शहादा : कोळदा-खेतिया रस्ता काँक्रिट झाला. या रस्त्यावर वाहने सुसाट धावू लागली. नवीन रस्त्यामुळे वेळ, इंधनाची बचत होतेय; परंतु रस्त्यावरील गावे, चौफुली, शहादा शहर या ठिकाणी रिफ्लेक्टर, गतिरोधक नसल्याने सुसाट जाणाऱ्या वाहनांमध्ये निष्पाप लोकांचा बळी जात आहे. आजपर्यंत या रस्त्याने अनेकांच्या जीव घेतला.
सरत्या वर्षाच्या शेवटी एका नवविवाहित तरुणाचा अपघातात मृत्यू झाला. तरीही उपाययोजना मात्र शून्य आहेत. नियमित होणाऱ्या अपघातांच्या मालिकेची दखल घेऊन तांत्रिक सुधारणा करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
विसरवाडी-सेंधवा हा महामार्ग शहादा तालुक्यातून मध्य प्रदेशात जातो. शहादा शहराबाहेरून बायपास होत जाणाऱ्या या मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा अनेक वसाहती आहेत. वसाहतीत ये-जा करताना नागरिकांना तसेच शाळकरी मुलांना हा मुख्य रस्ता ओलांडावा लागतो.
रस्ता ओलांडताना रस्त्यावरून सुसाट येणाऱ्या वाहनांनी अनेकांचा बळी घेतला आहे, तर काहींना जायबंदी केले आहे. शहरातील नवीन पोलिस ठाण्यासमोर असलेल्या संविधान चौकात चौफुली आहे.
या ठिकाणीही हायमस्टसाठी खांब उभारण्यात आला आहे; परंतु तेथेही लाइट बंद असल्याने शहराकडून किंवा खेतियाकडून येणारी वाहने कुठून येत आहेत हे समजत नाही, तसेच वळणरस्त्यावर कुठे वळावे हेसुद्धा अंधारात दिसत नसल्याने अनेक वेळा लहान लहान वाहने दुभाजकावर चढविल्याने अपघात झाले आहेत.
हेही वाचा: जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक
त्याचबरोबर शिरूड चौफुली, डोंगरगाव रस्त्यावरील बिरसा मुंडा चौफुली, मोहिदा चौफुली, शिवतीर्थ या ठिकाणी नेहमी गर्दी असते. या गर्दीच्या तसेच महत्त्वाच्या ठिकाणी गतिरोधक असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर चौफुलीवर पथदीपदेखील सुरू करणे गरजेचे आहे.
ठिकठिकाणी पथदीपांची व्यवस्था असली तरी ते काही ठिकाणी बंद अवस्थेत असल्याने गर्दीच्या ठिकाणी अंधाराचे साम्राज्य पसरते. नागरिकांनी वारंवार मागणी करूनही ठेकेदार व प्रशासनाने अक्षम्य दुर्लक्ष केल्याने नागरिकांना या रस्त्यावरून जाताना जीव मुठीत तरुण प्रवास करावा लागतो. परिसरात मोठ्या प्रमाणावर अंधार असल्याने अपघातांचे प्रमाण वाढत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.
सरत्या वर्षाच्या अखेरीस बळी
दरम्यान, या रस्त्यावर डोंगरगाव चौफुलीनजीक शनिवारी (ता. ३१) भरधाव येणाऱ्या ट्रकने मोटारसायकलस्वारास जबर धडक दिल्याने त्यात नवविवाहिताचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा अति गंभीर आहे.
नियम गुलदस्त्यातच
या नवीन रस्त्यावर मुख्यतः मोठी वाहने भरधाव चालविताना आरटीओ विभागाने दिलेले नियमही अमलात आणणे गरजेचे आहे. अनेक अवजड वाहनचालकांकडे लायसन्स नसते. बहुतांश अवजड वाहनधारक आपल्या भागात आल्यानंतर सहचालकाला गाडी चालविण्यासाठी देत असतात.
या वेळी वाहनमालक व चालक दोघांनी याची काळजी घेणे गरजेचे आहे. त्याचबरोबर शहर, चौफुली व गाव हद्द ओळखून वाहनाचे वेग नियंत्रण ठेवणे गरजेचे असताना सुसाट जाणाऱ्या वाहनांवर कोणाचेही नियंत्रण नसल्याने अपघातांची मालिका सुरू आहे.
''रस्त्यावरून वाहन चालविताना रस्त्याचे नियम अमलात आणणे गरजेचे आहे. काही दिवसांपूर्वी बायपास रस्त्यावर चौक सुशोभीकरणासाठी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत इस्टिमेट तयार करण्यात आले होते, परंतु ते सर्व गुलदस्त्यातच आहे. सुसाट धावणाऱ्या वाहनांचीही तपासणी होणे गरजेचे आहे. सततच्या होणाऱ्या अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे.'' - अनिल पटेल, अभियंता, शहादा
''नवीन रस्त्यावर गर्दी, तसेच महत्त्वाच्या ठिकाणी गतिरोधक हवेत, तसेच ठिकठिकाणी असलेल्या चौफुलीवर पथदीपदेखील सुरू करावेत, सध्या अनेक ठिकाणी पथदीप असूनही काहीही फायदा नाही.'' - मोहन चौधरी, शहादा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.