Dhule News : महापालिका हद्दीत जनावरे पाळायची असतील तर त्यासाठी महापालिकेची अधिकृत परवानगी घ्यावी, अशी परवानगी नसेल तर संबंधित पशुपालकांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा महापालिकेतर्फे देण्यात आला आहे.
येत्या सात दिवसांत याबाबत पशुपालकांनी कार्यवाही करावी, असा अल्टिमेटमही देण्यात आला आहे. (legal action will be taken by Municipal Corporation against animal keeper dhule news)
धुळे शहरात वर्षभर मोकाट गुरांचा प्रश्न वर्षानुवर्षे कायम आहे. सद्यःस्थितीतही शहरातील अनेक प्रमुख रस्ते, चौकांमध्ये मोकाट गुरे सर्वत्र पाहायला मिळत आहेत. ही जनावरे रस्त्यांवर दिसू नयेत यासाठी महापालिकेतर्फे अनेकदा उपाययोजना करण्याचा प्रयत्न झाला पण त्याचा काहीही उपयोग झाल्याचे दिसत नाही.
शहरातील पशुपालकांनी आपल्या मालकीची जनावरे सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर भटकू देऊ नयेत या अनुषंगाने महापालिकेने यापूर्वी पशुपालकांना नोटीस बजावली होती तसेच सूचना देऊन दंडात्मक कारवाई करण्याचे सूचित केले होते. असे असूनही बहुसंख्य मालकांची जनावरे रस्ते, चौकात भटकताना दिसतात.
त्यामुळे रहदारीस अडथळा होऊन दुर्घटनेची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आपल्याकडील जनावरांची संख्या वर्णनासह महापालिकेकडे नोंद करून रीतसर परवानगी घ्यावी. स्वमालकीच्या जागेवरील गोठ्यात जनावरे बांधावीत. आसपासच्या लोकांना उपद्रव होईल किंवा धोका पोचेल अशा जागेवर कोणतेही जनावर पाळता येणार नाही.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
जनावरांसाठी गोठ्याची परवानगी घेणे आवश्यक आहे. महापालिकेची रीतसर परवानगी घेतल्याशिवाय जनावरे पाळणे बेकायदा आहे. त्यामुळे परवानगी नसेल तर संबंधित पशुपालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा महापालिका सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे देण्यात आला आहे.
सात दिवसांचा अल्टिमेटम
येत्या सात दिवसांत पशुपालकांनी याबाबतची कार्यवाही करावी, अन्यथा यापुढे कोणत्याही प्रकारचे जनावर सार्वजनिक रस्त्यावर, जागेवर भटकताना आढळल्यास ते पकडून शहरातील मालेगाव रोडवरील खानदेश गोसेवाश्रमांतर्गत गो-शाळेत पाठविले जाईल. जनावर मालकांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात येईल किंवा मुंबई प्रांतिक महापालिका अधिनियमातील तरतुदीनुसार कारवाई केली जाईल.
महापालिकेची परवानगी न घेतल्यास, जनावर सार्वजनिक रस्त्यावर दोरीने बांधून ठेवल्यास, भटकताना दिसल्यास ते पकडून पोलिस अधिकाऱ्यांच्या स्वाधीन करून त्यांच्या सूचनांनुसार कारवाई होईल.
महापालिकेतर्फे वारंवार सूचना देऊनही पशुपालक याकडे दुर्लक्ष करत असल्याने यापुढे मोकाट जनावरांचा मनपातर्फे योग्य तो बंदोबस्त करण्यात येईल, असे मनपाच्या नोटिशीत म्हटले आहे.
महापालिकेच्या या इशाऱ्यानंतर पशुपालक आपापल्या जनावरांबाबत उपाययोजना करतात की नेहमीप्रमाणे दुर्लक्ष करतात व त्यावर धुळे महापालिका कारवाई करणार की केवळ इशारा देऊन मोकळे होणार याकडे आता लक्ष असणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.