धुळे : मालमत्ता कर थकबाकीवरील शास्ती (दंड)त सवलत देण्याचा निर्णय महापालिका आयुक्तांनी घेतल्यानंतर थकबाकी वसुलीला बऱ्यापैकी प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.(Four and half crores accumulated in treasury of Shastimafi scheme last 4 days left Dhule News)
६ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या योजनेचा आतापर्यंत एकूण साडेचार हजारांवर थकबाकीदारांनी लाभ घेतला आहे.
यातून महापालिकेच्या तिजोरीत साडेचार कोटींवर रक्कम जमा झाली आहे. या प्रक्रियेत शंभर टक्के शास्तीमाफी असल्याने तब्बल दोन कोटी ९० लाखांवर रकमेची सूट महापालिकेकडून मिळाली आहे.
मालमत्ता करावरील थकबाकीदारांना मालमत्ता कर भरण्यासाठी सोयीचे व्हावे तसेच महापालिकेच्या तिजोरीतही भर पडून थकबाकीचा बोजा कमी करता यावा यासाठी महापालिकेकडून आयुक्तांनी यंदाही शास्तीमाफी योजना जाहीर केली.
त्यानुसार पहिल्या टप्प्यात ६ ते ११ फेब्रुवारीदरम्यान योजनेचा लाभ देण्यात आला. त्यानंतर पुन्हा या योजनेला मुदतवाढ देण्यात आली. दुसऱ्या टप्प्यात १२ ते २८ फेब्रुवारीदरम्यान लाभ देण्यात येत आहे.
हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!
या योजनेच्या लाभासाठी थकबाकीदारांना मालमत्ता कराचा संपूर्ण भरणा करणे आवश्यक आहे. मालमत्ता करासंबंधी न्यायालयात दावा प्रलंबित असल्यास प्रथमतः दावा न्यायालयातून काढून घेऊन त्याची कागदपत्रे सादर केल्यानंतर या योजनेचा लाभ दिला जात आहे.
पहिल्या टप्प्यात केवळ सहाच दिवस मिळाल्याने अपेक्षित प्रतिसाद दिसून आला नाही. त्यामुळे आयुक्तांनी शंभर टक्के शास्तीमाफी योजनेला मुदतवाढ दिली. त्यानुसार २८ फेब्रुवारीपर्यंत ही योजना सुरू आहे.
साडेचार कोटींवर वसुली
६ फेब्रुवारी ते २३ फेब्रुवारीदरम्यान शास्तीमाफी योजनेचा एकूण चार हजार ७६३ थकबाकीदारांनी लाभ घेतला असून, याद्वारे महापालिकेच्या तिजोरीत चार कोटी ४६ लाख ३१ हजार ७५ रुपये जमा झाले आहेत. दरम्यान, शंभर टक्के शास्ती माफ असल्याने लाभ घेतलेल्या चार हजार ७६३ थकबाकीदारांची तब्बल दोन कोटी ९० लाख ७९ हजार २८६ रुपये शास्ती महापालिकेकडून माफ झाली आहे.
दुसऱ्या अंगाने विचार केला तर सुमारे तीन कोटी रुपयांवर महापालिकेला पाणी फिरवावे लागले आहे. असे असले तरी थकबाकी वसूल होत असल्याचे महापालिकेला समाधान आहे. शास्तीमाफी योजनेचे अद्यापही चार दिवस बाकी असल्याने या चार दिवसांत मोठ्या प्रमाणावर थकबाकीदार योजनेचा लाभ घेतील, अशी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना अपेक्षा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.