म्हसरूळ (जि. नाशिक) : भाजपच्या (BJP) केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांची जनआशीर्वाद यात्रा संपल्यानंतर आमदार राहुल ढिकले संपर्क कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांशी गप्पा मारीत होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) नेते अमित ठाकरे यांनी ढिकले यांना पाहून गाडी थांबविली. त्यांनी गाडीतून खाली उतरून आमदार ढिकले यांच्याशी संवाद साधला. या संवादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. सध्या भाजपचे आमदार असलेले ढिकले पूर्वाश्रमीचे मनसे प्रदेश उपाध्यक्ष होते. यामुळे भेटीची चांगलीच चर्चा रंगली.
अशी झाली भेट...
पंचवटीत शनिवारी (ता. २८) रात्री केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांची जनआशीर्वाद यात्रा होती. या यात्रेचा रात्री उशिरा श्री काळाराम मंदिराबाहेर समारोप झाला. समारोपानंतर नाशिक पूर्व मतदारसंघाचे आमदार ॲड. राहुल ढिकले त्यांच्या संपर्क कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांसमवेत चर्चा करीत होते. त्याचवेळी मनसेचे नेते अमित ठाकरे व मनसेचे पदाधिकारी कारमधून जात होत असताना, पूर्वाश्रमीचे मनसे प्रदेश उपाध्यक्ष आणि सध्याचे भाजप आमदार राहुल ढिकले यांना पाहताच गाडीच्या खाली उतरून त्यांची विचारपूस केली. दोन मिनिटांच्या भेटीत एकमेकांची विचारपूस आणि काही विनोदी किस्सेही घडले. आमदार ढिकले यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्या कारणास्तव मनसेच्या गोटात त्यांच्याबद्दल नाराजी होती. मात्र, युवा नेते अमित ठाकरे यांनी मनमोकळेपणाने ढिकले यांच्याशी संवाद साधला. आपल्या साध्या सरळ स्वभावाची झलक दिली. दोन-पाच मिनिटांच्या गप्पागोष्टी केल्यानंतर अमित ठाकरे पुढील प्रवासाला मार्गस्थ झाले.
ढिकलेंवर नाराज मनसे नेता कोण?
ठाकरे- ढिकले भेटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. आमदार ढिकले यांनी ठाकरे यांच्याकडे मनसे नेत्याची तक्रार केली. पक्ष सोडल्यापासून ‘ही’ व्यक्ती माझ्याशी बोलत नाही, फोनही उचलत नाहीत, त्यांना फोन उचलायला लावा, साहेबांनी मला एवढे लांब केले नाही, असे ठाकरे यांना सांगितल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्ट ऐकू येते. मात्र, आमदार ढिकले यांच्यावर नाराज असलेला आणि त्यांना लांब करणारा मनसेचा नेता कोण, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.