Ajit Pawar : जातीनिहाय जनगणना व्हावी, असा ठराव विधानसभा अध्यक्षांनी मांडला आणि त्यास सगळ्यांनी पाठिंबा दिला होता. मात्र त्यास सकारात्मक प्रतिसाद आला नाही. त्यामुळे आता केंद्राची मदत न घेता बिहारप्रमाणे महाराष्ट्रात जनगणना व्हावी, अशी मागणी आली.
त्यानुसार बिहारची माहिती मागवली असून, महाराष्ट्राने जातीनिहाय जनगणना करावी, अशी राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे स्पष्ट केले. तसेच ही बाब खर्चिक असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलावे लागेल, असेही त्यांनी सांगितले.
सगळ्या समाज घटकांना कोण किती आहे हे समजायला हवे, असाही निर्वाळा पवार यांनी दिला. राष्ट्रवादी भवनातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यानंतर पवार पत्रकारांशी बोलत होते. ( Ajit Pawar statement Caste wise census should be done in Maharashtra like Bihar nashik news)
राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मुंबईचे प्रदेशाध्यक्ष समीर भुजबळ, जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पगार, विष्णूपंत म्हैसधुणे, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, आमदार दिलीप बनकर, सरोज आहिरे आदी उपस्थित होते. नाशिकच्या छगन भुजबळ यांच्या पालकमंत्रिपदाबद्दल पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अजित पवार म्हणाले, की हा पक्षांतर्गत विषय आहे. मंत्रिमंडळ विस्तार, मंत्र्यांना खाती देणे, पालकमंत्री नेमणे हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. मात्र पुढे चांगल्या गोष्टी घडतील.
आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण
आरक्षणासंबंधी प्रत्येकाला भूमिका मांडण्याचा अधिकार आहे, असे सांगून पवार म्हणाले, की कायदा, नियमाच्या चौकटीत बसवून आरक्षण द्यावे लागेल. यापूर्वी उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयात आरक्षण टिकले नाही.
ओबीसी, मराठा समाज, इतर समाज आरक्षणाची मागणी करत आहेत. त्यामुळे आताच्या ५२ टक्के आणि केंद्राच्या आर्थिक दुर्बलांसाठीच्या दहा टक्के आरक्षणाला धक्का न लावता न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांसंबंधी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल. मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीत सगळ्यांनी ही भूमिका मांडली आहे.
जालन्याच्या घटनेची शहानिशा करणार
जालन्यात पीकविमाविषयक ऑनलाइन तक्रार शेतकऱ्यांनी केली होती. त्यासाठी विमा कंपनीचे आणि कृषी विभागाचे अधिकारी गेले होते. त्या वेळी चित्रीकरण करणाऱ्या ‘साम-मराठी’ वाहिनीचा कॅमेरा हिसकावून घेण्यात आला. त्यास उत्तर देताना पवार म्हणाले, की घटनास्थळी लोक कोण होते, याची शहानिशा पोलिसांकडून केली जाईल. कृषी विभागाचे अधिकारी असल्यास कारवाई केली जाईल. शेतकऱ्यांना होणाऱ्या मनस्तापाबद्दल लक्ष घातले जाईल. कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडूनही माहिती घेतली जाईल.
कांद्याचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न
कांद्याच्या निर्यातशुल्काचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न असल्याचे सांगून पवार यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीला गेले असताना त्यांना हा विषय मांडायला सांगितला होता, अशी माहिती दिली.
त्यानंतर नाशिकच्या दौऱ्यात कांदे, टोमॅटो फेकल्याच्या घटनेकडे पत्रकारांनी लक्ष वेधल्यावर पवार म्हणाले, की कांदे फेकले नाहीत. मला समजले, की टोमॅटोचे क्रेट्स ओतत होते. तेव्हा मी जात असतो, तर त्याबद्दल मी विचारले असते. मला मिळालेल्या माहितीनुसार आमच्या पूर्वीच्या पक्षातील तीन कार्यकर्त्यांनी टोमॅटोचे क्रेट्स ओतले आहे.
राष्ट्रवादीमधील सहकाऱ्यांना आमच्यासोबत येण्याचे स्वागत असेल, असे सांगून नवाब मलिक यांचा नामोल्लेख न करता पवार म्हणाले, की चुकीचे आरोप झाले आणि बदनामी होऊन जावे लागल्यावर आम्हाला आधार द्यावा लागेल. तसेच मंत्री हसन मुश्रीफ यांच्याविषयी आरोप होणे वेगळे आणि सिद्ध होणे वेगळे आहे. आरोपात तथ्य नसल्याचे सांगण्याचा कायद्याने अधिकार आहे. त्यानुसार मुश्रीफ उत्तर देत आहेत.
यशवंतराव चव्हाणांचा वारसा घेऊन पुढे चाललो आहोत !
पक्षाच्या बॅनरवर शरद पवार यांच्याऐवजी यशवंतराव चव्हाण यांचे छायाचित्र वापरल्यासंबंधी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला अजित पवार यांनी उत्तर दिले. माझे छायाचित्र वापरू नका अन्यथा न्यायालयात खेचीन, हे नेते शरद पवार यांनी सांगितले होते.
त्यामुळे आम्ही सामूहिक निर्णय घेऊन स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे छायाचित्र वापरून त्यांचा वारसा पुढे घेऊन जायचे ठरवले आहे. राष्ट्रहित आणि महाराष्ट्र हित, बहुजन समाजाचे कल्याण म्हणून यशवंतराव चव्हाण हे राज्याचे वंदनीय व्यक्तिमत्त्व आहे.
राजकीय नेते, कार्यकर्त्यांचा संस्कृतपणा कसा असावा, याची शिकवण त्यांनी घालून दिली आहे. कमरेखाली वार करायचे नाहीत, हे त्यांनी शिकविले, असे पवार यांनी सांगितले. त्यावर शरद पवार त्यांच्या मर्जीने पक्ष चालवतात, हा युक्तिवाद निवडणूक आयोगाकडे करण्यात आला याबद्दल काय सांगाल? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर अजित पवार म्हणाले, की निवडणूक आयोग, न्यायालयात तुमची बाजू वकील मांडतात. आम्ही निवडणूक आयोगापुढे नव्हतो. आता राहिला मुद्दा जितेंद्र आव्हाड यांच्या वेदनांचा. वेदना आणि आव्हाड हे कुठं तरी जुळतं का? त्यावर न बोलले बरे.
नाशिक पोलिसांनी राखावी कायदा-सुव्यवस्था
मेळाव्यात नाशिकच्या कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न अजित पवार यांनी उपस्थित केला. कोयता गँग, मंगळसूत्र खेचणे, दोनचाकी वाहने जाळणे, चारचाकी फोडणे अशा घटना घडताना पोलिस काय करतात, असा प्रश्न उपस्थित करून ते म्हणाले, की पोलिसांनी आदरयुक्त दबदबा तयार करावा. राजकीय हस्तक्षेप असल्यास मला सांगावे.
हे काय म्हणतील, त्यांना वाईट वाटेल का? असा विचार केल्यास खपवून घेणार नाही. वाहने, पायाभूत सुविधांची अडचण असल्यास त्यांची पूर्तता केली जाईल. मात्र कायदा-सुव्यवस्था चांगली असावी. पुढच्यावेळी नाशिकला आल्यावर यासंबंधाने बैठक घेतल्यावर नाशिककरांना बदल झालेला दिसावा. पक्षाच्या कार्यकर्ते, नेत्यांनीही समाजकारण, राजकारण करताना उजळ माथाने जनतेपुढे जायला हवे. भगिनींना तुमच्याबद्दल विश्वास वाटावा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.