्र पावरा (दोघे रा. बेडीया, ता. पानसेमल, मध्य प्रदेश) आदी पाच जणांचा जखमींमध्ये समावेश आहे.
यात मृत अविनाश खर्डे यांचे काका रायसिंग कलजी खर्डे यांची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेत १४ संशयितांचा समावेश आहे. शहादा पोलिसांत दोन वेगवेगळ्या तक्रारींची नोंद करण्यात आली. त्यात देवेसिंग खर्डे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित आरोपी सुनील पावरा, गणेश खर्डे, सोनीबाई खर्डे, अरुण पावरा, ललिताबाई पावरा, रमीबाई खर्डे यांनी शासकीय जमिनीच्या मालकी हक्कावरून फिर्यादी देवेसिंग खर्डे यांच्या शेतात वरील संशयित आरोपींना आमच्या शेतात निंदणी का करताहेत, असे विचारून तलवार, विळा व लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
सुनील पावरा याने गावठी कट्ट्याने फिर्यादीचा भाऊ अविनाश याला छातीवर गोळी मारून जागीच ठार केले. काका सुकराम खर्डे यांच्यावरही गोळी झाडून जखमी केले. म्हणून वरील सहाही आरोपींविरुद्ध कलम ३०२ अन्वये खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन पाटील तपास करीत आहेत.
दुसऱ्या घटनेत सोनीबाई खर्डे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी सुकराम खर्डे, अविनाश खर्डे, रायसिंग खर्डे, ममता खर्डे, शकुंतला खर्डे, देवीदास खर्डे, नीलेश खर्डे, जगदीश खर्डे (सर्व रा. मलगाव) या आठही संशयित आरोपींनी फिर्यादीच्या शेतात जमिनीवर कब्जा करण्याच्या उद्देशाने अनधिकृतपणे प्रवेश करून वाद घालून लोखंडी सळी, लाकडी डेंगारे व लाठ्या-काठ्याने मारहाण करून जीवे ठार करण्याचा प्रयत्न केला.
वरील संशयित आरोपींविरुद्ध कलम ३०७ अन्वये दंगलीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रतापसिंह मोहिते तपास करीत आहेत. दरम्यान, घटनास्थळी शहादा पोलिस ठाण्याचे निरीक्षक शिवाजी बुधवंत व अधिकाऱ्यांनी मोठ्या फौजफाट्यासह दाखल होत परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. या वेळी अप्पर पोलिस निरीक्षक नीलेश तांबे, उपविभागीय पोलिस अधिकारी दत्ता पवार यांनीही भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.