Nashik Accident News : मुळाणे (ता. बागलाण) येथे विहिरीतून गाळ काढत असताना क्रेनचा वायर रोप तुटल्याने तीन युवा कामगारांचा विहिरीत पडून जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना आज रविवारी (ता.४) दुपारी घडली.
या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले तीनही तरूण मुळाणे गावातीलच असून ते विवाहित होते, त्यांचा नुकताच सुरू झालेला संसार उघड्यावर पडल्याने तालुक्यात शोककळा पसरली आहे. (3 youths died due to crane collapse in baglan nashik accident news)
मुळाणे (ता. बागलाण) येथील शेतकरी यशवंत सखाराम रौंदळ यांनी आपल्या विहिरीतील गाळ काढण्याचे काम गावातीलच क्रेन मालक विनायक नाडेकर यांना दिले होते. रविवारी (ता.४) नेहमीप्रमाणे दुपारी दीडच्या सुमारास गणेश तुळशीराम नाडेकर (२६), नितीन रामदास अहिरे (२७), गणेश विनायक नाडेकर (२८) हे जेवण करून विहिरीतील गाळ काढण्यासाठी क्रेनद्वारे विहिरीत उतरत होते. याचवेळी अचानक वायर रोप तुटल्याने तीनही तरुण विहिरीत कोसळले. ५० ते ५५ फूट अंतरावरून खोल विहिरीत पडल्याने तिन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला.
परिसरातील नागरिकांना ही घटना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत विहिरीत पडलेल्या तिन्ही तरुणांना विहिरीबाहेर काढले. मात्र तोपर्यंत तीनही तरुणांचा मृत्यू झालेला होता. घटनेची माहिती मिळताच सटाण्याचे पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी घटनास्थळी धाव घेतली. तिन्ही तरुणांचे मृतदेह सटाणा ग्रामीण रुग्णालयात विच्छेदनासाठी आणण्यात आले.
यावेळी ग्रामीण रुग्णालय परिसरात मोठी गर्दी उसळली होती. दुर्घटनेत मरण पावलेले तिन्ही युवक हे विवाहित असल्याने तिघांचा नवा संसार उघड्यावर पडला आहे. तालुक्यासह मुळाणे गाव परिसरात या हृदयद्रावक घटनेमुळे शोककळा पसरली आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.