नाशिक : खनिकर्म मंत्री दादा भुसे, आमदार सुहास कांदे व खासदार हेमंत गोडसे यांच्या पाठोपाठ आता शहरातदेखील शिवसेनेला खिंडार पडण्यास सुरवात झाली आहे. गेल्या आठ दिवसांपासून शिंदे सेनेत येण्यासाठी आजी- माजी पदाधिकाऱ्यांसह नगरसेवकांना दूरध्वनीवरून गळ घातली जात असताना त्याचे पहिले फळ म्युनिसिपल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष व माजी नगरसेवक प्रवीण तिदमे यांच्या रूपाने मिळाले आहे.
तिदमे यांनी शिंदे सेनेत प्रवेश केल्यानंतर तत्काळ त्यांच्या प्रवेशाच्या मुहूर्तावर नाशिक महानगरप्रमुखपद बहाल केल्याने शिवसेनेच्या दुसऱ्या फळीला चुचकारण्याचा प्रयत्न झाला आहे. दरम्यान, तिदमे यांच्या पाठोपाठ शिवसेनेचे सतरा माजी नगरसेवक शिंदे गटात जाण्याच्या तयारीत असून त्यात सिडको विभागातील सर्वाधिक माजी नगरसेवकांचा समावेश असल्याचे बोलले जात आहे. (17 former corporator on way to CM Eknath Shinde group Nashik Latest Political New)
एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर चाळीस आमदारांनी त्यांना साथ दिली. राज्यात भाजपच्या मदतीने सत्ता आणल्यानंतर आता शिवसेनेला संघटनात्मक पातळीवर खिंडार पाडण्यास सुरवात करण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यातून शिंदे सेनेला हवा तसा प्रतिसाद मिळत नव्हता. परंतु, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेतील नाराजांना चुचकारण्याचा प्रयत्न होत आहे.
शिवसेनेत दुसरी फळी मोठ्या प्रमाणात नाराज आहे. त्या नाराजीचा फायदा शिंदे गटाकडून उचलला जात आहे. शिवसेनेला खिंडार पाडण्याचा कार्यभार खासदार गोडसे यांच्याकडे देण्यात आला आहे.
नाशिक तालुक्यात शिवसेना वाढविण्याचे काम करणारे अनिल ढिकले यांना खासदार गोडसे यांनीच शिंदे गटात घेतले. त्यानंतर त्यांच्याकडे जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली. त्यानंतर मंगळवारी (ता. २०) म्युनिसिपल कर्मचारी संघटनेची जबाबदारी असलेल्या प्रवीण तिदमे यांना शिंदे गटात खेचून महानगरप्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली.
सिडकोतील संख्या सर्वाधिक
तिदमे यांच्या पाठोपाठ पाथर्डी फाटा व सिडकोच्या मध्यवर्ती भागातील एक नगरसेवक शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. त्याचबरोबर एक महिला माजी नगरसेविकादेखील प्रवेश करणार होते. परंतु, वेट ॲन्ड वॉचची भूमिका घेत प्रवेश थांबले. परंतु, काही दिवसात जवळपास सतरा माजी नगरसेवक प्रवेश करणार असून, त्यात सिडकोतील संख्या सर्वाधिक असल्याचे बोलले जात आहे.
म्युनिसिपल सेनेत नवा चेहरा
नाशिक महापालिकेत सर्वात मोठी संघटना म्युनिसिपल कर्मचारी संघटना आहे. सेनेचे प्रमुखच शिंदे गटात गेल्याने तेथेही फूट पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भाजप व मनसेला म्युनिसिपल सेनेवर वर्चस्व हवे आहे. त्या वर्चस्वासाठी दोन्ही पक्ष पुढाकार घेतील.
तिदमेंच्या मागे कोण?
तिदमे हे माजी मंत्री व शिवसेनेचे उपनेते बबन घोलप यांना विचारल्याशिवाय कुठलाच निर्णय घेत नाही. घोलप यांनीच तिदमे यांच्याकडे म्युनिसिपल कर्मचारी संघटनेची सूत्रे सोपविली होती. त्यामुळे तिदमे यांनी शिंदे गटात प्रवेश करण्यापूर्वी घोलप यांच्याशी चर्चा केली नसेल का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
"शिवसेनेत साचले पण आले होते. शहरातील वरिष्ठ नेत्यांना नगरसेवक स्पर्धक वाटत होते. त्यातून कुठला कार्यक्रम घ्यायचा झाल्यास त्यांना विचारल्याशिवाय होत नव्हता. सामाजिक कामात अडथळे आणण्याचे प्रयत्न व्हायचे. त्यामुळे शिवसेना सोडण्याशिवाय पर्याय नव्हता."
- प्रवीण तिदमे, महानगरप्रमुख, शिंदे गट.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.