Nandurbar Accident News : शहादा तालुक्यातील कळंबू-सारंगखेडा रस्त्यावर एसटी बस व दुचाकी अपघातात एकजण ठार, तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी (ता. ३०) सकाळी साडेआठच्या दरम्यान घडली. कळंबू ते सारंगखेडादरम्यान वाघेश्वर माता मंदिराजवळ दोंडाईचाहून येणारी दोंडाईचा-पानसेमल बस (एमएच २०, बीएल ०७११) सारंगखेड्याकडून कळंबूमार्गे पानसेमलकडे जात होती, तर दुचाकी (एमएच ३९, एएफ ७४५७)वरील राजेंद्र झुलाल देवरे (वय ५५) पत्नी कमलाबाई देवरे व दीड वर्षाची नात काव्या दीपक देवरे हिच्यासह सारंगखेड्याकडे जात असताना वाघेश्वरी मंदिराजवळ दुचाकी व बसचा अपघात झाला. ( two injured in accident between ST bus and two wheeler at Kalambu Sarangkheda road )
या वेळी राजेंद्र देवरे यांना गळ्यावर व मानेवर गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने पोलिस व ग्रामस्थांच्या मदतीने दोंडाईचा येथे हलविण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. सोबत असलेली पत्नी कमलाबाई देवरे यांनादेखील डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे कळते. दीड वर्षाची नात काव्या हिच्या उजव्या डोळ्याला गंभीर इजा झाल्याने, दोघांवर धुळे येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, राजेंद्र देवरे यांचे दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयात डॉ. पूजा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. कळंबू येथे गुरुवारी सायंकाळी उशिरापर्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. याबाबत सारंगखेडा पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून, मृताचा भाऊ संजय झुलाल देवरे यांच्या फिर्यादीनुसार बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
सहाय्यक पोलिस निरीक्षक योगेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार अखिल पठाण तपास करीत आहेत. मृत राजेंद्र देवरे यांच्या मागे पत्नी, दोन विवाहित मुले, सुना, दोन भाऊ असा परिवार आहे.(latest marathi news)
खड्डे व काटेरी झुडपांमुळे अपघात
कुकावल, कळंबू ते सारंगखेडादरम्यान मोठ्या प्रमाणात खड्डे तसेच रस्त्याच्या दुतर्फा काटेरी झुडपे वाढलेली आहेत. यामुळे वाहन जवळ येईपर्यंत वाहनधारकांच्या निदर्शनास येत नसल्याने, हा रस्ता अपघातास कारणीभूत ठरत आहे. याआधीही या रस्त्यादरम्यान अपघात झाले आहेत. याबाबत संबंधित विभागास अनेक वेळा रस्ता नूतनीकरण व झाडेझुडपे काढण्याबाबत कळविले असता कुठलीही दखल घेतली जात नाही यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत आहे. संबंधित विभागाने याकडे जातीने लक्ष देणे गरजेचे असल्याचे ग्रामस्थांकडून बोलले जात आहे.
बालिकेचे नशीब बलवत्तर
आजी-आजोबांसोबत असलेली काव्या (माऊ) अवघ्या दीड वर्षाची बालिका अपघातात बचावली. या भीषण अपघातात बालिका फेकली गेल्याने तिच्या उजव्या डोळ्याला मोठी इजा झाली आहे. नशीब बलवत्तर म्हणून काव्या बचावली, मात्र तिच्या डोळ्याला कायमचे अपंगत्व आले आहे. अपघात एवढा भीषण होता, की बसच्या उजव्या बाजूचा पत्रा पूर्ण दाबला गेला आहे, दुचाकीच्या पुढच्या भागाचे नुकसान झाले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.