Prof. P. D. Dalal  esakal
उत्तर महाराष्ट्र

विरक्त शिक्षणमहर्षी : प्रा. पी. डी. दलाल

प्रा. पी. डी. दलाल सरांनी त्यांच्या आयुष्यातील सुमारे सात दशकांचा कालावधी हा शिक्षणक्षेत्र घालविला; इतके त्यांचे शिक्षणावर प्रेम होते. यात विद्यावर्धिनी सभेचे (१९६५) ते संस्थापक-सदस्य होते.

सकाळ वृत्तसेवा

"तत्कालीन धुळे जिल्ह्यात जनसंघ, भाजपची पाळेमुळे रोवणारे, माजी आमदार प्रा. पी. डी. दलाल यांचा रविवारी (ता. २६) प्रथम स्मृतिदिन. त्यानिमित्त त्यांच्या कार्यावर टाकलेला प्रकाशझोत. धुळे येथील हिरे भवनात रविवारी सायंकाळी पाचला ज्येष्ठ अभिनेते राहुल सोलापूरकर यांचे ‘स्वातंत्र्यसंग्रामातील स्त्रियांचे योगदान’ या विषयावर व्याख्यानही यानिमित्ताने होत आहे." - प्रा. डॉ. देवेंद्र विसपुते, धुळे

(Latest Marathi Article On Prof. P. D. Dalal)

प्रा. पी. डी. दलाल सरांनी त्यांच्या आयुष्यातील सुमारे सात दशकांचा कालावधी हा शिक्षणक्षेत्र घालविला; इतके त्यांचे शिक्षणावर प्रेम होते. यात विद्यावर्धिनी सभेचे (१९६५) ते संस्थापक-सदस्य होते. स्त्रीशिक्षण संस्था, धुळे एज्युकेशन सोसायटी आणि इतर अनेक शैक्षणिक संस्था, सामाजिक संघटना, सांस्कृतिक संस्था यांच्या स्थापना, विकास आणि संवर्धनात त्यांनी मोलाची भूमिका बजावली.

इतके वर्षे शिक्षण क्षेत्रात कार्य केल्यानंतरही शेवटपर्यंत विरक्तच राहिले. आपल्या पदाचा गैरफायदा न घेता शेवटपर्यंत ते आदर्शवादी विचारांनीच काम करीत राहिले. त्यांची मुलगी व जावई यांनी दुसऱ्या महाविद्यालयांमध्ये नोकरी केली. इतर शिक्षण महर्षींप्रमाणे त्यांनी त्यांच्या शिक्षण संस्थांमध्ये नातेवाइकांचा भरणा केला नाही. (स्व.) दलाल सरांची शिक्षण क्षेत्रातील कामगिरी खानदेशात अजोड मानली पाहिजे.

पुणे विद्यापीठात त्यांनी १९६१-१९८० अशी सुमारे दोन दशके विविध अधिकार पदांवर काम केले. त्यात १९६८ ते १९७५ या काळातील वाणिज्य विभागाचे अधिष्ठाता या नात्याने दिलेल्या योगदानाबद्दल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने त्यांचा १९ ऑगस्ट २०१५ ला मानपत्र देऊन सन्मान केला. अभ्यासक्रमांची रचना, अध्ययन, अध्यापन, आणि संशोधन कार्य अधिक व्यापक आणि मूलगामी करणे; तसेच रोजगार स्वयंरोजगारभिमुख होण्यासाठी त्या काळात जोरकस असे प्रयत्न केले होते.

त्यासाठी तत्कालीन कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांच्या हस्ते त्यांचा हा सत्कार करण्यात आला. ‘अॅडव्हान्स अकाउंटन्सी’ या विषयावर त्यांची जबरदस्त पकड होती. त्यांनी तब्बल सहा महाविद्यालयांत हा विषय शिकविला. यात धुळ्याचे विद्यावर्धिनी महाविद्यालय, एस. एस. व्ही. पी. एस. व जयहिंद महाविद्यालय, अमळनेरचे प्रताप महाविद्यालय तसेच चाळीसगाव व मालेगाव येथील महाविद्यालयांचा समावेश आहे. (latest marathi news)

पुणे विद्यापीठाच्या अधिसभेवर (सिनेट) त्यांची शिक्षक प्रतिनिधी म्हणून निवड झाली. वास्तविक ते कोणत्याच महाविद्यालयातील कायम आस्थापनेवरील प्राध्यापक नव्हते. एकूणच अपवाद म्हणून त्यांची ही निवड झाली होती. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अधिसभेवर राज्यपाल नियुक्त प्रतिनिधी म्हणून त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली.

धुळे एज्युकेशन सोसायटीच्या संवर्धनात त्यांनी विविध पदांवर राहून महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. १९६५ मध्ये स्थापन झालेल्या विद्यावर्धिनी सभा या शिक्षण संस्थेच्या स्थापनेत त्यांचा सिंहाचा वाटा होता. विद्यावर्धिनीत प्रारंभी गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष आणि २०१६ पासून २०२३ पर्यंत अध्यक्षपदही त्यांनी भूषविले. विद्यावर्धिनी महाविद्यालयाचा प्रभारी प्राचार्य म्हणून २०२२ पासून दीड वर्ष माझा त्यांच्याशी सातत्याने संबंध आला.

या वेळी एक प्रकारचा ठाम, करारीपणा आणि तितकाच मृदू स्वभाव असा संमिश्र अनुभव आला. पुणे विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणांवर असताना त्यांनी खानदेशातील आदिवासी ग्रामीण भागातील महाविद्यालयांना मान्यता मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. विद्यार्थी म्हणून त्यांच्या शिक्षणाचा ग्राफही लक्षवेधी आहे. १९४३ मध्ये त्यांनी मॅट्रिक परीक्षा इंग्रजी विषयात विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण केली.

१९४३ ते १९४७ यादरम्यान वर्धा येथे जी. एस. कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेतले. १९५१ मध्ये ते पहिल्याच प्रयत्नात सी. ए. ची परीक्षा उत्तीर्ण झाले. प्रारंभी त्यांनी जळगावचे प्रख्यात आर. ए. डी. आर. राणे यांच्याकडे १९४८-५१ यादरम्यान सीए आर्टिकलशिप पूर्ण केली. त्यानंतर १९५१ मध्ये धुळे इथे व्यवसायास सुरवात करून पुढील ७० ते ७२ वर्षे सीए (सनदी लेखापाल) म्हणून कार्यरत राहिले.

सुरवातीला त्यांनी ‘दलाल अॅन्ड वरेरकर’ या नावाने सीए फर्म चालवली. नंतर पुढे स्वतःची ‘पी. डी. दलाल अॅन्ड कंपनी’ ही फर्म स्थापन केली. सनदी लेखापाल म्हणून व्यवसाय करताना त्यांनी कधीही कोणतीही तडजोड केली नाही. एकूणच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची समोरच्यावर प्रचंड छाप पडत असे. दलाल सरांची विचारसरणी पुरोगामी होती. कर्मकांडांना त्यांनी आयुष्यात कधीच स्थान दिले नाही.

मरणोत्तर देहदान करून त्यांनी हे पुरोगामी विचार शेवटपर्यंत जपले. जातीभेद नष्ट करण्यासाठी आणि सामाजिक न्याय- समता प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी कमल दाजी सौंदाणकर यांच्याशी १९५३ मध्ये जाणीवपूर्वक आंतरजातीय विवाह केला. विवाह सोहळ्यातील ऑल इंडिया रेडिओचा ऑर्केस्ट्रा हे त्या वेळचे आकर्षणाचे केंद्र होते.

स्वभावाने ते प्रचंड जिद्दी होते. पण तितकेच नम्रही होते. असंख्य संस्थांनी त्यांचा मानपत्र देऊन सत्कार करताना त्यांच्या कार्याची पावती दिली. विद्यावर्धिनी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघाने १९ जून १९२२ ला विद्यावर्धिनी भूषण पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार केला. या वेळी त्यांचे मानपत्र लिहिण्याची संधी मला मिळाली होती.

विधान परिषदेचे सदस्य

समाजकारण, शिक्षण याबरोबरच आदरणीय दलाल सरांनी काही प्रमाणात राजकारणातही महत्त्वाची भूमिका बजावली. धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून १९६८ मध्ये त्यांनी तिरंगी लढतीत विधान परिषदेचे सदस्यत्व मिळविले. या निवडणुकीत त्यांनी व्यंकटराव रणधीर यांच्यासारख्या मातब्बर राजकारण्याचा पराभव केला. त्यामुळे हा राज्यभर चर्चेचा विषय बनला होता.

त्यांच्या शैक्षणिक योगदानाची दखल घेऊन ‘विद्यावर्धिनी’च्या नियामक मंडळाने महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेला त्यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला.

दलाल सरांच्या आयुष्यातील क्षणचित्रे

- चार्टर्ड अकाउंटंट (CA) ची परीक्षा १९५१ मध्ये पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण.

- १९६५ मध्ये विद्यावर्धिनी सभेच्या स्थापनेत सिंहाचा वाटा. या संस्थेत विविध पदे सांभाळली.

-प्रख्यात सनदी लेखापाल ‘पी. डी. दलाल आणि कंपनी’ची खानदेशात चमकदार कामगिरी.

- भारत सरकारतर्फे १९८० ते १९८२ या काळात बँक ऑफ महाराष्ट्र आणि १९८९ ते १९९५ या काळात कॉर्पोरेशन बँकेच्या संचालक मंडळावर नियुक्ती. तसेच आयुर्विमा महामंडळ (एलआयसी) च्या नाशिक विभागीय आणि

- मुंबईच्या क्षेत्रीय कार्यालयात प्रतिनिधी म्हणून निवड.

-१९६८ ते १९७४ यादरम्यान विधान परिषद सदस्य.

- विविध सामाजिक, शैक्षणिक आणि वित्तीय संस्थांमध्ये आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा. धुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक (१९७५ -१९८०)

- रोटरी क्लब धुळे, एमआयडीसी, एमटीडीसी, महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स अशा विविध संस्थांमध्ये मोलाची कामगिरी. मुंबई उच्च न्यायालयातर्फे धुळे जिल्हा न्यायालयाच्या ए. डी. आर. कोर्टचे पॅनल न्यायाधीश म्हणून कार्य. धुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत लक्षवेधी कामगिरी.

- ‘निरपेक्ष’ आणि ‘आत्मकथा माझीही’ ही आत्मचरित्रे प्रकाशित. तसेच ‘प्रकल्पाची यशोगाथा’ हे छायाचित्ररूपी पुस्तक प्रकाशित.

धुळे एज्युकेशन सोसायटीत विविध पदांवर कार्य.

१९६० ते १९८० या कार्यकाळात पुणे विद्यापीठाच्या वाणिज्य विभागाचे अधिष्ठाता, कार्यकारिणी सदस्य, अधिसभा सदस्य, विद्वत्तसभा सदस्य, अभ्यास मंडळ अध्यक्ष अशा महत्त्वाच्या प्राधिकरणांवर कार्य.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: भारताचा वर्षातील शेवटच्या T20I सामन्यात विक्रमी विजय! द. आफ्रिकेविरुद्ध मालिकाही जिंकली

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

Rohit Sharma दुसऱ्यांदा झाला बाबा! रितिकाने दिला मुलाला जन्म; हिटमॅन आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार?

Record Breaker: Sanju Samson ची शतकासह विश्वविक्रमाला गवसणी; तिलक वर्मासह नोंदवले मोठे विक्रम अन्... Video

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

SCROLL FOR NEXT