Nandurbar News : सारंगखेडा (ता. शहादा) येथील तापी नदीवरील पुलाला भगदाड पडल्यानंतर पुलावरून वाहतूक तब्बल महिन्याभरापासून बंद करण्यात आली होती. पुलावरील भगदाड सध्या बुजले असले तरी भरावाचे काम अपूर्णावस्थेतच आहे.
पुलाचे काम पूर्ण झाल्यावर तज्ज्ञांकडून पाहणीनंतर वाहतुकीसाठी पूल खुला होणे अपेक्षित असतानाच कामानंतर पुलाला तज्ज्ञांची ना भेट ना वाहतुकीला हिरवा कंदील अखेर कंटाळलेल्या वाहनधारकांनी अखेर दसऱ्याचा मुहूर्त साधत स्वयंस्फूर्तीने पुलावरून वाहतूक सुरू केली.
मंगळवारी दिवसभर दुचाकीपासून अवजड वाहनांपर्यंत साऱ्याच वाहनधारकांनी कसलीही पर्वा न करता आपली वाहने पुलावरून सुसाट नेली. प्रशासनातर्फे पुलावरून वाहतुकीस बंदी आहे. मात्र त्यांना अटकाव करण्यासाठी कोणतीही यंत्रणा नव्हती. (motorists themselves opened road from closed bridge for traffic nandurbar news)
सारंगखेडा येथील तापी नदीवर बांधण्यात आलेल्या राज्यातील पहिल्या स्प्रिंकल पुलाला १७ सप्टेंबरला नदीला आलेल्या पुरामुळे पुलाखालील भराव वाहून गेला, तसेच पुलाला मोठे भगदाड पडल्याने सुमारे महिनाभरापासून काम सुरू असल्याने पुलावरून वाहतूक बंद करण्यात आलेली होती. शिरपूर व नंदुरबारमार्गे अवजड वाहनांची वाहतूक वळविण्यात आली आहे.
मात्र गेल्या महिन्याभरापासून सारंगखेडा बॅरेजवरून लहान वाहने सुरू होती; परंतु मंगळवारी सकाळी संबंधित अधिकाऱ्यांनी बॅरेजच्या सुरक्षारक्षकांना भ्रमणध्वनीद्वारे वाहनांना प्रवेश बंद करण्याचे आदेश देण्यात आल्याचे समजते.
सुरक्षारक्षकांनी वाहनांना बॅरेजच्या पुलावरून वाहन घेऊन जाण्यास मज्जाव केल्यानंतर वाहनधारकांनी वाहतुकीस मज्जाव असलेल्या सारंगखेडा पुलावरून मार्गक्रमण सुरू केले. मंगळवारी दिवसभरातून शेकडो वाहने पुलावरून धावली.
दरम्यान, पुलाखालील भरावाचे काम अद्यापही अपूर्णच आहे. दगडी भिंतीचे सुरू असलेले काम गेल्या आठ दिवसांपासून बंद आहे. संबंधित ठेकेदार काम अपूर्ण सोडून गेल्याचे समजते.
सुरक्षा यंत्रणा नाहीच
दरम्यान, या पुलावरून वाहतुकीस सध्या मज्जाव करण्यात आला आहे; परंतु वाहनधारकांना रोखण्यासाठी कोणतीही सुरक्षा यंत्रणा येथे उपलब्ध नसल्याने वाहनधारकांनी लावलेले बॅरिकेड्स बाजूला सारत वाहनधारकांनी स्वतः वाहतुकीसाठी रस्ता खुला करून घेतला; परंतु काही अनर्थ घडल्यास जबाबदार कोण राहील हा प्रश्न मात्र उपस्थित होत आहे.
पालकमंत्र्यांची भेट
दरम्यान, सोमवारी (ता. २३) पालकमंत्री अनिल पाटील यांनी सारंगखेडा पुलाला भेट देऊन परिस्थितीची माहिती घेऊन पुलासंदर्भात रस्ता विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीद्वारे कामाचा दर्जा योग्य ठेवण्याच्या सूचना दिल्या. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयपालसिंह रावल, शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजित पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष एन. डी. पाटील व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.