Nandurbar News : महाराष्ट्र राज्य निर्मितीच्या वेळी उकाई धरणाचे बॅकवॉटर आपल्या राज्याच्या वाट्याला आले. ते उचलण्यासाठी कुठलीही शाश्वत अशी यंत्रणा आजपर्यंत नव्हती. परंतु हे बॅकवॉटर उचलण्यासाठी १६ लिफ्टच्या निर्मितीचे काम सुरू झाले असून, त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश भाग मोठ्या प्रमाणावर सुजलाम-सुफलाम होण्यास मदत होणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले. (Guardian Minister Dr. Vijayakumar gavit)
आज येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नूतन इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, खासदार डॉ. हीना गावित, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अरुण हुमने, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता (नाशिक) प्रशांत औटी, कार्यकारी अभियंता वैशाली पाटील, उपविभागीय अधिकारी जेरा वळवी, गणपत गावित, चेतन पाटील आदी उपस्थित होते.
मंत्री डॉ. गावित म्हणाले, की रस्ते, वीज आणि जलसिंचन या त्रिसूत्रीवर येणाऱ्या काळात जिल्ह्याच्या विकासाचे व्हिजन असून, उकाई डॅमच्या बॅकवॉटरमुळे जिल्ह्यातील तळोदा, अक्कलकुवा, नवापूर आणि नंदुरबार हे तालुके सिंचनाखाली येत सुजलाम-सुफलाम होणार आहेत.
जिल्हा निर्माण झाला त्या वेळी जिल्ह्याचा निम्मा कारभार धुळे जिल्ह्यातील त्या-त्या विभागाच्या कार्यालयांमधून सुरू होता. आज जिल्ह्यात प्रत्येक विभागाचे स्वतंत्र कार्यालय आहे. येणाऱ्या काळात या परिसरात स्टेडियम, वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय रुग्णालय, आदिवासी सांस्कृतिक भवन यांसारख्या जिल्ह्याच्या विकासाला रूपेरी किनार देणाऱ्या इमारती उभ्या राहणार आहेत.
जिल्ह्यात अधिक कार्यक्षमतेने काम करायचे असेल तर बहुविध कनेक्टिव्हिटीची गरज आहे. तसेच शाश्वत स्वरूपाच्या इन्फ्रास्ट्रक्चर उभारणीची गरज आहे. राज्यात १५२ शासकीय आश्रमशाळा इमारती तयार होत आहेत त्यातील ६३ नंदुरबार जिल्ह्याच्या आहेत. प्रत्येक शासकीय इमरतीसोबत कर्मचारी, अधिकारी यांची शासकीय निवासस्थाने करण्यावरही भर आहे.
मेडिकल कॉलेजचे २५ फेब्रुवारीला भूमिपूजन ः डॉ. हीना गावित
नंदुरबार एका नव्या रूपात विकसित होत असून, गेल्या दहा वर्षांत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश मोठ्या प्रगतीचे शिखरे पार करतोय. त्यातील नंदुरबार जिल्ह्याच्या आरोग्य क्षेत्राला एका शिखरावर घेऊन जाणारा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असून, या वैद्यकीय महाविद्यालयाचा कोनशिला व भूमिपूजन सोहळा २५ फेब्रुवारीला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे.
ज्याप्रमाणे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इमारतीचे काम गतीने आणि गुणवत्तेने झाले त्याच गतीने प्रत्येक शासकीय इमारतीचे व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त करताना तसा आदर्श घालून देण्याचे आवाहनही खासदार डॉ. हीना गावित यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.