Girish Mahajan News : जिल्ह्यातील काही महसूल मंडळांत मागील २१ ते २३ दिवसांपासून पावसाचा खंड पडला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील खरीप हंगामातील पिकांची वाढ खुंटली असून, शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.
त्यांना धीर देण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत सर्वेक्षण करून पीकविम्यासाठी अधिसूचना निर्गमित करण्याची कार्यवाही जलदगतीने केली जाईल, अशी माहिती ग्रामविकास, पंचायतराज व पर्यटनमंत्री तथा पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिली.
ते म्हणाले, की जिल्ह्यात पावसाचा खंड पडल्याने खरीप हंगामातील पिकांची वाढ खुंटली. शेतकरी आर्थिक संकटास सामोरे जात आहे. (Guardian Minister Girish Mahajan statement Notice of Survey for Crop Insurance dhule news )
राज्य सरकारच्या सर्वसमावेशक प्रधानमंत्री पीकविमा योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील दोन लाख ४६ हजार ८४७ शेतकऱ्यांनी एक रुपया भरून कपाशी, उडीद, मूग, सोयाबीन, ज्वारी, मका आदी पिकांचा विमा काढला आहे.
पीकविम्याच्या शासन निर्णयानुसार प्रतिकूल हवामान परिस्थितीच्या निकषांनुसार २५ टक्के नुकसानभरपाईची रक्कम अग्रिम स्वरूपात देण्यात येते.
त्यानुसार जिल्ह्यातील पावसाचा अहवाल संकलित करून ज्या महसूल मंडळांमध्ये सलग २१ दिवस पावसाचा खंड पडल्याने (२.५ मिलिमीटरपेक्षा कमी पाऊस) संबंधित महसूल मंडळातील शेतकऱ्यांच्या पीक सर्वेक्षणाबाबत २५ टक्के अग्रिम स्वरूपात नुकसानभरपाई देण्यासाठी जिल्हा प्रशासन, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी जलद कार्यवाही करावी, अशी सूचना दिली आहे.
विविध सूचना
कृषी विभाग, महसूल विभाग व संलग्न सर्व विभागांनी पाऊस लांबल्यामुळे टंचाईची स्थिती निर्माण होऊ शकते ते लक्षात घेत शेती पिकांच्या नुकसानीबरोबर पाणीटंचाई निवारणासाठी कार्यवाही करावी. तसेच सद्यःस्थितीत धरणातील आरक्षित पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करावे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
अवैधरीत्या पाण्याचा उपसा थांबविण्यासाठी तहसीलदार, ग्रामीण पाणीपुरवठा उपअभियंता, पाटबंधारे विभाग, वीज कंपनीतील अधिकाऱ्यांचे गस्तिपथक नेमावे. तालुकास्तरावर टंचाई निवारण समित्यांनी नियमित बैठका घ्याव्यात, अशी सूचना देत शेती नुकसानीच्या सर्वेक्षणाबरोबरच संभाव्य टंचाई स्थितीसंदर्भात शासनस्तरावरून योग्य ते सहकार्य केले जाईल, असेही पालकमंत्री महाजन यांनी नमूद केले.
अशा उपाययोजना
जिल्ह्यात आजअखेर २६८.५ मिलिमीटर म्हणजे वार्षिक सरासरीच्या ६१.५ टक्के पाऊस झाला आहे. मध्यम व लघु प्रकल्पांमध्ये २२८.१०४ दशलक्ष घनमीटर (४६.८८ टक्के) साठा शिल्लक आहे. पाण्यासाठी ४९ विहिरींचे अधिग्रहण झाले असून, धावडे (ता. शिंदखेडा) येथे टँकरने पाणीपुरवठा होत आहे. भविष्यात टँकर लागण्याच्या शक्यतेने निविदा मागविण्यात येत आहेत. आवश्यक ठिकाणी जलजीवन मिशनअंतर्गत प्रस्ताव तातडीने पूर्ण करण्याची यंत्रणेला सूचना दिली आहे.
चाराटंचाईप्रश्नी वैरण विकास योजनेंतर्गत जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी कार्यालयास २० लाखांची रक्कम उपलब्ध केली आहे. जिल्ह्यात एक हजार ३०६ हेक्टरवरील चारा ५३ हजार ४०७ टन असून, अर्थे (ता. शिरपूर) येथे पाचशे टन मुरघास तयार होत आहे.
खरीप पेरणी क्षेत्रातून उत्पादित चारा २३ लाख ६० हजार ७९३ टन आहे. जिल्ह्यात साडेपाच महिने पुरेल इतका चारा असून, मासिक गरज ४.४८ लाख टन आहे, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.