वाण्याविहीर : अक्कलकुवा तहसील कार्यालयातील प्रशासकीय कामकाजाचे विभाजन करुन मोलगी येथे अप्पर तहसील कार्यालय सुरु करण्यास शासनाने मान्यता दिली असून, नवीन पद निर्मितीचे आदेश येईपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने मोलगी येथे अप्पर तहसील कार्यालय कार्यान्वित करावे, असे आदेश शासनाने दिले आहेत. अप्पर तहसील कार्यालयाच्या निर्मितीने सातपुड्याच्या कुशीतील नागरिकांची विविध दाखल्यांसाठी अक्कलकुवा तहसील कार्यालयात जाण्यासाठीची फरपट थांबणार आहे. (Upper Tehsil Office finally started at Molgi)
विधान परिषदेचे सदस्य आमदार आमश्या पाडवी यांनी अप्पर तहसील कार्यालयाच्या निर्मितीसाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्याअनुषंगाने अप्पर तहसील कार्यालयास मंजुरी देत असल्याचे शासनाने आदेशात म्हटले आहे. मोलगी तालुक्याच्या निर्मितीसाठी सातपुडावासीयांनीही अनेकवेळा आंदोलने करुन प्रशासन आणि शासनाला निवेदने दिली होती.
नंदुरबार जिल्ह्यात नंदुरबार, नवापूर, तळोदा, अक्कलकुवा, शहादा व अक्राणी असे एकूण सहा तालुके आहेत. भौगोलिकदृष्ट्या अक्कलकुवा तालुका दोन भागांमध्ये विभागलेला आहे. सातपुडा पर्वतरांगांच्या पायथ्याशी असणारा अक्कलकुवा एक भाग व सातपुडा पर्वत रांगांमध्ये असणारा मोलगी दुसरा भाग आहे.
२०११ च्या जनगणनेनुसार अक्कलकुवा तालुक्याची लोकसंख्या दोन लाख ४५ हजार ८६१ इतकी आहे. त्यामध्ये अक्कलकुवा भागाची लोकसंख्या १ लाख ४२ हजार ६१४ व मोलगी भागाची एक लाख तीन हजार २४७ इतकी आहे. अक्कलकुवा येथून मोलगीचे अंतर सुमारे ३५ किलोमीटर, तर अक्कलकुव्यापासून तालुक्यातील नर्मदा किनाऱ्यावरील गावे सुमारे ७० किलोमीटर अंतरापर्यंत आहेत.
अक्कलकुवा हा १०० टक्के आदिवासी तालुका आहे. वरील बाबींचा सर्वंकष विचार करुन राज्य शासनाची धोरणे व योजना ग्रामीण भागामध्ये सुलभरित्या उपलब्ध होण्यासाठी नाशिकच्या विभागीय आयुक्तांनी २ मे २०२३ च्या पत्रान्वये मोलगी येथे अप्पर तहसील कार्यालय स्थापन करण्यासाठी शासनास प्रस्ताव सादर केला होता. (latest marathi news)
तत्काळ अंमलबजावणीचे आदेश
अक्कलकुवा तालुक्याचे भौगिलिक क्षेत्र, मुख्यालयापासूनचे गावांचे अंतर, आदिवासीबहुल तालुका, आदिवासी भागातील दुर्गम परिस्थिती, तहसील कार्यालयावरील कामाचा अतिरिक्त ताण या बाबी विचारात घेता मोलगी भागातील नागरिकांना महसूल विभागामार्फत देण्यात येणाऱ्या सेवा जलद व नजिकच्या ठिकाणी उपलब्ध व्हाव्यात म्हणून नाशिक विभागीय आयुक्तांनी तत्काळ मोलगी येथे नियमित अप्पर तहसील कार्यालयाबाबत शासनाचा अंतिम निर्णय होईपर्यंत, तातडीची पर्यायी व्यवस्था म्हणून नंदुरबार जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिक तहसिलदारांशी चर्चा करुन मोलगी येथे सध्या उपलब्ध असलेल्या इमारती/जागांपैकी सुयोग्य अशा ठिकाणी तात्पुरते अपर तहसील कार्यालय तत्काळ सुरु करावे, असे आदेश शासनाने दिले आहेत.
सात मंडलांचा समावेश
अक्कलकुवा तहसील कार्यालयांतर्गत अक्कलकुवा, मोरंबा, खापर, डाब या चार महसुली मंडळातील ११५ महसुली गावे, तर मोलगी अप्पर तहसीलदार कार्यालयांतर्गत मोलगी, वडफळी, डाब या तीन मंडळातील एकूण ७९ गावांचा समावेश असणार आहे.
नवीन पद निर्मितीचे आदेश येईपर्यंत मोलगी अप्पर तहसील कार्यालयाकरीता सद्यस्थितीत एक अप्पर तहसीलदार, एक नायब तहसीलदार, एक अव्वल कारकून व चार महसूल सहायक (लिपीक-टंकलेखक) अशी एकूण सात पदे विभागीय आयुक्तांच्या अधिनस्त कार्यालयातून तत्काळ प्रतिनियुक्तीने नियुक्त करण्यात यावेत, असे आदेशात नमूद केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.