Dhule Agriculture News : परिसरातील कपाशी पिकावर मिलीबग व लाल्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून, खर्चदेखील निघणे जिकिरीचे झाले आहे.
न्याहळोदसह कौठळ, तामसवाडी, जापी, शिरडाणे, हेंकळवाडी परिसरात मोठ्या क्षेत्रावर लागवड करण्यात आलेल्या कपाशी पिकावर मिलीबग आणि लाल्या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे .(Infestation of mealybug Lalya disease on cotton dhule news)
त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.मेच्या शेवटच्या आठवड्याला लावलेला कापूस व जुलैच्या शेवटी उशिरा झालेल्या पावसामुळे काही शेतकऱ्यांनी लागवड केलेले कपाशी क्षेत्र पूर्णतः लाल पडले असून, लागवडीचा खर्चदेखील निघणे अवघड आहे.
सुरवातीला पाऊस झाल्यानंतर केलेली पेरणी, त्यानंतर काढता पाय घेतलेल्या पावसाने तब्बल महिना ते सव्वा महिन्याच्या विश्रांतीनंतर पुनरागमन केले खरे, परंतु त्याचा काहीही उपयोग न झाल्याने खर्च निघणेदेखील अवघड झाले आहे.
बळीराजाने पैन् पै जोडलेला पैसा लावून हातातून जात असलेला खरीप हंगाम वाचविण्याचा शेतकऱ्याने प्रयत्न केला. कोळपणी, निंदणी खत वेळेवर देऊनसुद्धा निराशा हाती आली आहे.
शेतकरी संभ्रमात
यंदा शेतकरी वर्गाने मशागतीपासून तर बी-बियाणे, औषधी, खते आदींवर मोठा खर्च करून आपली सर्व गुंतवणूक शेतात केलेली होती.
तथापि, पावसाने दडी मारल्यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला जातो की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली असताना पुन्हा पाऊस परतल्याने काही प्रमाणात का होईना शेतकरी वर्गाची मेहनत व पैसे वाचल्याची चिन्हे दिसत असताना आता त्यावर विविध रोगांनी आक्रमण केले आहे. त्यात मिलीबग आणि लाल्या यांचे संकट मोठे आहे.
आधीच खंडित पावसामुळे कपाशी, मका, सोयाबीन या पिकांच्या उत्पादनात घट येणार असल्याच्या पार्श्र्वभूमीवर आता आलेल्या पावसाने या पिकांना जीवदान मिळाले आहे; परंतु रोगाच्या प्रादुर्भावाने उभ्या पिकांचे भवितव्य खराब असल्याचे चित्र न्याहळोदसह परिसरात दिसत आहे.
परिसरात कपाशी पिकांची लागवड प्रचंड प्रमाणात असून, मुख्य पीक म्हणून सोयाबीन, मका व कपाशीची लागवड केलेली असते. मात्र कपाशीवर थ्रिप्स, मिलीबग व लाल्या रोगाने तसेच झाडावरील रस शोषक किडीने मोठ्या प्रमाणावर थैमान घातलेले असून, शेतकरी वर्ग कमालीचा हैराण झालेला दिसून येत आहे. नेमकी काय उपाययोजना करावी या संभ्रमात तो पडला आहे.
पिके तरली, पण रोगांचा प्रादुर्भाव
गेल्या आठवड्यात चांगला पाऊस झाला. या पावसाने पिके तरली, मात्र पाऊस पाहिजे तसा जोरदार नसल्याने उभ्या पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. उत्पन्नात घट येणार हे निश्चित झाले आहे.
यापूर्वी पावसाने दडी मारल्याने चवळी, मूग, उडीद, मका, सोयाबीन पिकांवर परिणाम होऊन ही पिके शेतकऱ्यांच्या हातातून निघून गेल्याने मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे कापसावरील रोग कमी होण्यासाठी शेतकऱ्यांनी फवारणीवर जोर दिला असून, तरीदेखील रोगावर अटकाव होत नसल्याने खरीप हंगाम पूर्ण वाया गेला आहे.
काय आहे मिलीबग?
कपाशीच्या झाडावर शेंड्यापासून ते जमिनीलगतच्या खोडापर्यंत पांढऱ्या रंगाच्या अत्यंत बारीक किडीचा प्रादुर्भाव असतो. यामुळे पाने गळणे, कैऱ्यांची वाढ खुंटणे, तसेच झाडांची पाने पिवळी व लाल पडून झाड वाळणे किंवा काळवंडतात. यातून उत्पादनावर विपरीत परिणाम होतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.