धुळे : शहरात कोरोनाचा (corona) कहर कमी होत नाही तोच डेंगीसह (Dengue) व्हायरल फिवरने डोके वर काढले आहे. यातच बुधवारी शहरातील साक्री रोड भागात एका पावणेसात वर्षाच्या निष्पाप मुलाचा डेंगीने बळी घेतला. या बालकाच्या मृत्यूने (Death of a child) त्याच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळलाच आहे, पण शहरातील नागरिकांमध्येही यामुळे भीतीचे वातावरण आहे.
शहरात साधारणतः प्रत्येक घरांत कुणी ना कुणी आजारी आहे. शासकीय, खासगी दवाखान्यांमध्ये रुग्णांना पाय ठेवायला जागा नाही. त्यामुळे ही भिती अनाठायी नाही. दुसरीकडे महापालिकेला याचे सोयरसुतक नसल्यागत स्थिती आहे. आता संबंधित बालकाच्या डेंगीची चाचणी प्राथमिक (एन्टीजेन) होती की एलायजा (कन्फर्म) होती, असा युक्तिवाद सुरू होईल. निष्पाप बळी मात्र जात राहतील. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी थोडीतरी तमा बाळगून गांभिर्याने उपाययोजना कराव्यात, अशी धुळेकरांची अपेक्षा आहे.
वेदला डेंगीची लागण
शहरात गेल्या काही दिवसांपासून डेंग्यू, चिकुणगुनीया, टायफॉइड, व्हायरल फिवरने कहर केला आहे. शहरातील प्रत्येक भागातील घरांमध्ये एकतरी सदस्य आजारी आहे. त्यामुळे शहरातील खासगी दवाखानेदेखील फुल्ल आहेत. त्यातच शहरातील साक्री रोड भागातील जनरल अरुणकुमार वैद्य नगरातील पावणेसात वर्षीय बालकाचा बुधवारी डेंगीने मृत्यू झाला. वेद हिरालाल सूर्यवंशी असे त्याचे नाव आहे. त्याला ताप आल्याने पालकांनी साक्री रोड भागातील एका खासगी दवाखान्यात नेले. डॉक्टरांनी औषधोपचार दिल्यानंतरही त्याला बरे वाटत नसल्याने ११ सप्टेंबरला डेंगीची चाचणी करण्यात आली. त्यात त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. उपचार सुरू होते मात्र तब्येत खालावल्याने त्याला साक्री रोड भागातीलच एका मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
औरंगाबाद येथे मृत्यू
मात्र, तेथेही सुधारणा न झाल्याने वेद याला मंगळवारी (ता. १४) औरंगाबादला हलविण्यात आले. मध्यरात्रीनंतर अडीच- तीनच्या सुमारास त्याला औरंगाबाद येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर बुधवारी (ता.१५) पहाटे चारच्या सुमारास त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. वेदचा मृत्यू डेंगी, हिमोऱ्हायझिक शॉकने झाल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्रात म्हटले आहे. वेदवर बुधवारी सकाळी धुळ्यात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. वेद हा शहरातील गरुड इंग्लिश स्कूलमध्ये पहिलीला होता. त्याच्या मृत्यूचा कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.
डेंगीच्या टेस्टचा घोळ कायम
डेंगीने बळी गेल्यानंतर टेस्ट कोणती यावर युक्तिवाद सुरू होता. महापालिकेसह शासकीय यंत्रणा प्राथमिक टेस्टला गृहीत धरत नाहीत आणि खासगी वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर मात्र अशा टेस्टच्या आधारावरच रुग्णांवर उपचार करतात. यात रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांचा काडीमात्र संबंध येत नाही. डॉक्टर जसे सांगतात त्याप्रमाणे रुग्ण व नातेवाईक ऐकतात. दुसरीकडे मात्र महापालिकेसह अन्य शासकीय यंत्रणा एलायझा टेस्ट असेल तरच डेंगी पॉझिटिव्ह गृहीत धरते. त्यामुळे हा घोळ कधी मिटेल हाही प्रश्नच आहे. याच प्रश्नामुळे शासकीय आकडेवारी कमी दिसते.
आकडे बोलतात...
डेंगीची सरकारी आकडेवारी अशी- धुळे शहर
- एकूण डेंगी संशयित रुग्ण........२७३ (जाने ते सप्टेंबर)
- जानेवारीपासून पॉझिटिव्ह रुग्ण...६१ (ऑगस्ट- २३, सप्टेंबर-२)
- मृत्यू.............................एकही नाही
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.