Dhule News : शहरातील धगधगत्या हॉकर्सच्या प्रश्नात महापालिका आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे-पाटील यांनी उडी घेतली आहे.
त्यांनी हॉकर्सला पांझरा नदीकिनारी असलेल्या मार्गावर जागा निश्चित करून दिली आहे. इशाऱ्यानुसार पथकांनी बुधवारी (ता. ३) सकाळी आग्रा रोड मोकळा करण्यास सुरवात केली. त्यामुळे हॉकर्स रोजच्या जागेऐवजी संरक्षित ठिकाणी गल्ली-बोळात व्यवसायासाठी गेले. (Hawkers did not move to the designated place Municipal Corporation Test Dhule Municipality News)
देवपूरला हॉकर्सने विविध कॉलनी प्रवेशाच्या मार्गावर आडोसा धरला. सायंकाळी आग्रा रोडवर ठिकठिकाणी हॉकर्स पुन्हा परतल्याने पूर्ववत स्थिती निर्माण झाली. महापालिकेने निर्धारित केलेल्या जागेकडे हॉकर्स फिरकले नाहीत.
हॉकर्सची मनधरणी, त्यांची प्रगतिशील मानसिकता करून पांझरा नदीकिनारी असलेल्या रस्त्यावर आणणे ही महापालिकेसाठी कसोटी ठरणार आहे. हॉकर्समध्ये भाजी, फळफळावळ, खाद्यपदार्थांसह विविध लोटगाडीधारक व्यावसायिकांचा समावेश आहे.
त्यांची आग्रा रोडवरील संख्याच आठशेहून अधिक आहे. शहरात रोजगाराचा अभाव असल्याने अशा हॉकर्स नगावबारीपासून मोठा पूल, तेथून गांधी पुतळ्यामार्गे पाचकंदील व पुढे दसेरा मैदानापर्यंतचा आग्रा रोड दुतर्फा व्यापलेला आहे.
त्याचा परिणाम वाहतुकीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. शिवाय वाढत्या लोकसंख्येसह चिंचोळ्या रस्त्यामुळे जीवितास धोका निर्माण झाल्यागत स्थिती आहे.
हॉकर्सला बंदी
महापालिका प्रशासकपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर आयुक्त अमिता दगडे-पाटील यांनी हॉर्कसला अग्रवाल विश्राम भवनापासून साक्री रोडकडे आणि मोठ्या पुलाखालून हत्ती डोहाकडे असलेल्या पांझरा नदीकाठच्या रस्त्यावर एका रांगेत व्यवसायासाठी जागा निर्धारित केली आहे.
त्यानुसार हॉकर्सला बुधवारी (ता. ३) या जागेवर गेले नाहीत, तर लोटगाडीसह साहित्य जप्तीचा इशारा देण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर आग्रा रोडवरील मुख्य बाजारपेठेत बुधवारपासून हॉकर्स बंदी केली.
आयुक्तांच्या आदेशाची सकाळपासून महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलिस यंत्रणेच्या पथकांनी संयुक्तपणे अंमलबजावणी सुरू केली. त्याचा परिणाम आग्रा रोड मोकळा झाला.
कारवाईचा धाक
लोटगाडीधारक आणि रस्त्याच्या कडेला व्यवसाय करणाऱ्या पथारीधारकांनी आग्रा रोडवर व्यवसाय थाटला नाही. या मार्गावर पोलिस वाहन होते. मनपा आयुक्तांचा आदेश असल्याने कुणीही लोटगाडी लावू नये, अशी सूचना पोलिस देत होते. संपूर्ण आग्रा रोडने मोकळा श्वास घेतला.
दुपारपर्यंत एकही लोटगाडी या भागात दिसली नाही. कारवाईच्या धाकाने हॉकर्स रोजच्या जागेऐवजी संरक्षित ठिकाणी गल्लीबोळात व्यवसायासाठी गेले. देवपूरला हॉकर्सने विविध कॉलनी प्रवेशाच्या मार्गावर आडोसा धरला.
आग्रा रोडवरून हॉकर्स गायब दिसले; परंतु सायंकाळी आग्रा रोडवर ठिकठिकाणी हॉकर्स पुन्हा परतल्याने पूर्ववत स्थिती निर्माण झाली. महापालिकेने निर्धारित केलेल्या जागेकडे हॉकर्स फिरकले नाहीत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.