Nashik News : दुर्मिळ आणि गुंतागुंतीची रोबोटिक शस्त्रक्रिया एचसीजी मानवता कॅन्सर सेंटरमधील डॉक्टरांच्या टीमने यशस्वी केली आहे. मूत्रपिंडाच्या कर्करोगाने ग्रासलेल्या ६१ वर्षीय रुग्णाच्या उजव्या मूत्रपिंडात तब्बल ९३० ग्रॅम वजनाची गाठ रोबोटिक शस्त्रक्रियेद्वारे काढली आहे.
उपचारानंतर चौथ्या दिवशी रुग्णाला घरी सोडले. दरम्यान भारतात प्रथमच अशी शस्त्रक्रिया पार पडल्याची माहिती रुग्णालयातर्फे देण्यात आली आहे. (930 gram tumor removed from kidney by robotic surgery at HCG Manavata cancer centre First surgery in India Nashik News)
एचसीजी मानवता कॅन्सर सेंटरचे एमडी व चीफ ऑफ सर्जिकल ऑन्कॉलॉजी ॲण्ड रोबोटिक सर्व्हिसेस प्रा. डॉ. राज नगरकर म्हणाले, की एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर येथे आजवर नऊशेहून अधिक यशस्वी रोबोटिक शस्त्रक्रिया झाल्या आहेत.
नुकतीच पार पडलेली शस्त्रक्रिया ही रुग्णालयातील गुणवत्तापूर्ण सेवा अधोरेखित करणारी आहे. विशेषतः सीएमआर व्हर्सियस सर्जिकल रोबोटिक सिस्टीमवर अशा स्वरूपाची शस्त्रक्रिया दुर्मिळ असून, भारतातील ही पहिलीच शस्त्रक्रिया आहे.
६१ वर्षीय रुग्णाला लघवीतून रक्त जाण्याची तक्रार असल्याने एचसीजी मानवता कॅन्सर सेंटरमध्ये दाखल केले होते. विविध तपासण्या करताना उजव्या मूत्रपिंडाला कर्करोगाचे (रेनल सेल कार्सिनोमा) निदान झाले.
रुग्णालयातील ऑन्कॉलॉजी टीमने मूत्रपिंडातील गाठ काढण्याचे ठरविले. परंतु रुग्णाचे वय आणि हायपरटेन्शनसह अन्य आजारांचे आव्हान होते. शस्त्रक्रियेदरम्यान भुलेचा वापर काळजीपूर्वक करावा लागणार होता.
वैद्यकीय स्थिती लक्षात घेता टीमने रोबोटिक शस्त्रक्रिया करण्याचे निश्चित केले. एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर येथे उपचारासाठी दाखल होण्यापूर्वी व त्यांच्या नातेवाइकांनी देशभरातील विविध रुग्णालयांना भेट देत सल्ला घेतला.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
बहुतांश रुग्णालयांनी ‘ओपन सर्जरी’चा सल्ला दिला. गुंतागुंत अधिक असल्याने, १५ बाय १० सेंटिमीटर आकाराची ९३० ग्रॅम वजनाची मोठी गाठ मूत्रपिंडातून काढताना रुग्णाच्या जिवाला धोका होता.
एचसीजी मानवता कॅन्सर सेंटरच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी सुचविलेल्या रोबोटिक शस्त्रक्रियेच्या पर्यायाची निवड रुग्ण, त्याच्या नातेवाइकांनी केली. ठरल्याप्रमाणे वयोवृद्ध रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.
रोबोटिक शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णाच्या पोटाला केवळ ५ मिलिमीटरचा चिरा देण्यात आला. यामुळे रक्तस्राव कमी होऊन गुंतागुंतदेखील कमी झाली. संसर्गाचा धोका टळल्याने अन्य संभाव्य आजारांची लागण टाळता आली.
छोट्या चिऱ्यामुळे रुग्णाला शस्त्रक्रियेदरम्यान, त्यानंतरच्या काळातील वेदना कमी झाल्या. रुग्ण व त्याच्या नातेवाइकांकडून अत्यंत समाधान व्यक्त केले आहे. हॉस्पिटलचे एमडी व चीफ ऑफ सर्जिकल ऑन्कॉलॉजी ॲण्ड रोबोटिक सर्व्हिसेस प्रा. डॉ. राज नगरकर, ऑन्को व रोबोटिक सर्जन डॉ. विकास जैन, प्लॅस्टिक सर्जन डॉ. राजेंद्र धोंडगे, भूलतज्ज्ञ डॉ. नयना कुलकर्णी यांच्यासह परिचारिकांची टीम व अन्य कर्मचाऱ्यांनी शस्त्रक्रिया यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.
"नियोजनबद्ध पद्धतीने ज्येष्ठ नागरिक रुग्णावर रोबोटिक शस्त्रक्रिया केली. रुग्णाने उपचाराला सकारात्मक प्रतिसाद दिला असून, सध्याची वैद्यकीय स्थिती समाधानकारक आहे. शस्त्रक्रियेच्या ४ दिवसांनी रुग्णाला घरी सोडले. यशस्वी शस्त्रक्रियेमुळे जागतिक पातळीवर नाशिकने ठसा उमटविला आहे. येत्या काळात देश-विदेशातील गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांसाठी नाशिकला प्राधान्य दिले जाईल."- डॉ. राज नगरकर, रोबोटिक सर्जन, एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.