Nandurbar : कडाक्याच्या उन्हाचा फटका नवीन लागवड केलेल्या केळीबागांना बसत असून, कोवळ्या केळी रोपांच्या संरक्षणासाठी बागांमध्ये सन अर्थात तागाची लागवड करून रोपांचे उन्हापासून संरक्षण आणि हिरवळीचे खत म्हणून तागाचा दुहेरी उपयोग शेतकरी करीत आहेत. (Jute cultivation in banana plantation double benefit Farmers tend towards jute as green manure Nandurbar)
एप्रिल आणि मे महिन्यात केळीची लागवड
उत्तर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात केली जाते. त्यात जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणावर केळीची लागवड होत आहे. मात्र या वर्षी तापमान ४५ अंश सेल्सिअसपर्यंत गेल्याने नवीन लागवड केलेल्या केळीच्या रोपांमध्ये उन्हामुळे मरचे प्रमाण अधिक असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे.
मात्र जिल्ह्यात बहुतांश शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या कोवळ्या केळीच्या रोपांचे उन्हापासून बचाव आणि नंतर त्याचाच खत म्हणून उपयोग या दुहेरी गोष्टी लक्षात घेऊन केळी रोपांच्या आजूबाजूला ताग (सन) लागवड केली आहे.
वाढत्या तापमानाचा फटका
नंदुरबार जिल्ह्यात तापमानाचा पारा ४५ अंश सेल्सिअसपर्यंत गेला आहे. या वाढत्या तापमानाचा फटका नवीन लागवड केलेल्या केळीला बसत असल्याचे चित्र आहे. नवीन लागवड केलेल्या केळीबागांमध्ये उन्हाळ्यामुळे मरचे प्रमाण अधिक दिसून येत आहे.
यावर केळीचे उन्हापासून संरक्षण आणि हिरवळीचे खत म्हणून केळीच्या रोपाच्या आजूबाजूला शेतकऱ्यांनी तागाची लागवड केली असून, यातून शेतकऱ्याला सेंद्रिय खत आणि केळीचे उन्हापासून रक्षण असे दोन्ही बाबींचा फायदा होत आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
तागाचे फायदे अन् उत्पादनात वाढ
जमिनीतील सेंद्रिय खतांचे प्रमाण कायम ठेवण्यासाठी तागाचे पीक लावणे गरजेचे आहे. हमखास उत्पादनात वाढ झाल्याचे शेतकरी सांगतात. कमी कालावधीत जलद वाढणारे आणि भरपूर पाला देणारे पीक आहे.
द्विदल वर्गातील असल्याने वातावरणातील नत्र कमी कालावधीत घेण्याची क्षमता या पिकात असल्याने नत्र जमिनीत स्थिर होण्यास मदत होते.
तागाच्या पिकापासून हेक्टरी ३० टनांपेक्षा जास्त बायोमास मिळत असल्याने त्याच्यासाठी विशेष उत्पादन तंत्र वापरण्याची गरज नाही. जमिनीतील अन्नद्रव्य, ह्यमस, सेंद्रिय कर्ब आणि नत्र वाढविण्यासाठी तागाचा फायदा होतो.
दीड महिन्याच्या कालावधीत विशेषतः नत्रयुक्त अन्नद्रव्य उपलब्ध होतात. केळीट्या वाढीच्या काळात हमखास हे अन्नद्रव्य उपयोगी ठरते. जास्तीत जास्त अन्नद्रव्य थोड्याच कालावधीत तागानंतरच्या पिकाला उपलब्ध होते. त्याकरिता जमिनीमध्ये हिरवळीच्या खतासाठी तागाचे पीक घ्यावे.
तागाच्या फांद्या कोवळ्या आणि लुसलुशीत असल्याने, तंतुमय पदार्थांचे प्रमाण कमी असल्याने कुजण्याची प्रक्रिया जलद होते. पिकांची मुळे खोलवर जात असल्याने जमिनीच्या खालच्या थरातील अन्नद्रव्ये शोषून घेतली जातात आणि पीक गाडल्यानंतर वरच्या थरात मिसळली जातात.
शेतकऱ्यांमध्ये संशोधनवृत्ती
शेतीत नवनवीन प्रयोग करून अधिकाधिक उत्पादन घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल असतो. शिवाय जमिनीसाठी पोषक असलेल्या आणि उन्हापासून रक्षणासाठीही महत्त्वाचे असलेल्या अशा दुहेरी फायद्याच्या तागलागवडीचा प्रयोग जिल्ह्यात होत असल्याने शेतकऱ्यांची संशोधनशीलता यातून समोर येत आहे.
"आपल्या शेतात केळी लागवडीच्या दहा दिवसांपूर्वी सन (तागाची) लागवड केली आहे. ज्या ठिकाणी तागाची लागवड केली आहे तेथे केळीच्या रोपांच्या मरचे प्रमाण कमी असून, यातून शेतकऱ्यांचे होणारे नुकसान कमी होत आहे. तीन एकर क्षेत्रात चार हजार रोपे लागवड केली आहेत. केळी आणि सन लागवडीला आतापर्यंत एक लाख रुपये खर्च झाला आहे."
-जगदीश पाटील, शेतकरी, कोरीट, ता. नंदुरबार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.