Nashik MVP Marathon : मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेतर्फे आयोजित केलेली आठव्या राष्ट्रीय व तेराव्या राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धा रविवारी (ता.२८) उत्साहात पार पडली.
या स्पर्धेत ४२ किलोमीटर अंतराच्या पूर्ण मॅरेथान स्पर्धेत उत्तर प्रदेशचा व सध्या नाशिकला सराव करत असलेल्या अक्षय कुमार विजेता ठरला. इतरही विविध गटांमध्ये धावपटूंनी सहभाग नोंदविला. (Akshay Kumar of Uttar Pradesh became winner of Nashik MVP Marathon nashik news)
गंगापूर रोडवरील मविप्र मॅरेथॉन चौक येथून सकाळी पावणे सहाला मान्यवरांच्या उपस्थितीत हिरवा झेंडा दाखवत मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार, स्पर्धा आयोजन समिती अध्यक्ष व मविप्र संस्थेचे सरचिटणीस ॲड.नितीन ठाकरे यांच्यासह पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
पूर्ण मॅरेथॉनमध्ये सहभागी होतांना अक्षय कुमार याने २ तास २६.०१ मिनिटे अशी वेळ नोंदवितांना अव्वल क्रमांकासह एक लाख रुपयांचे पारितोषिक पटकावले. या गटातून भारतीय लष्करातील सिकंदर तडखे याने द्वितीय क्रमांकासह ७५ हजारांचे पारितोषिक पटकावले. २ तास २६.२३ सेकंद अशी वेळ नोंदवितांना त्याने स्पर्धा पूर्ण केली असतांना अवघ्या काही सेकंदांच्या फरकामुळे त्याचा अव्वल क्रमांक हुकला.
लष्करातीलच गुरजित सिंग याने २ तास २८ मिनिटांमध्ये स्पर्धा पूर्ण करतांना तृतीय क्रमांक पटकावत ५१ हजार रुपयांचे पारितोषिक जिंकले. २१ किलोमीटर अंतराच्या अर्ध मॅरेथॉनमध्ये उत्तर प्रदेशच्या रिंकु सिंगने १ तास ०६ मिनिटे ३५ सेकंद अशी वेळ नोंदवितांना प्रथम क्रमांकासह २५ हजार रुपयांचे पारितोषिक पटकावले. या गटातून नाशिकच्या बबलू चव्हाण याने द्वितीय तर जळगावच्या दिनेश पाटील याने तृतीय क्रमांक पटकावला.
महिलांसाठी खुल्या गटातील १० किलोमीटरच्या धावण्याच्या शर्यतीत नाशिकच्या बसंती हेंबरोम हिने ३९ मिनिटे २१ सेकंदांची वेळ नोंदवितांना प्रथम क्रमांकासह विजेतेपद पटकावले. नाशिकच्याच दिशा बोरसे हिने द्वितीय आणि वंदना राहेरे हिने तृतीय क्रमांक पटकावला. स्पर्धेदरम्यान मविप्र मॅरेथॉन चौक परीसरात रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले.
दुपारी साडे अकरापासून संस्थेच्या रावसाहेब थोरात सभागृहात पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. या कार्यक्रमास आशियाई हॉकी सुवर्णपदक विजेते व 'चक दे इंडिया' फेम मिर रंजन नेगी यांची प्रमुख उपस्थिती होती.
त्यांच्यासह मविप्र मॅरेथॉन संयोजन समिती अध्यक्ष व संस्थेचे सरचिटणीस ॲड.नितीन ठाकरे, संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुनिल ढिकले, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपाध्यक्ष विश्वास मोरे, उपसभापती देवराम मोगल, चिटणीस दिलीप दळवी, संचालक शिवाजी गडाख, ॲड.लक्ष्मण लांडगे, सेवक संचालक डॉ.एस. के. शिंदे, जगन्नाथ निंबाळकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
खेळ हे जीवनाचे प्रतिबिंब ः नेगी
कुठल्याही खेळात ज्याप्रमाणे यश-अपयश असते, खेळात आपण जखमी होतो, जिंकल्यावर आनंदी होतो. त्याप्रमाणेच खेळाचे प्रतिबिंब जीवनात दिसते. हॉकी खेळातील आपल्या कार्यकाळातील आठवणी त्यांनी यावेळी ताज्या केल्या.
मॅरेथॉन नेणार आंतरराष्ट्रीय स्तरावरः ॲड.ठाकरे
तीन वर्षांच्या खंडानंतर अतिशय उत्साहात आजची मॅरेथॉन पार पडली. अभ्यासासोबत कला, क्रीडा गुणांच्या विकासासाठी संस्था प्रयत्नशील आहे. स्पर्धेची व्याप्ती वाढवितांना, पुढील वर्षीपासून आंतरराष्ट्रीय स्तरावरील मॅरेथॉनचे आयोजन करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे ॲड.नितीन ठाकरे यांनी मनोगतात जाहीर केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.