इंदिरानगर (जि. नाशिक) : सुखदेव विद्यामंदिराच्या मैदानावरील गवतावर आपल्या मेंढ्यांना घेऊन उतरलेल्या मेंढपाळ (Shepherd) कुटुंबाकडून विद्यालयातील सातवीच्या विद्यार्थ्यांनी जोडधंदा या विषयांतर्गत मेंढीपालन व्यवसायाबाबत माहिती जाणून घेतली.
मुळचे अमरावती पाडे (ता. सटाणा) येथील मेंढपाळ सुनील पानसरे व भाऊसाहेब जाधव हे आपल्या सुमारे २०० मेंढ्या व ६ घोडे घेऊन गवताच्या शोधात नाशिक शहरातून पुढच्या गावी जात असताना रात्रभर सुखदेव प्राथमिक शाळेच्या मैदानावर आपला वाडा मांडून मुक्कामी होते. (7th class was held at mansion of shepherd family nashik latest Marathi news)
सातवी भूगोल पुस्तकात कृषी व कृषी संबंधित जोडधंदे हा पाठ आहे. मुख्याध्यापक नितीन पाटील यांनी सातवीच्या विद्यार्थ्यांना मेंढपाळांच्या वाड्यावर नेले. मेंढपाळ पानसरे व जाधव यांनी मेंढीपालन या पारंपरिक व्यवसायाविषयी सविस्तर माहिती देताना मांस, लोकर, खत व दुध या प्रमुख उत्पन्नासाठी मेंढीपालन हा व्यवसाय करत असल्याचे सांगितले.
पावसामुळे मेंढयामध्ये चिखल्या या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने प्राथमिक औषधोपचार कसे करावेत याची माहिती त्यांनी दिली. एक खंडी मेंढ्या म्हणजे २४ मेंढ्या या ग्रामिण परिमाणाची ओळख करून घेत वर्गशिक्षिका रूपाली सोनटक्के यांच्या मदतीने विद्यार्थ्यांनी विविध प्रश्नांची उत्तरे शोधली.
वाड्यावरील मेंढपाळ संगीता जाधव यांच्या आग्रहाच्या चहाचा व आदरातिथ्याचा स्वीकार करून शिक्षक पुन्हा एकदा आपल्या शाळेकडे वळाले. सुखदेव एज्युकेशन संस्थेचे सरचिटणीस संजय काळे यांनी अनोख्या अध्यापन उपक्रमाचे कौतुक केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.