Ayodhya Ram Mandir esakal
नाशिक

Ayodhya Ram Mandir : 500 वर्षे, 20 पिढ्यांची स्वप्नपूर्ती..! कारसेवकांच्या मनात कृतार्थतेची भावना

अयोध्येत विराजमान असलेल्या रामलल्लाच्या मोहक मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेचा क्षण जवळ आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Ayodhya Ram Mandir : अयोध्येत विराजमान असलेल्या रामलल्लाच्या मोहक मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेचा क्षण जवळ आला आहे, तसतसा देशभरातील रामभक्त भावुक व भावविभोर होत आहे. जवळपास पाचशे वर्षांमध्ये २० पिढ्यांनी पाहिलेले स्वप्न प्रत्यक्षात येत असताना गेल्या ३०-३५ वर्षांत हा लढा निर्णायक पातळीवर नेण्यासाठी सर्वस्व पणाला लावलेल्या देशातील लक्षावधी कारसेवकांसाठी ही तपस्येची फलश्रुती होत आहे.

यानिमित्त नाशिक शहर व जिल्ह्यातून १९९० पासून कारसेवेला गेलेल्या कारसेवकांशी बोलून त्यांच्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न केला. (500 years 20 generations of dreams fulfilled for ayodhya ram mandir nashik news)

नाशिक जिल्ह्यातून १९९० व १९९२ या काळात जवळपास दीड हजारांवर कारसेवक अयोध्येला गेले होते. काहींनी प्रत्यक्ष वादग्रस्त वास्तूचे पतन होताना डोळ्यांनी पाहिले. काहींनी त्यात खारीचा वाटा उचलला, काहींविरोधात पोलिसांत गुन्हे दाखल झाले. सरकारकडून आंदोलन मोडीत काढण्यासाठी उचललेली कठोर पावले पाहून काहींनी या लढ्यासाठी आपले योगदान आणखी तीव्र करण्याच्या हेतूने संकल्प सोडले.

त्यात काहींनी चपला सोडल्या, काहींनी शेंडी न कापण्याच्या प्रतिज्ञा केल्या. त्यांच्या प्रत्यक्ष, प्रत्यक्ष पाठिंब्याच्या बळावर आज संपूर्ण देश राममय झाला आहे. जगभरात या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची उत्सुकता लागून आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार रामलल्ला नव्या रूपात विराजमान होत आहेत. या सर्व धामधुमीत या कारसेवकांच्या मनात कृतार्थतेची भावना आहे.

या गर्दीत आपल्याला बोलावणे आले की नाही, याची पर्वा आणि अभिलाषाही नाही. मंदिर होत आहे आणि सवडीनुसार आपण तेथे दर्शनाला जाणार आहोत, मागे वळून पाहताना आपण भूतकाळात जे केले ते रामलल्लाने आपल्या हातून करून घेतले आहे, एवढीच एक भावना असल्याचे दिसत आहे. आपण या लढ्यातील एक सैनिक होतो.

सैनिकाची भूमिका आपण निभावली व आपल्या लढ्याला यश आले, यापलीकडे या कारसेवकांची कोणतीही भावना नाही व कोणतीही अपेक्षा नाही. पाचशे वर्षांच्या या लढ्याला आताच यश मिळण्यामागे या कारसेवकांची आपल्या कार्याप्रती असलेली समर्पणाची भावना महत्त्वाची असल्याचे त्यांच्याशी बोलल्यानंतर लक्षात येते.

कारसेवेवरून आल्यावर झाली अटक

''नाशिकमधील विश्व हिंदू परिषद व इतर हिंदुत्ववादी संघटनांच्या कारसेवकांच्या पथकासह ६ डिसेंबर १९९२ च्या कारसेवेला हजर होतो. त्या वेळी वादग्रस्त वास्तूच्या घुमटावर महाराष्ट्रीयन कारसेवकांची संख्या अधिक होती. त्यात मीही सहभागी होतो. कारसेवा करून नाशिकला आल्यावर अनेक कारसेवकांना अटक करण्यात आली. त्यात माझाही समावेश होता. त्या वेळी विश्व हिंदू परिषदेचे कार्यालय ‘सील’ करून पोलिसांनी ८० हजार रुपये जप्त केले होते.

गेले ३०-३५ वर्षे पाहिलेले स्वप्न पूर्ण होत आहे. श्रीरामाचे मंदिर पूर्ण होऊन तेथे श्रीरामाची मूर्ती प्राणप्रतिष्ठा मोठ्या उत्साहात होत आहे. आज श्रीराम मंदिर व अयोध्येचा सोहळा देशाच्या केंद्रस्थानी आहे. ‘जय श्रीराम’ घोषणा देणे एक गुन्हा असण्याचा काळ ते आजचा काळ हा बदलता प्रवास पाहून मन भरून येत आहे. कारसेवकांनी पाहिलेल्या स्वप्नाची पूर्तता होत असून, लवकरच अयोध्येत जाऊन श्रीरामाचे दर्शन घेणार आहे.''- गणेश कुलकर्णी (दोडी बुद्रुक, ता. सिन्नर, जि. नाशिक)

मंदिरासाठी ३४ वर्षे अनवाणी

धुळे येथून २२ जणांच्या पथकाबरोबर १९९० च्या कारसेवेला गेलो होतो. प्रत्यक्ष अयोध्येला पोचण्यासाठी मोठ्या अडचणी आल्या. अनेकदा रेल्वेतून उतरून पायी, नावेने, खासगी वाहनांनी प्रवास करीत आमचे पथक अयोध्येत पोहोचले. उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव कारसेवकांच्या विरोधात होते. त्यांनी रेल्वेने, रस्त्याने येत असलेल्या कारसेवकांना ठिकठिकाणी ताब्यात घेतले होते. त्यानंतरही लक्षावधी कारसेवक अयोध्येत पोहोचले होते.

कारसेवा करण्यासाठी प्रत्यक्ष घटनास्थळी कारसेवक गेले असता पाच-सहा जण वादग्रस्त वास्तूच्या घुमटावर चढले. त्यानंतर झालेल्या आंदोलनाची तीव्रता पाहून श्रीराम मंदिर त्याच जागेवर उभारण्याची भावना अधिक तीव्र झाली. ती भावना कायम तेवत ठेवण्यासाठी श्रीराम मंदिर होईपर्यंत अनवाणी राहण्याचा संकल्प केला. आता राम मंदिर पूर्ण होऊन प्रत्यक्ष रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होत आहे. रामलल्लाचे दर्शन घेऊनच अयोध्येत या संकल्पाची सांगता केली जाईल.''- लालचंद टाटिया (मूळ रहिवासी धुळे, सध्या नाशिक)

जखमी अवस्थेत घरी

''विश्व हिंदू परिषदेने जाहीर केलेल्या ६ डिसेंबर १९९२ च्या कारसेवेसाठी येवल्यातील कारसेवकांच्या ४० जणांच्या पथकाबरोबर गेलो. त्या वेळी केवळ १८ वर्षे वय असल्याने घरच्यांच्या मनात काळजी होती. मात्र, वडिलांनी परवानगी दिली. अयोध्येत पोहोचल्यावर कारसेवेच्या वेळेस नेत्यांची भाषणे सुरू असतानाच काही जण त्या वादग्रस्त इमारतीवर चढले. त्यांनी हातात असेल, त्या साहित्याने पाडकाम करण्यास सुरवात केली.

आपण एवढ्या दूरवरून आलो आहोत, तर सहभाग घेतला पाहिजे, या विचाराने मीही तिकडे धाव घेतली. आत जाऊन पाडकाम करीत असतानाच वरून इमारतीचा मोठा भाग कोसळला. डोक्याला व पायाला मार लागला होता. तेथे असलेल्या प्रथमोपचार केंद्रात माझ्यावर किरकोळ उपचार झाले. आमच्या पथकातील कारसेवकांनी खांद्यावर उचलून मला रेल्वेस्थानकापर्यंत नेले. तेथून घरापर्यंत सुरक्षित आणले.

राम मंदिर आंदोलन त्यानंतर न्यायालयात गेल्याने निकाल कधी लागणार, तोपर्यंत आपण जिवंत असू का, असे वाटायचे. मात्र, आता प्रत्यक्ष राम मंदिर पूर्ण होऊन मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत आहे, हा सर्वाधिक आनंदाचा क्षण आहे. महिनाभरात रामलल्लाचे दर्शन घेणार आहोत.''- ज्ञानेश्वर सांबर, येवला

अयोध्येत आडमार्गाने पोहोचलो

''राम मंदिराच्या आंदोलनासाठी १९९० व १९९२ च्या दोन्ही कारसेवांना मी उपस्थित होतो. १९९० च्या कारसेवेत आम्ही भोपाळपासून पायी मिळेल त्या गाडीने अयोध्येपर्यंत आडमार्गाने पोहोचलो. कारसेवक अयोध्येत येऊ नये म्हणून अनेक रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. मात्र, विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल व हिंदुत्ववादी संघटनांचे सूक्ष्म नियोजन होते.

त्याचप्रमाणे ६ डिसेंबर १९९२ च्या कारसेवेलाही देशभरातून पाच लाखांवर कारसेवक आले होते. आता अयोध्येला भव्य श्रीराम मंदिर होत असून, रामलल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा हात असल्याने ध्येयपूर्तीचा मोठा आनंद आहे. जीवनाचे सार्थक झाल्याची भावना असून, आमचे जीवन हे धन्य व पावन झालेले आहे. आता आम्ही सर्व कारसेवक फेब्रुवारी २०२४ मध्ये रामलल्लाच्या दर्शनासाठी जात आहोत.''- रमेश प्रताप मानकर, गोसेवक, नाशिक

जीवनाचे सार्थक

''१ डिसेंबरला अयोध्येत कारसेवेसाठी पोहोचलो. सुरवातीला वाटले, तेथे जाऊन मंदिर निर्माणासाठी काम करावे लागेल. मात्र, तेथील परिस्थिती अत्यंत वेगळी होती. संपूर्ण देशभरातून लाखोंच्या संख्येने कारसेवेसाठी तरुण दाखल झाले होते. सुरवातीला आम्हाला ‘शरयू’ची वाळू आणायला सांगितले गेले होते. ६ डिसेंबरचा सूर्योदय एका नव्या पर्वाची सुरवात करणारा होता. पोलिसांचाही बंदोबस्त होता. सभा सुरू असताना काही कारसेवक हे हनुमान गढीच्या बाजूने वादग्रस्त वास्तूवर चढले.

‘जय श्रीराम’चा नारा द्यायला सुरवात केली. आम्हीही सभास्थळावरून तिकडे गेलो. काही क्षणात वादग्रस्त वास्तूवरील घुमट कोसळला. हातात विटा घेऊन मंदिर निर्माणाचा उत्साह सर्वांनी साजरा केला. आज राम मंदिराचे निर्माण कार्य पूर्ण होऊन रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होत आहे. हे सर्व डोळ्यांनी पाहताना जीवनाचे सार्थक झाले, असे वाटते.''- अशोक जुनागडे

जिवंत येण्याची खात्री नव्हती

''१९९० मध्ये पहिल्यांदा कारसेवेसाठी अयोध्येला निघालो. तणावग्रस्त वातावरणात जिवंत परत येऊ की नाही, याची खात्री नव्हती. त्यानंतर १९९२ मध्ये पाच ते दहा लाख कारसेवक दाखल झाले होते. डिसेंबरच्या सुरवातीला संघशिस्तीचे पालन करीत कार्य केले. मात्र, ६ डिसेंबर १९९२ ला संयमाचा उद्रेक झाला. हनुमान गढीच्या दिशेने आम्ही कूच केली, घोषणा दिल्या. उपस्थित कारसेवकांनीही घोषणा दिल्या.

पोलिस बंदोबस्त होता. मात्र, इतक्या संख्येने कारसेवकांनी कूच केली. रामलल्लाची मूर्ती ठेवून आरती करण्यात आली. सायंकाळच्या सुमारास संपूर्ण अयोध्येत घरोघरी दिवे लावून उत्सव साजरा करण्यात आला. आज मंदिर निर्माण होत आहे, हे पाहून आनंद होतोय. हिंदू संस्कृती जगभरात रुजली पाहिजे, असे वाटते.''- अनिल चांदवडकर

कारसेवेला अभिमानाची बाब

''बजरंग दलाचे काम करीत असताना २००४ च्या कारसेवेला गेलो होतो. रस्त्यात प्रतापगड येथे स्थानबद्ध करण्यात आले. त्यानंतरही तेथून निसटून अयोध्येत पोहोचून त्या वेळी कारसेवेनिमित्त झालेल्या सभेला उपस्थित होतो. श्रीरामाच्या जन्मभूमीवर केलेले अतिक्रमण पाचशे वर्षांनी संपुष्टात आल्याचा अभिमान वाटत आहे. लवकरच अयोध्येत जाऊन श्रीरामाचे दर्शन घेणार आहे.'' - अंकुश पवार

अयोध्येतील दिवाळी अनुभवली

''१९९० मध्ये पहिल्यांदा कारसेवेसाठी गेलो. मात्र, त्या वेळी आम्हाला अयोध्येत पोहोचण्यास विलंब झाला होता. तेथील परिस्थितीचे वर्णन ऐकून अंगावर शहारे आले होते. त्यामुळे १९९२ मध्ये कारसेवा करण्याची संधी मिळाली, तेव्हा आम्ही नियोजन करून आधी पोहोचलो. देशभरातून लाखो कारसेवक अयोध्येत दाखल झाले होते. ६ डिसेंबरला सकाळी अशोक ऋतंबरा यांचे व्याख्यान सुरू होते अन् त्याचवेळी वादग्रस्त वास्तूवर काही युवक चढले.

त्यांच्याकडे पाहून सभास्थळी असलेले सर्वच कारसेवक वादग्रस्त वास्तूच्या दिशेने धावले. हाती येईल त्या वस्तूने वादग्रस्त वास्तू जमीनदोस्त केली. या घटनेने सर्वच कारसेवकांमध्ये उत्साह संचारला होता. सायंकाळी अयोध्येत जणू दिवाळी साजरी करण्यात आली. वादग्रस्त वास्तू पाडण्यापासून ते राम मंदिर निर्माण अन् रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा पाहण्याचे भाग्य मला या जन्मात मिळाले, याचा सार्थ अभिमान वाटतो.''- डॉ. निशिगंधा मोगल

नाशिकमधील प्रमुख कारसेवक

डॉ. झुंबर भंदुरे, दादासाहेब रत्नपारखी, राजाभाऊ मोगल, एकनाथ शेटे, बंडोपंत जोशी, डॉ. निशिगंधा मोगल, रघुनाथ कुलकर्णी, नाना जुनागडे, राजू गिते, बाबा फडके, मदन भंदुरे, गणेश कुलकर्णी, अनिल चांदवडकर, कैलास गायकवाड, बन्सी जोशी, बापू येवला, रमेश मानकर, रमेश पाटील, मृत्युंजय कापसे, ज्ञानेश्वर औसरकर, भीमराव गारे, सुधाकर लेले, अशोक कदम, विजय अदयप्रभू, मिलिंद हिरे, रामभाऊ महाजन, मनोज जोशी, दिलीप बेलगावकर, नाना बच्छाव, शेखर मैंद, नारायण जाधव, धनंजय पुजारी, सुधीरदास पुजारी, सुशीला रास्ते, श्रीधर रहाणे, अशोक लोहिया, सुभाष सस्कर, बाजीराव सस्कर, आप्पा जटे, अण्णा पत्रे, आशीष भोजने, मुकुंद दीक्षित, मदन भंदुरे, गणेश ठाकूर, ज्ञानेश्वर गायकवाड, लालचंद टाटिया, समीर देव, अविनाश शिरसाट, प्रफुल्ल सांबरे, चंद्रभान गांगुर्डे, सुशीला ब्राह्मणकर, योगेश चिटणीस, प्रभाकर पाठक, सुधाकर भंदुरे, सतीश दीक्षित

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: भारताचा वर्षातील शेवटच्या T20I सामन्यात विक्रमी विजय! द. आफ्रिकेविरुद्ध मालिकाही जिंकली

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

Rohit Sharma दुसऱ्यांदा झाला बाबा! रितिकाने दिला मुलाला जन्म; हिटमॅन आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार?

Record Breaker: Sanju Samson ची शतकासह विश्वविक्रमाला गवसणी; तिलक वर्मासह नोंदवले मोठे विक्रम अन्... Video

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

SCROLL FOR NEXT