मालेगाव : कर्नाटकातील बेंगळुरूसह पश्चिम महाराष्ट्रातून येथील बाजारात होणारी अद्रकाची आवक घटली आहे. मराठवाड्यातून अद्रक बाजारात येत आहे. आवक घटल्याने दोन वर्षांनंतर अद्रकाने उसळी घेतली आहे.
येथील घाऊक बाजारात अद्रक ३६ रुपये किलोने विकले जात आहे. शेतकऱ्यांना बांधावर २३ रुपये किलोपर्यंत भाव मिळत असल्याने काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. (after 2 years ginger price increasing in Malegaon nashik latest marathi news)
येथील बाजारात भाजीपाल्यात फ्लॉवर, कोबी, शेवगा, गावराणी वांगी, भेंडी, गिलके, दोडके या भाज्यांना भाव मिळत आहे. टोमॅटोने महिनाभरापूर्वी शंभरी ओलांडली होती. सध्या टोमॅटोची आवक वाढल्याने भाव कोसळले आहेत.
येथे शंभर ते दीडशे रुपये क्रेटप्रमाणे टोमॅटोची विक्री होत आहे. अद्रकाला तब्बल दोन वर्षांनंतर ३६ रुपये किलोप्रमाणे विक्री होत असून, शहरात रोज सहा टन अद्रकाची विक्री होते.
दोन वर्षांपासून अद्रकाला पाहिजे तसा भाव मिळाला नाही. भाव वाढल्याने शेतकऱ्यांनी अद्रक काढायला सुरवात केली आहे. खतांच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ होत राहिल्याने अद्रकाचे पीक शेतकऱ्यांना परवडेनासे झाले.
व्यापारी शेतकऱ्यांच्या बांधावरून २३ रुपये किलोप्रमाणे अद्रक काढून घेत आहेत. येथील भाजीपाला बाजारात दररोज सहा टन अद्रकाची विक्री होत आहे. सध्या श्रावण मास सुरू झाल्याने घट होत आहे. मात्र आवक घटल्याने भाव स्थिर राहतील, असा जाणकारांचा अंदाज आहे.
कर्नाटकाची आवक घटली
शहरातील मुस्लिमबहुल असलेल्या पूर्व भागात शहराच्या इतर भागापेक्षा सर्वांत जास्त अद्रकाची विक्री होते. पूर्व भागात मांसाहार विक्री करणाऱ्या अनेक हॉटेल, अंडाभुर्जी, चिकन टिका आदी खाद्यपदार्थांमध्ये अद्रकचा वापर केला जातो. येथे अद्रकाचा माल कन्नड, औरंगाबाद, गंगापूर, वैजापूर, सिल्लोड, सोयगाव आदी भागातून येतो. दोन वर्षांपूर्वी येथील भाजीपाला बाजारात बेंगळुरू, सांगली, सातारा या भागातील अद्रक येत होते. सध्या बेंगळुरू, सातारा या भागातून अद्रकाची आवक बंद आहे. मराठवाडा भागातील अद्रक गावराणी म्हणून वापरली जाते. येथील बाजारातून नामपूर, सटाणा, देवळा, कळवण, चांदवड आदी भागात अद्रक विक्रीसाठी जातो.
"मालेगावमध्ये अद्रक ३५०० ते ३६०० रुपये क्विंटलप्रमाणे विक्री होत आहे. नवीन व जुना माल ३००० प्रमाणे विकला जात आहे. एप्रिल महिन्यात अद्रक २० ते २५ रुपये किलोप्रमाणे होते. सध्या भाव स्थिर राहतील." -पंकज खैरनार,घाऊक व्यापारी, मालेगाव
"अद्रकाचे भाव वाढल्याने शेतकऱ्यांनी अद्रक काढण्यास सुरवात केली. व्यापारी बांधावर येऊन अद्रक काढून घेऊन जात आहेत. दोन वर्षांनंतर अद्रकाचे भाव वाढले आहेत. अनेक शेतकऱ्यांनी दोन वर्षे अद्रक सांभाळून ठेवले होते. शासनाने अद्रक पिकावर अनुदान द्यावे."
-अनिस खान,अद्रक उत्पादक शेतकरी, तिखी, ता. सोयगाव, जि. औरंगाबाद
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.