धुळे ः धुळे तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीने (Dhule Taluka Agricultural Produce Market Committee) अडत्यांशिवाय शेतमालाची खरेदी प्रक्रिया राबविण्याचा ऐतिहासिक निर्णय (Historic decision) घेतला. समितीचे मुख्य प्रशासक रितेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झालेल्या सभेनंतर निर्णयाचे शेतकरी आणि व्यापाऱ्यांकडून स्वागत झाले.
बाजार समितीचे मुख्य प्रशासक पाटील व प्रशासक मंडळाची विविध घटकांसमवेत संयुक्त सभा झाली. तीत अडत्यांशिवाय नियमनाखालील शेतमाल थेट खरेदीदार लिलावातून खरेदी करेल, असा शेतकरीहिताचा निर्णय झाला. सभेतील हिताचे निर्णय असे ः शेतकऱ्यांच्या नियमनाखालील धान्य भुसार, कडधान्य, भुईमूग शेंगा या शेतमालाची खरेदी अडत्याशिवाय होईल. थेट खरेदीदार लिलावातून या शेतमालाची खरेदी करेल. शेतकऱ्याने धान्यभुसार व कडधान्य हा शेतमाल बाजार समितीच्या आवारात विक्रीस आणताना आपल्या वाहनातून आणावा व लिलावासाठी वाहने एका रांगेत लावावीत. बाजार समितीच्या आवारात नियमनाखालील धान्यभुसार व कडधान्य या शेतमालाचे लिलाव वाहनातच होतील. प्लॉटवर उतरविलेल्या शेतमालाचे लिलाव होण्यास अडचण निर्माण होईल.
धान्यभुसार, कडधान्य, भुईमगू शेंगांची विक्री, वजनमाप झाल्यानंतर संबंधित खरेदीदारामार्फत हिशेब पट्टीनुसार शेतकऱ्यांना त्याच दिवशी रोखीने किंवा त्याच दिवसाच्या धनादेशाद्वारे पेमेंट केले जाईल.
संपर्काचेही समितीचे आवाहन
शेतकऱ्याकडील माल विक्रीच्या रकमेतून नियमाप्रमाणे कायदेशीररीत्या हमाली व मापाई मजुरीची रक्कम वजावट करावी. मात्र, त्याव्यतिरिक्त कोणत्याही प्रकारची अडत व इतर सदराखाली कोणतीही बेकायदेशीर रक्कम कपात करू नये. शेतकऱ्याला मालाच्या हिशेबाची रक्कम त्याच दिवशी संबंधित खरेदीदाराकडून न मिळाल्यास संबंधितांनी तत्काळ बाजार समितीशी संपर्क साधावा. तसेच कोणत्याही प्रकारची नियमाप्रमाणे हमाली व मापाईव्यतिरिक्त इतर बेकायदा रक्कम शेतमालाच्या किमतीतून खरेदीदाराने कपात केल्याचे आढळल्यास बाजार समितीला संबंधितांनी माहिती द्यावी. त्याआधारे संबंधितांबर कायदेशीर कारवाई केली जाईल. सभेस अडत व खरेदीदार असोसिएशनचे प्रमोद जैन, विजय चिंचोले, तुकाराम पाटील, नरेंद्र हेमाडे, झिका बाविस्कर, मनोज ब्राह्मणकर, गोपाल पाडे, चंद्रेशकुमार कांकलिया, हमाल-मापाडी संघटनेचे गंगाराम कोळेकर, भागवत चितळकर, रमेश पाटील, दत्तू पाटील, चंद्रकांत धात्रक, बाजार समितीचे सचिव दिनकर पाटील, सहाय्यक सचिव विशाल आव्हाड, उपसचिव देवेंद्र पाटील व अन्य अधिकारी उपस्थित होते.
समितीत बुधवारपासून अंमलबजावणी
बाजार समितीमध्ये सर्व शेतमालाच्या लिलावाची कामकाज प्रक्रिया सकाळी दहाला सुरू होईल. सभेतील या सर्व निर्णयांची अंमलबजावणी बुधवार (ता. ८)पासून सुरू होणार आहे. काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे आमदार कुणाल पाटील यांच्या आग्रहासह सूचनेमुळे झालेल्या निर्णयाचा शेतकरी वर्गाला लाभ होणार असल्याचे प्रशासक पाटील यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.