धुळे ः धुळे-नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची (Dhule-Nandurbar District Bank Election) १७ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली असून, २१ नोव्हेंबरला मतदान, तर २२ ला मतमोजणीसह निकाल जाहीर होईल. यात उमेदवारी अर्ज-खरेदी विक्रीच्या प्रक्रियेलाही सुरवात झाली आहे. असे असताना राजकीय घडामोडींना वेग आला असून, ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी येथे प्रमुख पक्षीय नेते (Political Leader) , पदाधिकारी एकत्र आले असून, त्यांची जागावाटपासाठी वाटाघाटींची पहिली फेरी झाली आहे. मात्र, नंदुरबार जिल्ह्यात पडद्याआडून महाविकास आघाडीची मोट बांधण्याची शिवसेना आणि काँग्रेसच्या गोटातून हालचाल सुरू झाल्याचे सांगितले जात आहे.
जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने ही निवडणूक जाहीर केली. यात प्राथमिक कृषी पतसंस्था, विविध सेवा सोसायट्या, आनुषंगिक सहकारी संस्था, संयुक्त शेती संस्था, धान्य अधिकोश सहकारी संस्था, आदिवासी सेवा सहकारी संस्था आदींच्या धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील प्रत्येक तालुकानिहाय प्रतिनिधींच्या प्रत्येकी एकप्रमाणे दहा जागा, महिला प्रतिनिधींच्या दोन, अनुसूचित जाती किंवा जमातीची एक जागा, इतर मागासवर्गातील एक जागा, विमुक्त जाती भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्गातील एक जागा, कृषी व पणन संस्था व शेतमाल प्रक्रिया संस्थेची एक जागा, इतर शेती संस्थेची एक जागा, अशा एकूण १७ जागांसाठी निवडणूक होईल.
प्रमुख पक्षीय नेते एकत्र
या पार्श्वभूमीवर जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी शहरात सर्वपक्षीय नेते, पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. तीत भाजपचे नेते व बँकेचे अध्यक्ष माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, आमदार जयकुमार रावल, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तुषार रंधे, जिल्हाध्यक्ष नारायण पाटील, ज्येष्ठ सुरेश पाटील, हर्षवर्धन दहिते, माजी नगराध्यक्ष प्रभाकर चव्हाण, काँग्रेसचे नेते आमदार कुणाल पाटील, जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर, शहराध्यक्ष प्रा. शरद पाटील, प्रदेश सरचिटणीस युवराज करनकाळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य किरण पाटील आदी उपस्थित होते. कार्यबाहुल्यामुळे शिवसेनेच्या आमदार मंजुळा गावित, जिल्हाप्रमुख डॉ. तुळशीराम गावित अनुपस्थित होते. त्यांना माहिती देत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते, असे सांगण्यात आले.
जळगावप्रमाणे निवडणूक शक्य
महाविकास आघाडीची भूमिका मांडताना संबंधित प्रमुखाने बैठकीनंतर शिवसेनेचे आमदार व जिल्हाप्रमुखांशी चर्चा केली जाईल, असे सांगितले. तसेच जळगाव जिल्हा बँकेच्या २१ जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीत बिनविरोधासाठी सर्वपक्षीय पॅनेलमधून भाजपला सात, राष्ट्रवादी काँग्रेसला सात, शिवसेनाला पाच, काँग्रेसला दोन जागा देण्याचा प्रस्ताव मांडला गेला. या धर्तीवर धुळे-नंदुरबार जिल्हा बँकेच्या जागावाटपातून ही निवडणूक बिनविरोध करता येणे शक्य असल्याची भूमिका महाविकास आघाडीच्या प्रमुखाने मांडली. त्यात नंदुरबार जिल्ह्यातील महाविकास आघाडीची भूमिका अद्याप समजली नसल्याचेही सांगण्यात आले. निवडणूक टाळण्यासाठी प्रयत्न व्हावेत, असा सर्वसामान्य सूर येथील बैठकीत उमटला. दरम्यान, जळगाव येथे सर्वपक्षीय पॅनलमधून बुधवारी दुपारनंतर काँग्रेसने माघार घेतली आहे. याप्रमाणे नंदुरबार जिल्ह्यातून काही घडामोडी घडल्या तर येथील जिल्हा बँकेच्या निवडणुकीची दिशा कशी असेल हे पाहणे उचित ठरेल. १४-१
निवडणुकीचा कार्यक्रम असा
धुळे व नंदुरबार जिल्हा बँकेच्या पंचवार्षिक संचालक मंडळ निवडीच्या निवडणुकीचा कार्यक्रम असा ः अर्ज विक्री व दाखल प्रक्रिया- १२ ते २० ऑक्टोबरपर्यंत सकाळी अकरा ते दुपारी तीनपर्यंत, अर्जांची छाननी : २१ ऑक्टोबरला सकाळी अकरापासून, विधीग्राह्य अर्जांची प्रसिद्धी- २२ ऑक्टोबर, माघार- २२ ऑक्टोबर ते ८ नोव्हेंबरपर्यंत सकाळी अकरा ते दुपारी तीनपर्यंत, चिन्हवाटप- ९ नोव्हेंबरला सकाळी अकरापासून, मतदान- २१ नोव्हेंबरला निर्धारित केंद्रात सकाळी आठ ते दुपारी चारपर्यंत, मतमोजणीसह निकाल : २२ नोव्हेंबरला सकाळी आठपासून. निवडणुकीसाठी सहकार विभागाच्या नाशिक येथील सहाय्यक निबंधक डॉ. ज्योती लाटकर मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी असतील. तसेच जिल्हा उपनिबंधक अभिजित देशपांडे निवडणूक निर्णय अधिकारी असतील..
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.