नाशिक : गेल्या काही महिन्यापासून शहरात बुलेट दुचाक्यांच्या सायलेन्सरमध्ये फेरबदल करून कर्णकर्कश फटफट आवाज करीत बुलेटस्वारांची मुजोरी वाढली आहे. तसेच, दुचाक्यांना कर्णकर्कश हॉर्नही बसविण्यात येतात.
एकार्थी, पोलिसांनीच सुरू केलेल्या ‘नो-हॉर्न डे’ या उपक्रमाचाच त्यांना विसर पडल्याने चांगल्या उपक्रमांचे तिनतेरा वाजले. परंतु, गंगापूर पोलिसांनी गेल्या दोन महिन्यात सायलेन्सरमध्ये फेरबदल करणाऱ्या मुजोर बुलेटस्वारांविरोधात कारवाई करीत त्यांच्याकडून सुमारे अडीच लाखांचा दंड वसुल केला आहे.
आयुक्तालय हद्दीत अशीच कारवाईची अपेक्षा जागरूक नाशिककर करीत आहेत. (Action against 49 Modify silencer bullet riders by police Nashik News)
माजी पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी शहरात वाहतुकीला शिस्त लागावी आणि शहराच्या नावलौकिकात भर पडावी यासाठी वाहतुकीसंदर्भात विविध उपक्रम राबविले. त्यासाठीच त्यांनी ‘नो-हॉर्न डे’ यासारखा उपक्रमही राबविला होता.
ज्याची दखल राज्य सरकारनेही घेत, राज्यभरातील मोठ्या शहरांमध्ये त्याची उपाययोजना करण्यात येऊन अंमलबजावणीचे आदेश दिले होते. मात्र आज त्याच नाशिक शहरामध्ये ‘नो हॉर्न डे’चे तिनतेरा वाजले. चौका-चौकात कर्णकर्कश हॉर्नच्या आवाजाने ध्वनी प्रदूषण वाढले असून, त्यात दुचाकींच्या सायलेन्सरमध्ये फेरबदल करून धडकी भरविणारा फटफट ध्वनिप्रदूषणाची भरच पडली आहे.
अगदी सर्रासपणे फटफट आवाज करणाऱ्या बुलेट दुचाक्या रस्त्यावरून धावताना दिसताहेत. बुलेट चालकाकडून दुचाकीच्या सायलेन्सरमध्ये फेरबदल करण्याचे प्रकार गॅरेजवर सर्रासपणे सुरू आहे.
मात्र, आयुक्तालय हद्दीतील गंगापूर पोलिसांनी सायलेंसरमध्ये फेरबदल करण्यात आलेल्या बुलेटस्वारांविरोधात कारवाईचा दंडुकाच उगारला आहे. त्यामुळेच, गेल्या दोन महिन्यात गंगापूर पोलिसांनी ४९ बुलेट दुचाक्या जप्त करून त्यांच्यावर प्रादेशिक परिवहन विभागामार्फत २ लाख ४० हजार रुपयांचा दंड वसुल केला आहे.
हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत
तसेच, याप्रकरणी संबंधित बुलेटस्वारांविरोधात मोटार वाहन कायद्यांतर्गत गुन्हेही दाखल केले आहेत. सदरची कारवाई गंगापूरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रियाज शेख, सहायक पोलिस निरीक्षक महेश येसेकर, मोतीलाल पाटील यांच्या पथकाने केली आहे.
गंगापूर पोलिसांप्रमाणे, शहरातील पोलिस ठाण्यांमार्फतही कारवाईचा दंडुका उगारला गेला तर, मुजोर धूमस्टाइल दुचाकीस्वारांना आळा बसण्यास मदतच होणार आहे.
हॉर्न अन् म्युझिक सिस्टिम
दुचाक्यांना चारचाकी वाहनांचे कर्णकर्कश हॉर्न बसविण्यात येतात. महाविद्यालयीन तरुणाईच्या महागड्या दुचाक्यांना हे कर्णकर्कश हॉर्न असतात. त्याचप्रमाणे, शहराच्या ध्वनिप्रदूषणात आणखीच भर रिक्षांमधील साउंड सिस्टीममुळे पडते आहे.
अगदी वर्दळीच्या ठिकाणी रिक्षांमध्ये मोठ्या आवाजातील साउंड सिस्टीम बसविण्यात आलेल्या रिक्षा धावताहेत. त्याकडे कोणाचेही लक्ष नाही. त्यामुळे या वाहनचालकांची मुजोरी वाढली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.