तळोदा ः वनसंपदेमध्ये वाढ व्हावी यासाठी एकीकडे शासन, प्रशासन वृक्षलागवडीचा कार्यक्रम राबविते, तर याउलट तळोदा मेवासी वन विभागांतर्गत (Forest) येणाऱ्या वाल्हेरी-ढेकाटी परिसरात चक्क बहुमूल्य अशा सागवान जातीच्या वृक्षांची कत्तल (Teak Tree) केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वृक्षतोडीची सखोल चौकशी करीत वृक्षांची कत्तल करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.
काळाच्या ओघात सर्वत्र वनसंपदा कमी होत आहे. त्यामुळे राज्यातील वनसंपदेमध्ये वाढ व्हावी यासाठी शासन, प्रशासन स्तरावर अनेक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. मध्यंतरी शासनाने ३३ कोटी वृक्षलागवडीची योजना राबविली आहे व त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधीदेखील खर्च करण्यात आला आहे. मात्र तळोदा मेवासी वन विभागांतर्गत येणाऱ्या वाल्हेरी-ढेकाटी परिसरात तळोदा वन विभागाने वृक्षलागवडीची नाही, तर वृक्षांच्या कत्तलीची योजना आखली आहे का, अशी शंका उपस्थित होत आहे. कारण सात-आठ दिवसांपूर्वी वाल्हेरी-ढेकाटी परिसरात बऱ्यापैकी वाढ झालेल्या चक्क तीनशेहून अधिक वृक्षांची अक्षरशः कत्तल करण्यात आली आहे. त्यात बहुमूल्य अशा सागवान प्रजातीचादेखील समावेश असून, या कत्तलीत जवळपास अडीचशे सागवान वृक्षांची कत्तल झाली आहे. यांपैकी काही वृक्ष सहा महिने ते एक वर्ष वाढ झालेले होते, तर काही वृक्ष दोन ते तीन वर्षे वाढ झालेलेदेखील होते. त्यामुळे ही कत्तल सागवानाच्या तस्करीच्या हेतूनेच झाली असावी, अशी शक्यतादेखील वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, तळोदा वन विभागाने तोडण्यात आलेल्या वृक्षांचा पंचनामा केला असून, त्या वृक्षांचे लाकूड ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, तळोद्यात उपवनसंरक्षक, सहाय्यक वनसंरक्षक, वनक्षेत्रपाल अशा वन प्रशासनातील अधिकाऱ्यांची कार्यालये आहेत. त्यांच्या अधीनस्त वनपाल, वनरक्षक, वनमजूर यांसारखी यंत्रणा दिमतीला आहे. मात्र त्यानंतरही अशा प्रकारे अवैध वृक्षतोड होत असेल तर वन खात्याची ही यंत्रणा खरोखरच किती तत्पर आहे, हे स्पष्ट होते. तसेच झालेली ही वृक्षतोड एकप्रकारे तळोदा वन विभागाच्या कर्तव्यदक्षतेवरच प्रश्नचिन्ह लावणारी आहे.
प्रशासनापुढे आव्हान
अवैधपणे करण्यात आलेल्या सागवान प्रजातीच्या वृक्षतोडीची सखोल चौकशी करीत, या प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आव्हान उभे आहे. केवळ चौकशीचा बागुलबुवा उभा करून ही वृक्षतोड दडपली तर या प्रकरणात वन प्रशासनाचाही कुठेतरी अप्रत्यक्ष सहभाग तर नाही ना, अशा शंकेला वाव मिळू शकतो. त्यामुळे तळोदा वन विभाग या प्रकरणात कशी चौकशी करतो व काय कारवाई करतो हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.