नंदुरबार : देशाच्या सीमेवर संरक्षण करणाऱ्या सैनिकांच्या कल्याणासाठी ध्वजनिधी संकलनाच्या माध्यमातून ऋण फेडण्याची हीच संधी असून, जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने ध्वजनिधी संकलनात मोठ्या प्रमाणात योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी केले.
जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत क्रांतिवीर बिरसा मुंडा सभागृहात झालेल्या सशस्त्र सेना ध्वज दिन-२०२२ निधी संकलन प्रारंभप्रसंगी जिल्हाधिकारी खत्री बोलत होत्या. या कार्यक्रमाला सहाय्यक जिल्हाधिकारी मंदार पत्की, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी संजय गायकवाड, उपविभागीय पोलिस अधिकारी विश्वास वळवी, सुभेदार मेजर रामदास पाटील आदी उपस्थित होते.(Manisha Khatri Statement Every citizen should contribute to flag fund Jalgaon News)
जिल्हाधिकारी खत्री म्हणाल्या, की भारताच्या संरक्षणासाठी ज्यांनी आपले प्राणार्पण अर्पण केले, अशा जवानांच्या कुटुंबीयांच्या जीवनातील अडीअडचणी दूर करून त्यांचे जीवन सुसह्य व्हावे, त्याचप्रमाणे युद्धात अपंगत्व प्राप्त झालेल्या आणि सशस्त्र सेनादलातून निवृत्त झालेल्या जवानांच्या पुनर्वसनासाच्या विविध कल्याणकारी योजना राबविण्यासाठी समाजाप्रति आपले काही देणे आहे या भावनेतून अशा जवानांच्या सन्मानासाठी ध्वज दिन संकलन करण्यात येते.
मागील वर्षी ध्वज दिन निधी संकलनात जिल्ह्यातील सर्व विभागांनी अतिशय चांगले काम करून १०३ टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे. मागील वर्षाप्रमाणे या वर्षी १०० टक्के पूर्ण करण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक नागरिक, खासगी आस्थापना, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी या वेळी केले.
हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...
जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी गायकवाड म्हणाले, की जिल्ह्याला गेल्या वर्षी ३६ लाख ३० हजार रुपये निधी संकलनाचे उद्दिष्ट होते. त्यांपैकी जिल्ह्याने ३७ लाख ६३ हजार ६०९ इतके उद्दिष्ट पूर्ण केले. जिल्ह्यात मागील वर्षी सर्वांच्या सहकार्याने उद्दिष्टापेक्षा अधिक निधी संकलित झाला आहे याबद्दल जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासन, शैक्षणिक संस्था व जिल्हा परिषद तसेच सर्व देणगीदारांचे आभार मानून मागील वर्षी दिलेल्या उद्दिष्टाप्रमाणे या वर्षीही उद्दिष्ट पूर्ण करावे, असे आवाहन त्यांनी केले.
शहीद राजाराम खोत आणि ज्ञानेश्वर पाटील यांच्या प्रतिमेस अभिवादन करून कार्यक्रमाची सुरवात झाली. श्रॉफ हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी देशभक्तिपर व स्वागतगीत सादर केले. त्याचबरोबर पोलिस बॅन्डपथकातील कर्मचाऱ्यांनी मानवंदना देऊन शहीद सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या वेळी वीरपत्नी माधुरी पाटील व छाया खोत यांचा सत्कार करण्यात आला. एनसीसी विद्यार्थी व आजी-माजी सैनिकांचे प्रशासकीय काम उत्कृष्ट केल्याबाबत त्यांचा विशेष गौरव करण्यात आला.
उद्दिष्टपूर्तीतील योगदानाबद्दल सत्कार
या वेळी भास्कर कासार, स्नेहल पाटील, कमलेश थोरात यांच्यासह अधिकारी व कर्मचारी यांना प्रेरित करून स्वेच्छेने ध्वजनिधी संकलनात सहभागी गटविकास अधिकारी पंचायत समिती (अक्कलकुवा), अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क नंदुरबार, कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, नंदुरबार, तालुका कृषी अधिकारी, शहादा, प्राचार्य शासकीय तंत्रनिकेतन, नंदुरबार, तहसीलदार, तळोदा, प्राचार्य विज्ञान व कला कनिष्ठ महाविद्यालय व न्यू इंग्लिश स्कूल, तळोदा, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय, नंदुरबार, प्राथमिक आरोंग्य केंद्र, जांगठी (ता. अक्कलकुवा) या कार्यालयांचे विशेष योगदान लाभले. त्यानिमित्त सर्वांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तिपत्र, मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.