शहादा : शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात रविवारी रात्री तीनपासून संततधार व सकाळी पाचला मुसळधार पर्जन्यवृष्टी झाल्याने जनजीवन विस्कळित झाले. मुसळधारेमुळे शहादा शहरातील रस्त्यांवर पाणी साचले, तर नवीन वसाहतींमध्ये पाण्याचे तलाव साठलेले आहेत. शेतकरी आता पावसाच्या उघडिपीची वाट पाहत आहेत. सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे पिके पिवळी पडायला लागली आहेत. अतिपावसामुळे शेतकरी आता चिंतातुर झाला आहे. (Monsoon Heavy rain in Shahada Taluka)
शहरासह ग्रामीण भागात रविवारी पहाटे (ता. ४) झालेला पाऊस कमालीचा मुसळधार होता. या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. नवीन वसाहतींमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने नागरिकांना पाण्याच्या डबक्यांमधून वाट काढावी लागत आहे. पाण्याचा निचरा होत नसल्याने साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोकात येण्याची शक्यता आहे.
साथीचे रोग वाढू नयेत यासाठी पालिका प्रशासनाने उपाययोजना करणे आवश्यक आहे. शहरातील संत गाडगे महाराज परिसरात गजानन महाराज मंदिर परिसरात कठीण परिस्थिती आहे. रस्ते पाण्याखाली गेल्याने तलाव साचले आहेत. काहींच्या घरांच्या पायऱ्यांपर्यंत पाणी साचले होते. सर्व नवीन वसाहतींमध्ये मोकळ्या जागा, रिकामे प्लॉट, मोकळी मैदाने पाण्याने तुडुंब भरली आहेत.
पावसाचे सातत्य
गेल्या दहा ते बारा दिवसांपासून पाऊस सातत्याने पडतो आहे. काही वेळा संततधार, तर काही वेळा मुसळधार, तर मध्येच पावसाची रिपरीप सुरू राहते. त्यामुळे शेतीकामे खोळंबली आहेत. पिकांमध्ये गवत वाढले आहे. पिकांची पाने पिवळी पडायला लागली आहेत.
त्यामुळे शेती उत्पन्नावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पिकांवर अळ्यांचा प्रादुर्भाव वाढतो आहे. पावसामुळे फवारणी करता येत नाही. जमिनीत पाण्याची पातळी वाढल्याने शेकडो कूपनलिकांच्या पाण्याची पातळी वाढली आहे.
तालुक्यातील गोमाई, सुसरी, वाकी, कनेरी नद्या दुथडी भरून वाहत आहेत. सर्वच सिंचन प्रकल्प भरले आहेत. धरणे ओसंडून वाहत आहेत. तापी नदीला मोठा पूर आल्याने प्रकाशा व सारंगखेडा येथील प्रत्येकी सहा बॅरेजचे दरवाजे उघडले आहेत. साठवण बंधारे भरले आहेत. (latest marathi news)
साथीचे आजार बळावले
शहरातील क्रीडासंकुल मैदान, प्रेस मारुती मैदान, बसस्थानक आवारात पाणी साचले आहे. पावसामुळे शाळा व महाविद्यालयाच्या विद्यार्थिसंख्येवर परिणाम झालेला आहे. शेतकरी आता पाऊस थांबायला पाहिजे, अशी आराधना करीत आहेत. पावसाळी वातावरणामुळे शहरासह परिसरात सर्दी, ताप, खोकला व डोकेदुखीच्या रुग्णांची संख्या वाढत आहे.
खांडबारा परिसरात नदी-नाल्यांना पूर
खांडबारा : खांडबारा व परिसरात सततच्या पडणाऱ्या पावसाने नदी, नाल्यांना पूर आला आहे. मेंदीपाडा धरणाची पातळी वाढल्याने नदीला पूर आला. त्या नदीमधील बऱ्याच दिवसांपासून अडकलेली घाण, घाण पाणी पुराने वाहून गेले आहे.
दिवसभर रिमझिम कधी जोराचा पाऊस पडत असल्याने नदी-नाले वाहू लागले आहेत. परिसरातील मेंदीपाडा, पिपळा, खैरवे डॅम या धरणांची सततच्या पडणाऱ्या पावसामुळे जलपातळी वाढलेली दिसून येत आहे. कूपनलिका, विहिरींच्या पातळीत वाढ झालेली आहे. त्यामुळे शेतकरीराजा सुखावला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.