पंचवटी : राष्ट्रीय युवा महोत्सवाचा मान यंदा नाशिकला मिळाला आहे. १२ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तपोवन येथील मैदानावर महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे.
यानिमित्त तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोमवारी (ता. ८) नाशिकमध्ये दाखल झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी जात थेट पाय धरल्याने एकच गोंधळ उडाला. (Anganwadi worker touch feet of CM Shinde Nashik News)
अंगणवाडी सेविकांनी ‘मानधन नको वेतन हवे’, अशी मागणी केली. पोलिसांनी अंगणवाडी सेविकेस मुख्यमंत्री शिंदे यांना भेटण्यास मज्जाव केला. दोन अंगणवाडी सेविकांसह अन्नपूर्णा अडसुळे यांनी सुरक्षाकवच तोडून टाहो फोडत मुख्यमंत्र्यांसमोर लोटांगण घातले.
पालकमंत्री दादा भुसे यांनी अंगणवाडीसेविका अन्नपूर्णा अडसुळे यांना मुख्यमंत्र्यांकडे घेऊन गेले. त्या वेळी अंगणवाडीसेविका अन्नपूर्णा अडसुळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे आपल्या विविध मागण्या केल्या.
आम्हाला मानधन नको वेतन हवे, सरकारने आमच्या मागण्यांचा विचार करावा, न्यायालयाच्या निर्देशानुसार ग्रॅच्युइटी द्यावी, अंगणवाडी सेविकांना दिलेल्या नोटीस मागे घ्याव्यात अशा विविध मागण्या केल्या.
यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी अंगणवाडी सेविकांना पेन्शनवाढ, तसेच ग्रॅज्युइटी देण्याबाबत विचार करू, असे आश्वासन दिले. त्यानंतर अंगणवाडी सेविकांना सोडून देण्यात आले.
अंगणवाडी सेविकांच्या मागण्या
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार शासकीय कर्मचारी घोषित करा, वेतनश्रेणी, ग्रॅच्युइटी, भविष्यनिर्वाह निधीसह इतर लाभ द्यावेत, दरमहा २६ हजार रुपये मानधन देण्यात यावे, मदतनिसांना २० हजार रुपये मानधन द्या, महागाई दुपटीने वाढते म्हणून दर सहा महिन्यांनी मानधनात वाढ करावी, सेवा समाप्तीनंतरच्या पेन्शनचा प्रस्ताव अधिवेशनात मंजूर करावा, अंगणवाड्यांसाठी मनपा हद्दीत पाच हजार ते आठ हजार भाडे मंजूर करावे, आहाराचा दर बालकांसाठी सोळा तर अतिकुपोषित बालकांसाठी २४ रुपये करावा.
अंगणवाडीसेविका आंदोलनावर ठाम
विविध प्रलंबित मागण्यासाठी सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्ताने मुंबईतील आझाद मैदानावर अंगणवाडी सेविकांनी आंदोलनाला सुरवात केली. अंगणवाडी सेविकांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी आणि आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आंदोलनकर्त्या अंगणवाडी सेविकांच्या शिष्टमंडळाची भेट झाली.
बुधवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अंगणवाडी सेविकांमध्ये चर्चा झाली, मात्र मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेत कोणतेही चांगले पाऊल उचलले गेले नसल्याचा आरोप अंगणवाडी सेविकांनी केला आहे.
तसेच मुख्यमंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही अंगणवाडीसेविका आंदोलनावर ठाम असून, आज दुसऱ्या दिवशीही आंदोलन सुरूच ठेवणार आहेत. आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन संपणार नाही. आंदोलन सुरूच राहणार असल्याचे अंगणवाडी सेविकांनी सांगितले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.