Nashik MD Drugs Case : कोरोनानंतर गेल्या तीन वर्षात नाशिक पोलिस आयुक्तालयाने चार आयुक्त पाहिले. यातील दोघांना वर्षभराचा कालावधी पूर्ण करता आला नाही. तर एमडी (मॅफेड्रॉन) ड्रग्जची कारखानेच आढळल्याने नाशिकचा राज्यातच नव्हे तर देशात गाजावाजा राहिला.
आयुक्तालय हद्दीत गुन्ह्यांची जशी वाढ २०२३ मध्ये नोंदली गेली, तशीच लाचखोरीमध्येही नाशिक विभाग राज्यात अव्वलस्थानी आहे. लहान-सहान नव्हे तर उच्चपदस्थ अधिकारी लाचखोरीच्या जाळ्यात सापडले. एकूण २०२३ हे वर्ष महत्त्वाच्या घटनांनी चर्चेत राहिले.- नरेश हाळणोर (Analysis of increasing crime rate in nashik in 2023 nashik news)
वर्षात दोन आयुक्त
डिसेंबर २०२२ मध्येच तत्कालीन पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांची काही महिन्यांची कारकीर्द संपली आणि अंकुश शिंदे यांनी पदभार घेतला. प्रारंभी नाखुशीने आलेले शिंदे यांनी नंतर पोलिस प्रशासन आणि गुन्हेगारीवर अंकुश निर्माण केला होता. परंतु वर्षभराचा कालावधी त्यांना पूर्ण करता आला नाही.
नोव्हेंबरमध्ये त्यांची बदली होऊन नव्याने संदीप कर्णिक यांनी जबाबदारी घेतली. त्यांच्यासमोर शहरातील गुन्हेगारीसह अंमलीपदार्थांची तस्करी, आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने निर्माण होऊ पाहणारी राजकीय गुन्हेगारीला आटोक्यात ठेवण्याचे मोठे आव्हान असणार आहे.
पारख अपहरण अन् एमडीचे कारखाने
सप्टेंबर २०२३ मध्ये शहरातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक हेमंत पारख यांच्या अपहरणाच्या घटनेने शहर हादरले होते. दोन कोटींची खंडणीनंतर त्यांची गुजरातमधील बलसाडमध्ये सुटका झाली. परंतु त्यानंतर शहर गुन्हे शाखेने सखोल तपास करीत संशयितांना जेरबंद केले. तसेच, खंडणीची दीड कोटींची रक्कमही वसुल केली.
या घटनेला काही दिवस जात नाही तोच, नाशिक रोडच्या शिंदेगावात एकापाठोपाठ एक असे दोन एमडी ड्रग्ज बनविण्याचे कारखाने उघडकीस आले. पहिला कारखाना मुंबईच्या साकीनाका पोलिसांनी तर, दुसरा नाशिक पोलिसांनी उद्ध्वस्त केला.
याचवेळी सामनगावाच्या ड्रग्जच्या गुन्ह्यात नाशिक गुन्हे शाखेने सखोल तपास करीत सोलापुरातील दोन कारखाने उद्ध्वस्त केले. १४ संशयितांची टोळी जेरबंद करीत त्यांच्यावर मोकाअन्वये कारवाईही केली.
वर्षात सर्वाधिक मोका
नाशिक शहर पोलिस आयुक्तालयात आत्तापर्यंतच्या कारकिर्दीमध्ये २०२३ मध्ये पहिल्यांदा संघटित गुन्हेगारांविरुद्ध सर्वाधिक ६ मोकाअन्वये कारवाई करण्यात आली आहे. शहरातील सराईत गुन्हेगारांसह एकाच प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये गुन्हेगारी कारवाया करणाऱ्यांविरुद्ध तत्कालीन पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी मोका लावल्याने सराईत गुन्हेगारांसह राजकीय गुन्हेगारांवरही वचक निर्माण झाला.
कारडा प्रकरण
प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक व कारडा कन्स्ट्रक्शनचे संचालक नरेश कारडा यांच्यासह तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा ऑक्टोबर २०२३मध्ये दाखल झाला. कोट्यवधींची फसवणूक प्रकरणात नरेश कारडा यांना अटकही करण्यात आली. यामुळे त्यांचा भाऊ मनोहर कारडा यांनी धावत्या रेल्वेसमोर उडी घेत आत्महत्या केल्याची घटना घडली. या प्रकरणाने शहरातील बांधकाम व्यवसायाला मोठा हादरा व धक्का बसला आहे.
सरत्या महिन्यात ‘कुत्ता डान्स’
मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता व शिवसेनेचे ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांचा डान्स पार्टीचा व्हिडिओ २०२३च्या सरत्या महिन्यात राज्यभर चर्चेचा ठरला. यामुळे बडगुजर यांच्यामागे पोलिसांच्या चौकशीचा ससेमिरा लागला आहे. तो एवढ्यात संपण्याची चिन्हे नाहीत.
‘लाचखोरी’त नाशिक अव्वल
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या आठही विभागातील दाखल ७७२ गुन्ह्यांमध्ये सर्वाधिक १५८ गुन्हे दाखल नाशिक विभागात दाखल करीत २२९ लाचखोरांना गजाआड केले आहे. नाशिकच्या अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर- घारगे यांच्या नेतृत्वाखाली पथकांनी अनेक विभागातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना लाचखोरीच्या जाळ्यात अटक केली.
उपनिबंधक सतीश खरे यांना ३० लाख, नाशिक महापालिकेच्या शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांना ५० हजार, भूमिअभिलेख अधीक्षक महेश शिंदे यांना ५० हजार, सिन्नरचे सहायक उपनिबंधक एकनाथ पाटील यांना १५ हजार, सिन्नरचे सहायक उपनिबंधक रणजित पाटील यांना २० लाख घेताना लाचलुचपत पथकाने अटक केली तर, दिंडोरीचे प्रांत डॉ. नीलेश अपार यांना ४० लाखांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करीत अटक केली होती.
तर वर्षांच्या सरत्या महिन्यात नाशिकमधील शिवसेनेच्या ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी महापालिकेत पदाचा गैरवापर करीत स्वतःच्या कंपनीला विविध कामांचे ठेके मिळवून दिल्याबद्दल २०१६ च्या तक्रारीची चौकशीअंती सरकारवाडा पोलिसात अपहाराचा गुन्हा दाखल केला आहे. सलीम कुत्तासमवेतच्या डान्स पार्टीच्या चौकशीला सामोरे जात असतानाच आता बडगुजर यांना लाचलुचपतच्या कारवाईलाही सामोरे २०२३च्या सरत्या महिन्यात जावे लागले.
दृष्टीक्षेपात
- पोलिस आयुक्तालय हद्दीमध्ये २०२३ वर्षभरातील गुन्ह्यांचा आकडा चार हजार पार
- आयुक्तालय हद्दीमध्ये पहिल्यांदा खुनाचा आकडा ४२ वर
- आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ
- सायबर फसवणुकीतून कोट्यवधींची फसवणूक
- शिक्षा ठोठावल्यानंतरही कारागृहातून जिल्हा रुग्णालयात ‘आरामा’साठी दाखल होणारे गुन्हेगार चर्चेत
- अंबड पोलिस ठाणे पोलिस निरीक्षकांच्या वारंवार बदलीने चर्च
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.