नंदुरबार : केंद्रासह राज्यातही भाजपचे वर्चस्व आहे. आपल्या परिसर विकासासाठी निधी मिळवता येईल, निवडणुकीत उमेदवारी मिळेल, यांसह अनेक आशा-अपेक्षा उराशी बाळगून मोठ्या उम्मेदीने स्वपक्षाला राम राम ठोकून भाजपत गेलेले जिल्ह्यातील तीन मोठे नेत्यांनी विधानसभा निवडणुकीचा तोंडावर भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यामुळे राजकीय गोटात चर्चांना उधाण आले आहे. (Ahead of election trio disaffiliation with BJP sparked discussions in political circle )
या तिन्हीही नेत्यांना विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी करायची आहे. त्यासाठी त्यांनी राजकीय रणनीती आखली आहे. नंदुरबार जिल्ह्याचा राजकारणात दररोज नवनवे बदल दिसून येत आहेत. नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचे टॉप टेन खासदार स्व. माणिकराव गावित यांची संपूर्ण हयाती काँग्रेसमध्ये गेली. मात्र त्यांचे पुत्र भरत गावित यांना २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी दिली नाही म्हणून भरत गावित यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपत प्रवेश केला होता.
भाजपतर्फे नवापूर विधानसभा निवडणूक लढविली; मात्र पराभूत झाले. तरीही त्यांनी गेली पाच वर्षे भाजपचे निष्ठेने काम केले. मात्र आगामी २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत नवापूर मतदारसंघाची जागा महायुतीचा जागा वाटप फार्मुल्यात राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार) मागितली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला ती जागा सुटण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपला जागा न सुटल्याने भरत गावित यांच्या उमेदवारीबाबत यक्ष प्रश्न उभा राहू शकतो. हे एक कारण झाले तरी दुसरे कारण म्हणजे या मतदारसंघात माजी आमदार शरद गावित हेही तयारी करताहेत.
गावित उमेदवारी करणार असल्याने मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांची प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत शरद गावित यांनाच होईल. मंत्री म्हणून केलेल्या कामाचा फायदा शरद गावित यांनाच होईल. त्यामुळे भरत गावित यांनी सावध पवित्रा घेत भाजपला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. ते सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटात विशेष दिसून येत आहेत. वरिष्ठ नेत्यांशी त्यांची भेटही झाली आहे. तर दुसरीकडे मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचे बंधू राजेंद्रकुमार गावित हे भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष होते. (latest marathi news)
त्यांनाही विधानसभा निवडणूक लढवायची आहे. त्यांना तळोदा-शहादा मतदारसंघातून निवडणूक लढवायची आहे. मात्र तेथे भाजपचे विद्यमान आमदार राजेश पाडवी आहेत. त्यांनाच जवळपास उमेदवारी मिळणे निश्चित असल्याने राजेंद्रकुमार गावित यांचाही पुढे उमेदवारीचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यांनी गेली अनेक वर्ष मतदारसंघात बांधणी केली आहे. त्यांनाही या मतदारसंघात वातावरण पोषक असल्याचे बोलले जाते.
त्यामुळे गावित यांनी भाजपचा राजीनामा दिला आहे. ते काँग्रेस व इतर पक्षाकडून जे उमेदवारी देतील त्यांचातर्फे निवडणूक रिंगणात उतरण्यास सज्ज झाले आहेत. तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेत्यांचा यादीत गणले जाणारे माजी मंत्री ॲड. पद्माकर वळवी यांनी काही महिन्यांपूर्वी कॉंग्रेसची भारत जोडो यात्रा सुरू असताना पक्षाचे नेते राहुल गांधी नंदुरबार जिल्ह्यात सभा घेत होते. त्याचवेळी ॲड. वळवी यांनी मुंबईत भाजपत प्रवेश करीत काँग्रेसला मोठा धक्का दिला होता. मात्र भाजपमध्ये प्रवेश करून त्यांना ‘ये दगड पड पायावर’ अशी स्थिती करून टाकली.
भाजपमध्ये त्यांना फारसे महत्त्वाचे स्थान मिळाले नाही. ते तळोदा मतदारसंघात निवडणूक लढविणार होते. तो त्यांचा मतदारसंघ आहे. मात्र तेथे राजेश पाडवी भाजपचे आमदार असताना त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता नव्हती. त्यातच धनगर आरक्षणाला विरोध असताना राज्यातील महायुती शासन आरक्षणाला साद घालत आहेत. या मुद्द्यावरून ॲड. वळवी यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपला सोडचिठ्ठी दिली.
मात्र सध्या ते ना काँग्रेसमध्ये ना भाजपमध्ये आहेत. मात्र काँग्रेसकडून त्यांची कन्या तथा जि. प. माजी अध्यक्षा सीमा वळवी यांच्यासाठी काँग्रेसकडे उमेदवारी मागितली आहे. ती न मिळाल्यास ते स्वतः निवडणूक लढवतील, असे संकेत दिले आहे. मात्र कोणत्या पक्षात जातात ते अद्याप गुलदस्त्यात आहे. त्यामुळे भाजपमध्ये जशी इनकमिंग सुरू झाली होती तशीच आता आउटगोईंगही सुरू झाली आहे, असे यावरून स्पष्ट होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.