Nandurbar Leopard Attack : रांझणी (ता. तळोदा) गावापासून अवघ्या एक किलोमीटरवर असलेल्या श्रीकृष्ण गोशाळेसमोर बिबट्याने दर्शन दिले. १५ ते २० मिनिटे बिबट्या गोशाळेसमोर ठाण मांडून होता. त्यामुळे गोशाळेच्या मालकासह रखवालदार जीव मुठीत धरून बसले होते.
भेदरलेल्या अवस्थेत त्यांनी मोबाईलवरून गावातील तरुणांना संपर्क करत बिबट्याच्या तावडीतून गायीची व आपली सुटका केली.
मात्र या घटनेमुळे रांझणीसह परिसरात पुन्हा एकदा बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. वन विभागाने याबाबत ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे. (Leopard found in front of Shri Krishna Gaushala in nandurbar news)
तळोदा तालुक्यातील रांझणी-नवागाव रस्त्याला श्रीकृष्ण गोशाळा आहे. सायंकाळी सात-साडेसातला एक गाय गोशाळेतून सुटून बाहेर पडली होती. या गायीचा शोध घेण्यासाठी गोशाळेचे मालक आनंद मराठे, सहकारी विजय ठाकरे, चालक अजय पाडवी व सचिन पाडवी यांना घेऊन गायीच्या शोधासाठी निघाले होते.
गाय आढळून आल्यावर तिला पुन्हा गोशाळेत नेत असताना अचानक अवघ्या वीस फुटावर बिबट्या उभा असल्याचे त्यांना दिसले. यावेळी चारही जण भयभीत झाले. प्रसंगावधान राखत आनंदा मराठे यांनी मोबाईलवरून तत्काळ लहान भाऊ धनराज यला माहिती दिली.
त्यानंतर धनराज मराठे यांनी गावातील सागर गोसावी, जयेश पवार, गणेश बोराणे, पिनु भारती, बबलू गायकवाड, भूषण पाचोरे, वसंत पाडवी, सागर मढवी व इतर तरुणांना घटनेबाबत माहिती देऊन त्यांना मदतीसाठी पाठवले. सारे तरुण गोशाळेपासून काही अंतरावर एकत्र येऊन गाड्यांचा आवाज करत बिबट्याला हुसकावून लावले.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
बिबट्या तेथून गेल्याने आनंदा मराठेसह अन्य जणांनी सुटकेच्या नि:श्वास टाकत मदतीला धावून आलेल्या तरुणांचे आभार मानले. वारंवार बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी वन विभागाकडे करूनही ठोस उपाययोजना होत नसल्याने जनतेकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
"अवघ्या पंधरा ते वीस फुटावर बिबट्या पाहून पायाखालची जमीनच सरकली. मी आणि माझे सहकारी आम्ही एकमेकांना घट्ट धरून आधार देत होतो. गावातून जेव्हा मुले मोटारसायकलने एकत्र आली तेव्हा गाड्यांच्या आवाजाने बिबट्या रस्त्यावरून केळीच्या शेतात गेला, असा प्रसंग एकट्यादुकट्यावर ओढवला तर काय होऊ शकते, याची कल्पना न केलेलीच बरी." - आनंदा मराठे, गोशाळा मालक
दलेलपूरला बिबट्याच्या हल्ल्यात शेळ्या ठार
दलेलपूर (ता. तळोदा) येथील शेत शिवारात रविवारी (ता.३) बिबट्याने पुन्हा हल्ला करत दोन शेळ्या ठार केल्या. वन विभागाने बिबट्याची बंदोबस्त करावा अशी मागणी तालुक्यातील ग्रामीण भागातून होत आहे.
दलेलपूर शिवारातील हलालपूर रस्त्यावरील राजाराम रामराजे यांच्या शेतात दलेलपूर येथील किशोर धानका व जानेश धानका आपल्या शेळ्या नेहमीप्रमाणे चारण्यासाठी गेले होते. दलेलपूर शिवारात बिबट्याची दहशत असल्याने रविवारीही दोन शेळ्यांची शिकार बिबट्याने केली. किशोर धानका व जानेश धानका यांच्या दोन शेळ्या बिबट्याने ठार केल्या.
पंधरा दिवसांत हल्ल्याची ही तिसरी घटना आहे. वन विभाग नावापुरतेच असल्याची ग्रामस्थांनी संतापजनक प्रतिक्रिया दिली. अशावेळी सर्व स्तरातून बिबट जेरबंद करण्याबाबत मागणी होत आहे. वनविभाग कधी जागा होईल आणि आमचे जीव, जनावरांचे प्राण कधी सुरक्षित होतील, असा प्रश्न पंचक्रोशीतील शेतकरी बांधव, शेतमजूर व पशुपालकांनी उपस्थित केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.