Walking Nashikkars esakal
नाशिक

2 लाख नाशिककरांचा ‘Walk Excercise’चा नित्यनियम!

विक्रांत मते

नाशिक : बदलत्या जीवनशैलीतून उत्पन्न होणाऱ्या ताणतणावासह मानसिक अन् शारीरिक समस्यांवर मात्रा म्हणून दोन लाख नाशिककर ‘वॉक एक्सरसाइज' (चालण्याचा व्यायाम) नित्यनियमाने करताहेत.

मुळातच, नाशिककरांमध्ये आरोग्यविषयक जाणीव जागृती झाल्याने जॉगिंग करण्याकडे कल होताच. पण मधल्या कोरोनाकाळात आरोग्याची जागृती वृद्धिंगत झाली आणि चालणाऱ्यांची संख्या नाशिकच्या एकूण लोकसंख्येच्या पाच टक्क्यांवरून दहा टक्के झाली. (2 lakh Nashik people routine of Walk Exercise for healthy lifestyle Nashik Latest Marathi News)

शहरातील जॉगिंग ट्रॅक, मैदाने, उद्याने आणि डोंगरांच्या पायथ्याशी चालणाऱ्यांची संख्या वाढत चाललीय. आरोग्यदायी जीवनाचा मंत्र जपणारे नाशिककर सकाळ अन् सायंकाळ चालून रक्तातील ‘वेस्टेड डिटॉक्सिन' घामावाटे बाहेर फेकताहेत. धार्मिक, औद्योगिक व वाइन नगरी म्हणून प्रसिद्ध असलेले नाशिक आता आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे शहर बनले आहे.

सर्वाधिक उद्याने, जॉगिंग ट्रॅक आहेतच, त्याच्याजोडीला शुद्ध हवा असल्याने रक्तामध्ये शुद्ध हवेतील ऑक्सिजन जिरवण्यासाठी नाशिककर दररोज घराबाहेर पडतात. शहरातील जवळपास २२ छोटे-मोठे जॉगिंग ट्रॅक, उद्याने, पांडव लेणी, चामर लेणी, सुळा व रामशेज डोंगर, जलसंपदाचे कालवे, गंगापूर धरण, नव्याने तयार होत असलेल्या ‘गेटेड कम्युनिटी स्कीम'चे ट्रॅक आदी ठिकाणी नजर टाकल्यास त्यातून सकारात्मकतेचे वास्तव डोळ्यांपुढे उभे राहते. सुदृढ आरोग्यासाठी नाशिककरांची चालण्याची सवय देशात आदर्शवत ठरत आहे.

हवामान स्वच्छ असले, तरी बदलत्या जीवनशैलीमुळे आहारातील बदल व ताणतणावांमुळे मधुमेह व उच्च रक्तदाबाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. परिणामी, आरोग्याच्या समस्यांवर मात करण्यासाठी चालणे हाच चांगला व विनाखर्चाचा मार्ग असल्याने नाशिककरांची चालण्याची सवय सुदृढ आरोग्याचा मंत्र देणारी ठरत आहे.

शहरातील ‘वॉकरसाइजर्स'

शहरातील महत्त्वाचे जॉगिंग ट्रॅकची लांबी मीटरमध्ये पुढीलप्रमाणे असून, (कंसात ट्रॅकवर रोज चालणाऱ्या नाशिककरांची संख्या दर्शवते) : हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान- ८०० (दहा हजार), कृषीनगर- ९०० (पाच हजार), हिरावाडी- एक हजार (दोन हजार),

शिखरेवाडी- ८०० (तीन हजार), अशोका- ८०० (एक हजार), इंदिरानगर- ७०० (पाच हजार), गोविंदनगर- ४०० (एक हजार), गांधीनगर फुटबॉल मैदान- ३५० (५००), मुक्तिधाम मैदान- ३०० (दोन हजार), समर्थ जॉगिंग ट्रॅक-६०० (तीन हजार), पाइपलाइन रोड- ७०० (चार हजार), संभाजी स्टेडियम- ९०० (पाच हजार), तपोवन- एक हजार (तीन हजार), जेतवननगर- ८०० (एक हजार), निलगिरी बाग कालवा- तीन हजार (दोन हजार), महात्मानगर- ४०० (५००), सिटी सेंटर मॉल- २०० (३००). याशिवाय शहरामध्ये ४९३ उद्याने विकसित करण्यात आली आहेत. या उद्यानाबरोबर पांडव लेणी, चामर लेणी, १६ डोंगर व रामशेज किल्ला येथे जवळपास दहा हजार शहरवासीय सकाळ, सायंकाळ चालतात.

शहरातील विभागनिहाय उद्यानांची संख्या पुढीलप्रमाणे असून, (कंसात त्याचे क्षेत्रफळ चौरसमीटरमध्ये दर्शवते) : पश्चिम- ५७ (एक लाख साठ हजार दोनशे पन्नास), पूर्व विभाग- ७२ (एक लाख एकसष्ट हजार ब्याऐंशी), नाशिक रोड- १६० (तीन लाख सोळा हजार ४६), सिडको- ७२ (एक लाख बावन्न हजार नऊशे छपन्न), सातपूर- ४२ (एक लाख सत्याऐंशी हजार पाचशे तेरा), पंचवटी- ९० (दोन लाख पंचवीस हजार ३९).

चालण्याचे आयुर्वेदातील महत्त्व

दररोज पायी चालणे हे आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे, असे आयुर्वेदात म्हटले असून, जेवण झाल्यानंतर शतपावली (शंभर पावले चालणे) करण्याचा सल्ला आयुर्वेदतज्ज्ञ देतात. शतपावलीमुळे जेवण लवकर पचण्यास मदत होते. त्यामुळे पायी चालणे हे आरोग्याच्या दृष्टीने सर्वांत फायदेशीर आणि सोपा उपाय आहे. एका अभ्यासात दररोज सात हजार पावले चालल्याने आयुष्य वाढते आणि मृत्यूचा धोकाही ५० ते

७० टक्क्यांनी कमी होतो, असे दिसून आले आहे. जामा नेटवर्क

ओपन जर्नलमध्ये याबाबतचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. दररोज अर्धा तास चालण्यातून पचनशक्ती सुधारते आणि अधिक ‘कॅलरीज' खर्च होतात. चालणे हा हृदयासाठी सोपा व्यायाम मानला जात असून, वजन संतुलित राहण्यास मदत होते. मानसोपचारतज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार दररोज काहीवेळ चालण्याने सुस्ती आणि अधिक चिंतेची लक्षणे दूर होतात.

अमेरिकन जर्नल ऑफ प्रिव्हेन्टीव्ह मेडिसिनच्या एका अहवालात ४९ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या आणि सांधेदुखी असलेल्या एक हजार ५६४ व्यक्तींवरील संशोधनाचा उल्लेख आहे. दररोज पंधरा मिनिटे फिरण्यास सांगण्यात आले होते. काही आठवड्यानंतर अनेकांच्या सांधेदुखी कमी होऊन शरीरात उत्साह वाढल्याचे अहवालात नमूद करण्यात आले.

त्याचबरोबर चालण्यातून शरीरात इन्सुलिनचा वापर योग्य होतो आणि मधुमेह होण्याची शक्यता असेल अथवा त्याचा त्रास असल्यास आरोग्यदायी वाटते. मणक्यांच्या आजारावर चालणे लाभदायी ठरत असल्याचे आयुर्वेदिकतज्ज्ञ सांगतात.

वेळेनुसार चालण्याचे फायदे

- दहा मिनिटे चालल्यास रक्तातील साखर नियंत्रण होते

- वेगाने वीस मिनिटे चालल्यास कोलेस्टोरल व मधुमेह कमी होत हृदयाची क्षमता वाढते

- दररोज तीस मिनिटे चालल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढते

- चाळीस मिनिटे चालल्यास तणाव कमी होऊन स्नायूंना मजबुती येते

- वेगात ५० मिनिटे चालल्यास वजन कमी होण्यास मदत होते

- तासभर चालल्यास आयुष्यमान वाढण्यास मदत होते

"दररोज चालल्याने तणावापासून मुक्ती मिळते. इंडो फिल्म तयार झाल्याने समाधानी वृत्ती तयार होते. जेवणानंतर चालल्याने जठरामध्ये अधिक प्रमाणात ‘गॅस्टिक एनझीन' तयार होतात व अन्नातील पोषक घटक अधिक प्रमाणात शरीरात शोषून घेतले जातात. त्यामुळे पचनशक्ती वाढते व बद्धकोष्ट कमी होते. जेवणानंतर रक्तात साखरेचे प्रमाण वाढते. त्यामुळे चालल्याने साखरेचे प्रमाण नियंत्रणात आणणे शक्य होते. अन्न हळूहळू जठरांमधून गृहणीमध्ये जाते व चया-पचय क्रियाचा वेग वाढतो. त्यामुळे आंबट ढेकर, पोटातला गुबारा, पोटातील आम्लता हे त्रास चालल्याने कमी होतात. साधारणतः ४५ मिनिटे चालले पाहिजे."

- डॉ. नीलेश चव्हाण (संचालक, पायोनिअर हॉस्पिटल)

"नाशिककर चालताहेत. चालण्यात वाढ होत आहे. आरोग्याच्या दृष्टीने चांगली लक्षणे आहेत. चालल्याने संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो. रक्ताभिसरण प्रक्रिया चांगली होते. रक्तामधील साखर कमी होण्याबरोबरच रक्तदाब नियंत्रणात राहतो. भूक लागणे व दिवसभर उल्हासित वाटते. हा माझा अनुभव आहे." - अश्विनी न्याहारकर (सामाजिक कार्यकर्त्या)

"बदलत्या जीवनशैलीमुळे आहार व विहारात बदल झालाय. शारीरिक हालचाली कमी झाल्यात. परिणामी, व्याधी जडत आहेत. अनियंत्रित रक्तदाब व मधुमेहाचे प्रमाण वाढले आहे. मात्र नियमित चालल्याने आरोग्याच्या समस्या नियंत्रणात आणता येणे शक्य आहे. चालणे, पोहणे व सायकलिंगच्या माध्यमातून आजार नियंत्रणात आणता येतात." - विद्या चव्हाण (विधिज्ञ)

"चालणे हा पचनाची प्रक्रिया गतिमान करण्याचा सर्वांत प्रभावी मार्ग आहे. तासाला आठ किलोमीटर अथवा त्यापेक्षा अधिक वेगाने चालल्यास गंभीर आजारांचा धोका कमी होण्यास मदत होते. दहा मिनिटे चालल्याने शरीराला फायदा होतो. आठवड्याला दहा मैल चालल्यास २२६ किलो कार्बनडाय ऑक्साईडचे उत्सर्जन थांबते. भारतीय व्यक्ती ४ हजार २९७ पावले चालतात. मात्र हे प्रमाण फारच कमी आहे." - कृष्णा पडोळ (मॅरेथॉनपटू)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election Voting 2024: शंभरी पार केलेल्या वृद्धांमध्ये मतदानाचा उत्साह; तुम्ही बजावला का लोकशाहीचा हक्क?

Baramati: राष्ट्रवादी व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यात बाचाबाची; शर्मिला पवार व अजित पवारही पोहोचले मतदान केंद्रावर...

नेमकं प्रकरण काय? ए आर रहमानच्या घटस्फोटानंतर त्याच्या ग्रुपमधील गिटारीस्ट मोहिनी डेदेखील पतीपासून विभक्त

"तो व्रण कायमच मला..." परदेशात गंभीर जखमी झालेल्या अभिनेत्रीने पोस्टमधून सांगितली हेल्थ अपडेट ; "चेहरा विद्रुप झाला.."

Maharashtra Assembly Election 2024 Voting Live: बीडमधील विडा गावात मतदान केंद्राबाहेर दोन गटामध्ये हाणामारी

SCROLL FOR NEXT