BJP vs NCP : मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाची सूत्रे कधी जमली नाही. आता सत्तेत दोन्ही पक्ष एकत्र आल्यावर स्थानिक पातळीवर दोन्ही पक्षांत सूत्रे जुळतील का, या अनेकांच्या शंकेचे उत्तर अखेर मिळाले.
मात्र, वेगळ्या पद्धतीने... नगरसूल रेल्वेस्थानकाच्या विकासकामांच्या उद्घाटन सोहळ्यात थेट खुर्चीवरूनच मानापमान नाट्य रंगले.
व्यासपीठावर भाजपच्या नेत्या अमृता पवार व मंत्री छगन भुजबळांचे स्वीय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे यांच्यात तू-तू-मै-मै झाली. आगामी निवडणुकांमध्ये दोन्ही पक्षांची दिलजमाई कशी होणार, या प्रश्नाची चर्चा होत आहे. (Amrita Pawar balasaheb Lokhande culture of creditism in BJP vs NCP Nashik Political)
येवला शहर पारंपरिक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मतदारांचा बालेकिल्ला. त्यातच वर्षानुवर्षे भाजप व शिवसेनेची युती असल्याने अनेक निवडणुका दोन्ही पक्षांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात लढल्या.
ज्येष्ठ नेते छगन भुजबळ येथून निवडून आले आणि मंत्रीही झाले. भाजपने कधीही स्वाभिमानी बाणा न सोडता शक्य तेवढ्या प्रयत्नांनी नेहमीच राष्ट्रवादीविरोधात भूमिका घेतली. आमदार भुजबळ भाजपसोबत जाऊन मंत्री झाल्यानंतर येथील राजकारणात काय, याची उत्सुकता आहे.
अजित पवार गट फुटून भाजपसोबत सत्तेत गेल्यानंतर मंत्रिपद मिळाल्यावर भुजबळ यांचे येवला दौऱ्यात भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले होते. त्यांतर सोशल मीडियावर एकमेकांवर तुटून पडणारे भाजप व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पूर्णतः शांतही झाले.
मात्र, रविवारी (ता. ६) नगरसूल येथे ‘अमृत भारत स्थानक’ सुधारणा योजनेत विविध विकासकामांचे आभासी पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. स्थानकात भाजपच्या पुढाकाराने भव्य कार्यक्रम झाला.
कार्यक्रमाला भाजपचे जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव, अमृता पवार, सरपंच मंदाकिनी पाटील, माजी सरपंच प्रा. प्रमोद पाटील, भुजबळांच्या संपर्क कार्यालयाचे प्रमुख बाळासाहेब लोखंडे, माजी नगरसेवक प्रमोद सस्कर, रेल्वे सल्लागार समिती सदस्य मनोज दिवटे व पदाधिकारी उपस्थित होते.
विधानसभेसाठी भावी उमेदवार समजल्या जाणाऱ्या अमृता पवार यांनी शहरभर फलक लावून या उद्घाटनाची प्रसिद्धीही केली. फलकावर भुजबळांचा कुठेही उल्लेख दिसला नाही.
त्यात नगरसूल स्थानकाचा समावेशासाठी भुजबळ यांनी पाठपुरावा केल्याचे संदेश सोशल मीडियावर फिरल्यामुळे भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या मनाला सल लागली आणि याचे प्रतिबिंब दिसले ते थेट व्यासपीठावर.
भाजपच्या पुढाकाराने हा कार्यक्रम होत असल्याचे चित्र कार्यक्रमस्थळी दिसले. या कार्यक्रमाला भाजपसोबत सत्तेतील मंत्री भुजबळ यांचे स्वीय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे काहीसे उशिरा दाखल झाले. व्यासपीठावर त्यांना बसण्यासाठी जागा नव्हती अन् ती उपलब्ध करून देण्यासाठी कोणी प्रयत्नही केले नाहीत.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
यामुळे लोखंडे पत्रकारांच्या जागेवर जाऊन बसले, हे पाहताच संयोजकांनी विनंती केल्यानंतर लोखंडे व्यासपीठावर गेले. मात्र, त्याठिकाणी भाजपच्या नेत्या अमृता पवार व लोखंडे यांच्यात खुर्चीवर बसण्यावरून शाब्दिक चकमक होऊन तू-तू-मै मै झाली.
एकमेकांना बोटे दाखवत व हातवारे करत ही शाब्दिक चकमक उडाल्याने हे चित्र पाहताना उपस्थित अवाक झाले अन् क्षणभर कार्यक्रमात शांतता पसरली.
हे नाट्य एवढ्यावरच संपले नाही. त्यानंतर सोशल मीडियातून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी या प्रकाराचा निषेध व्यक्त करत पवार यांचे मतदारसंघासाठी योगदान काय, हा सवालही उपस्थित केला.
त्यावर भाजपनेही प्रतिउत्तर देत पक्षाने पवार यांच्यावर या कार्यक्रमाची जबाबदारी दिल्याची सांगत संपूर्ण निधी पंतप्रधान मोदी व भाजपच्या माध्यमातूनच मिळाल्याचे खुलासे केले. दोन्ही बाजूने पत्रव्यवहाराचे पुरावे टाकण्यात आले.
या आरोप-प्रत्यारोपाने सोशल मीडियावर पुन्हा भाजप विरुद्ध राष्ट्रवादी, असे चित्र निर्माण झाल्याने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत काय होईल, हा प्रश्न पुन्हा एकदा राजकीय पटलावर चर्चेला आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.