Dhule News : जिल्हा परिषद शाळांमधील मुलांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ व्हावी तसेच त्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी ‘भविष्यवेधी शिक्षण प्लस’ नावाचा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता यांच्या संकल्पनेतून तयार होत असलेल्या शैक्षणिक गुणवत्ता व शैक्षणिक धोरणात या उपक्रमाचा समावेश करण्यात आला आहे. (Future Education Plus activities will be implemented in dhule news)
धुळे जिल्हा परिषदेच्या (कै.) यशवंतराव चव्हाण सभागृहात जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, धुळे, शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद धुळे, माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद, धुळे, योजना शिक्षण विभाग, जिल्हा परिषद धुळे, जिल्हा गुणवत्ता कक्ष बैठक व जिल्हा गुणवत्ता आढावा तसेच एकदिवसीय शैक्षणिक गुणवत्ता व शैक्षणिक धोरण कार्यशाळा मुख्य कार्यकारी अधिकारी गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
या कार्यशाळेस डाएटच्या प्राचार्या डॉ. मंजूषा क्षीरसागर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब अकलाडे, प्राथमिक शिक्षणाधिकारी राकेश साळुंखे, माध्यमिक शिक्षणाधिकारी मोहन देसले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी हेमंतराव भदाणे, शिक्षणाधिकारी (योजना) पुष्पलता पाटील, वरिष्ठ अधिव्याख्याता जयश्री पाटील, जयप्रकाश पाटील, अधिव्याख्याता मिलिंद पंडित, चंद्रकांत पवार, डॉ. शिवाजी ठाकूर, गटशिक्षणाधिकारी सुरेखा देवरे, जी. एल. सुरवाडकर, राजेंद्र पगारे, सी. के. पाटील, शिक्षण विस्ताराधिकारी, केंद्रप्रमुख, शिक्षक, शिक्षक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यशाळेत प्रारंभी चारही तालुक्यांतील एकूण दहा शिक्षकांनी नावीन्यपूर्ण उपक्रमांवर आधारित सादरीकरण केले. यात राकेश पाटील (जिल्हा परिषद शाळा, खलाणे), दिनेश धनगर (जिल्हा परिषद शाळा, वरपाडे, शिंदखेडा), विशाल चौरे (जिल्हा परिषद शाळा, रांजणीपाडा), कुंदन माळके (जिल्हा परिषद शाळा, शिरसोले), ललिता देसले (जिल्हा परिषद शाळा, सुरपान, ता. साक्री), अर्चना वाणी (जिल्हा परिषद शाळा, कापडणे), गोकुळ पाटील (जिल्हा परिषद शाळा, निकुंभे), मंगला पाटील (जिल्हा परिषद शाळा, वाडी), रत्नाकर सोनवणे (जिल्हा परिषद शाळा, भरवाडे), कल्पना दशपुते (शिरपूर) यांचा समावेश होता.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
चर्चेनंतर नावीन्यपूर्ण उपक्रमांचा सहभाग शैक्षणिक धोरणात करण्याचे ठरले. या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी गुप्ता यांनी शिक्षण विभागाच्या पायाभूत सुविधांवर आपला भर असू, त्यासाठी १५ कलमी शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले.
‘भविष्यवेधी शिक्षण प्लस’
‘भविष्यवेधी शिक्षण प्लस’ उपक्रमात प्रतितालुका २५ याप्रमाणे शंभर शिक्षकांची निवड करून सप्टेंबरमधील पहिल्या आठवड्यात त्यांना निवासी प्रशिक्षण देण्यात येईल आणि त्यांच्या माध्यमातून इतर शिक्षकांना प्रशिक्षण देऊन हा उपक्रम प्रत्येक शाळेवर राबविला जाईल. त्यासोबतच विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षांची गोडी निर्माण व्हावी, त्यांची तयारी व्हावी यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्हास्तरावर शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाणार आहे.
मेडिकल आणि इंजिनिअरिंग अशा क्षेत्रांमध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थी पुढे जावेत यासाठी ‘सुपर फिफ्टी’ हा उपक्रम राबवून वैद्यकीय आणि अभियांत्रिकी प्रवेशपूर्व परीक्षेची तयारी करून घेतली जाणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातून पन्नास विद्यार्थ्यांची गुणवत्तेवर निवड केली जाईल. क्रीडा क्षेत्रामध्येदेखील उत्कृष्ट खेळ करणाऱ्या विद्यार्थ्यांना आधुनिक प्रशिक्षण देण्याच्या हेतूने ‘स्पोर्टस फिफ्टी’ हा उपक्रम राबविण्याची संकल्पनादेखील श्री. गुप्ता यांनी या वेळी मांडली. शिक्षण विस्ताराधिकारी मनीषा वानखेडे यांनी सूत्रसंचालन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.