Dhule News : तालुक्याच्या अतिदुर्गम आदिवासी भागात सिकलसेलची लक्षणे आढळलेल्या मुला-मुलींची संख्या वाढली असून, त्यातील सिकलसेलने ग्रस्त आणि सिकलसेल वाहकांचे प्रमाण निश्चित करण्याचे काम सुरू आहे. (Increase in number of boys and girls with symptoms of sickle cell in Shirpur taluka jalgaon news)
तरुणाईचा मोठा भाग सिकलसेलसारख्या गंभीर विकाराने ग्रस्त असल्याच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागातर्फे समुपदेशनासह उपचारांना गती देण्यात आली आहे. मुकेश पटेल चॅरिटेबल ट्रस्टतर्फे तालुक्याच्या आदिवासी भागातील जिल्हा परिषदेच्या शाळा आणि माध्यमिक शाळांमध्ये विद्यार्थी-विद्यार्थिनींची सिकलसेल चाचणी घेण्यात येत आहे. त्यासाठी पंचायत समितीच्या आरोग्य विभागाचे सहकार्य लाभले आहे.
आरोग्य विभागाची आठ प्राथमिक केंद्रे आणि ५७ उपकेंद्रे यांच्या मदतीने ही तपासणी सुरू आहे. आजअखेर रोहिणी, सांगवी, वकवाड येथील तपासणी पूर्ण झाली असून, बोराडीसह उर्वरित चार ठिकाणी तपासणी सुरू आहे.
चारही केंद्रांतर्गत सहा हजार ८४ जणांची तपासणी करण्यात आली. त्यात ४८९ जणांमध्ये सिकलसेलची लक्षणे आढळली आहेत. उर्वरित केंद्रांतर्गत तपासणी पूर्ण झाल्यानंतर ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. २०१० ते २०२३ या कालावधीत तालुक्यात एकूण ३८० सिकलसेल पीडित असून, चार हजार ५५२ वाहक असल्याचे स्पष्ट झाले आहे.
हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
काय आहे सिकलसेल
पूर्णत: आनुवंशिक आजार. निरोगी माणसाच्या लाल रक्तपेशी गोलाकार असतात, तर सिकलसेल रुग्णाच्या लाल रक्तपेशी विळ्यासारख्या (सिकल) वेड्यावाकड्या आकाराच्या दिसतात. रुग्णांच्या हिमोग्लोबीन प्रथिनात दोष असून, त्यामुळे रक्तपेशींचे आयुष्य कमी होते व त्या लवकर फुटतात. त्यामुळे रक्त कमी होऊन अॅनिमिया (रक्तक्षय) होतो. रुग्ण विविध गंभीर स्वरूपाच्या आजारांना बळी पडतो.
पीडित आणि वाहक
माता-पित्यांकडून अपत्यांकडे हा आजार जातो. हा दोष दोन प्रकारांत आढळतो. त्यात पहिला ‘सिकलसेल वाहक’ (कॅरिअर) असून, दुसरा म्हणजे ‘सिकलसेल पीडित’ (सफरर)असतो. वाहक व्यक्ती ही केवळ आजाराची वाहक असते. या व्यक्तीत आजाराची कोणतीच लक्षणे दिसत नाहीत.
चाचणीतून निदान
रक्ताची प्रयोगशाळेत चाचणी केल्यानंतर या आजाराचे निदान करता येते. ‘सिकलिंग गुणधर्म’ आजाराच्या वाहक आणि पीडित या दोन्ही प्रकारच्या व्यक्तींच्या रक्तात हा आढळतो. त्यासाठी रक्ताची ‘सोल्युबिलिटी टेस्ट’ केली जाते. मात्र व्यक्ती वाहक आहे की पीडित, हे ओळखण्यासाठी रक्ताची ‘इलेक्ट्रोफोरेसिस टेस्ट’ ही आणखी एक चाचणी करावी लागत असून, ती सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये केली जाते.
लक्षणे
सिकलसेलच्या रुग्णांमध्ये शारीरिक थकवा, सांधेदुखी, रक्तक्षय, डोळे पिवळसर दिसणे अशी लक्षणे प्रारंभी आढळतात. ऋतू बदलांमध्ये या आजाराची तीव्रता वाढते. व्यक्तीला थंडी ताप किंवा जुलाब-उलट्यांसारखा आजार असल्यास किंवा अतिश्रम केल्यास शरीराला अतिरिक्त प्राणवायूची गरज भासते.
प्राणवायूच्या कमतरतेमुळे सिकलसेल रुग्णाच्या शरीरातील सिकलिंग प्रक्रिया वाढते. वेड्यावाकड्या सिकलसेल रुग्णाच्या सूक्ष्म रक्तवाहिन्यांमध्ये अडकून तेथील रक्तपुरवठा खंडित होतो. त्या भागात रुग्णाला प्रचंड वेदना होतात. त्वरित वैद्यकीय उपचार मिळाले नाहीत, तर रुग्ण दगावण्याचीही शक्यता असते. ही लक्षणे रुग्णाला वयाच्या तिसऱ्या किंवा चौथ्या वर्षांपासून दिसू लागतात. वयासोबत लक्षणांची तीव्रताही वाढते.
उपचार
आनुवंशिक आजार असल्यामुळे सिकलसेलवर निश्चित औषधोपचार नाहीत. पीडित श्रेणीतील रुग्णांना रक्त देणे हा एकच मार्ग असतो. ती सोय धुळे येथील वैद्यकीय महाविद्यालयात आहे. त्यासाठी रुग्णांना धुळ्यापर्यंत मोफत प्रवासाची सुविधा दिली जाते. अशा रुग्ण विद्यार्थ्यांना परीक्षेत वीस मिनिटे वेळ वाढवून दिला जातो.
याव्यतिरिक्त फॉलिक अॅसिडसारखी औषधे प्राथमिक आरोग्य केंद्रातून दिली जातात. नवे सिकलसेलग्रस्त निर्माण न होऊ देणे हा एकमेव उपाय या आजाराचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी उपलब्ध आहे. त्यासाठी सिकलसेलग्रस्तांचे समुपदेशन केले जाते. ज्या शरीरसंबंधांतून होणारी संतती सिकलसेलची रुग्ण असेल, असे शरीरसंबंध टाळण्यासाठी अशा व्यक्तींनी एकमेकांशी विवाह न करण्याचा सल्ला दिला जातो.
नव्या पिढीची सकारात्मकता
वेळीच रक्ताची चाचणी करून घेतल्यास या आजाराचे निदान व त्यावर उपचार शक्य होतात. आदिवासी समाजातील शिक्षणाच्या प्रवाहात असलेल्या पिढीकडून याबाबत सकारात्मकता दाखवण्यात येत आहे. लग्नापूर्वीच सिकलसेल चाचणी करून घेण्यासाठी जवळच्या आरोग्य केंद्रात जाणाऱ्या युवक- युवतींची संख्या वाढली आहे.
"अधिकाधिक चाचण्यांद्वारेच या आजाराची रुग्णसंख्या निश्चित करून उपाययोजना करता येते. मुकेश पटेल ट्रस्टने राबवलेल्या उपक्रमांच्या धर्तीवर इतर शैक्षणिक संस्थांनीही आपली वसतिगृहे, शाळांमध्ये विद्यार्थ्यांची तपासणी करून घ्यावी. त्यांना आरोग्य विभागातर्फे संपूर्ण सहकार्य केले जाईल. प्रत्येक आरोग्य केंद्रावर ही चाचणी करण्याची सुविधा असून, औषधोपचारांचीही सुविधा दिली आहे." - डॉ. प्रसन्न कुलकर्णी, तालुका आरोग्य अधिकारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.