नाशिक : अनेक व्यावसायिक अभ्यासक्रमांची दुसऱ्या फेरीची प्रक्रिया आटोपत आलेली असताना, औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया अद्यापही ठप्प आहे. प्रवेश क्षमता मान्यतेच्या गोंधळामुळे प्रवेश प्रक्रिया खोळंबल्याची स्थिती असून विद्यार्थी व पालक मेटाकुटीला आले असून, प्रवेश प्रक्रियेपुढील ग्रहण संपणार कधी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. प्रवेश प्रक्रियेला गती देण्याची मागणी होत आहे. (Admission process for pharmacy course still Stuck Nashik News)
शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करिता विविध अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सध्या सुरू आहे. बहुतांश शिक्षणक्रमांची प्रवेशाची दुसरी फेरी सुरू आहे. परंतु औषधनिर्माणशास्त्र शाखेच्या अभ्यासक्रमांना नोंदणीसाठी सातत्याने मुदतवाढ दिली जात आहे. पदविका (डी.फार्मसी) आणि पदवी (बी.फार्मसी) या अभ्यासक्रमाचे प्रवेश रखडले असल्याने विद्यार्थ्यांसह पालकांची चिंता वाढलेली आहे. नोंदणीनंतर प्रारूप गुणवत्ता यादी, अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करून त्यानंतर कॅप राउंडची प्रक्रिया राबविली जाणार आहे.
अशात आणखी विलंब झाल्यास प्रवेश निश्चितीची प्रक्रियेला थेट २०२३ उजाडेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीने प्रवेश प्रक्रिया राबवावी, अशी मागणी होत आहे. दरम्यान प्रवेशाच्या प्रतीक्षेत असलेले अनेक विद्यार्थी अन्य अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेत असल्याने औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयांवर संक्रांत येण्याची भीती व्यक्त होत आहे.
प्रवेश क्षमतेच्या निर्णयामुळे सुरू झाला गोंधळ
फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया यांच्यातर्फे देशभरातील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयातील प्रवेश क्षमता अचानक कमी करून टाकली होती. याचा फटका अनेक नामांकित महाविद्यालयांना बसला होता. महाविद्यालय पाहणी करून प्रवेश क्षमता निर्धारित करण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंतची मुदत कौन्सिलकडून सर्वोच्च न्यायालयात मागितली होती. परंतु यामुळे प्रवेश प्रक्रियाच खोळंबल्याने मनस्ताप व्यक्त केला जात होता.
अखेर शैक्षणिक वर्ष २०२१-२२ ची विद्यार्थी प्रवेश क्षमता शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करिता कायम राखण्याचा निर्णय कौन्सिलने २२ ऑक्टोबरला परिपत्रक जारी करत घेतला आहे. निकषांची पूर्तता करण्यासंदर्भात महाविद्यालयांकडून प्रतिज्ञापत्र मागविण्यात आलेले आहेत. आता प्रवेश क्षमतेचा तिढा सुटल्याने किमान प्रवेश प्रक्रिया जलद गतीने राबवावी, अशी मागणी होत आहे.
मुदतवाढीचे दृष्टचक्र संपावे
डी. फार्मसी या पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी नोंदणी प्रक्रिया ९ जूनला सुरू झाली होती. नोंदणीच्या मुदतीला पाच महिने होत आलेले असताना, आता यापुढे मुदतवाढ न देता तातडीने प्रवेश फेऱ्या राबविण्याची मागणी होते आहे. दुसरीकडे बी.फार्मसी/फार्म.डी. अभ्यासक्रमाच्या प्रवेशाच्या नोंदणीसाठी १२ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. त्यामुळे त्यानंतरच पुढील प्रक्रिया राबविली जाऊ शकेल. किमान आता तरी नोंदणीस मुदतवाढ देण्याचे दृष्टचक्र संपावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
अध्ययनावर परिणामाची भीती
सामान्यतः शैक्षणिक वर्षात दिवाळीनंतर प्रथम सत्र संपून परीक्षांची लगबग सुरु होत असते. परंतु औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमांची अद्याप प्रवेश प्रक्रियाच सुरु झालेली नाही. अशात ही प्रक्रिया पूर्ण करून प्रथम व द्वितीय असे दोन्ही सत्रांचे अध्ययन शैक्षणिक वर्ष संपण्यापूर्वी पूर्ण करण्याचे आव्हान प्राध्यापकांसमोर असणार आहे.
नियमाप्रमाणे १८० दिवसांचे अध्ययन होणे अपेक्षित असताना, प्रक्रिया लांबल्याने शैक्षणिक वर्ष संपायलाच या कालावधीपेक्षा कमी दिवस राहिल्यास निकषांचा पेच निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे. प्रात्यक्षिकांवर आधारित अभ्यासक्रम असल्याने योग्य रीतीने शिकविला जावा, याकरिता आवश्यक उपाययोजना करण्याचीही मागणी होत आहे.
"प्रवेश प्रक्रियेला विलंब होत असल्याने विद्यार्थी-पालकांकडून महाविद्यालयात चौकशी सुरु आहे. शैक्षणिक वर्ष संपण्यापूर्वी अध्ययन प्रक्रिया पूर्ण करण्याचे आव्हान निर्माण होणार आहे. त्यामुळे जलद गतीने प्रवेश प्रक्रिया पूर्ण होण्याची गरज निर्माण झालेली आहे."
- डॉ. राजेंद्र भांबर, प्राचार्य, एमजीव्ही औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय, नाशिक
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.