Nashik Monsoon Crisis : गेल्या चार वर्षांपासून आभाळमाया मुबलक बरसल्याने हिरवाईने नटलेला सिन्नर तालुका यंदा मात्र उजाड आणि बोडका दिसत आहे. पावसाने हुलकावणी दिल्यामुळे खरिपाच्या पेरण्या ऑगस्ट उजाडला तरी खोळंबल्या असून जनावरांच्या चारा पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
शेतीला पूरक म्हणून सिन्नर तालुक्यात बहरलेला दूध व्यवसाय चारा पाण्याचा खर्च परवडत नसल्याने शेतकऱ्यांना संकटात टाकणारा ठरू पाहत आहे. (Animal water problem critical Livestock in crisis due to rains Nashik Monsoon)
सिन्नर तालुक्यात यंदा पावसाचे गणित कोलमडले आहे. मागची सलग चार वर्ष धो-धो बरसलेल्या पावसाने प्रत्येक वेळी खरिपाची वाट लावली. असे असले तरी शेतकऱ्यांसाठी रब्बी हंगाम आशादायक ठरला होता.
वर्षभर शेती शिवार हिरवेगार राहत असल्याने सर्वांसाठीच दिलासादायक चित्र सिन्नर मध्ये बघायला मिळत होते. मात्र यंदा दुष्काळाचे चक्र पुन्हा फिरणार की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
पाऊस नसल्याने खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. शेतकऱ्यांनी जूनच्या तोंडावर खरीप हंगमासाठी तयारी करत महागडी बी-बियाणे, आवश्यकतेनुसार खतांची खरेदी केली. 25-30 टक्क्यांपर्यंत पेरण्या देखील झाल्या.
मात्र, आता पेरणी केलेले ते शेतकरी दुबार पेरणीच्या संकटात सापडले आहे. तर पावसाने दडी मारल्याने खते आणि बी बियाणे सांभाळण्याची वेळ इतर शेतकऱ्यांवर आली आहे. पाऊस नसल्याने सिन्नर तालुक्यातील शेतकऱ्याचे अर्थकारणच उध्वस्त होण्याची चिन्हे आहेत.
ज्या शेतकऱ्यांकडे विहिरींना पाणी होते त्यांनी काही प्रमाणात भाजीपाला उत्पादन घेण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न देखील फसण्याची शक्यता वाढली आहे.
कारण पाऊस नसल्याने ही पिके जगवायची कशी असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. सिन्नर तालुक्यात सर्वाधिक हाल पशुधनाचे होत आहेत. दूध उत्पादनात अग्रेसर असलेल्या सिन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांनी प्रतिकूल परिस्थितीत या व्यवसायाची भरभराट केली.
मात्र आता जनावरांच्या चारा आणि पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असल्याने दूध व्यवसाय देखील संकटात सापडला आहे. खरीप आणि रब्बी हंगामात मका पीक घेऊन शेतकरी त्याचा मुरघास बनवून साठवणूक करून ठेवतात.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
मका पिकापासून दुहेरी फायदा होत असल्याने गेल्या पाच सात वर्षापासून सिन्नर तालुक्यात मका पिकाची विक्रमी लागवड केली जात आहे. आज घडीला प्रत्येकाच्या गोठ्यातील मुरघास संपण्याच्या स्थितीत आहे.
दुभत्या जनावरांना ताजा हिरवा चारा लागतो. या चाऱ्याची देखील वाणवा असून मिळेल त्या ठिकाणाहून मिळेल त्या किमतीत हिरवा चारा उपलब्ध करून घेतला जात आहे.
मात्र हे करत असताना दुधाच्या किमती अस्थिर असल्याने चाऱ्यासाठी अधिकचा खर्च शेतकऱ्यांच्या नुकसानीत वाढ करणारा ठरणार आहे.
चारा छावण्या सुरू करण्याची गरज...
"पाऊस लांबल्यामुळे घरचा चारा नाही. त्यामुळे साडेचार रुपये प्रति किलो दराने हिरवा चारा विकत घ्यावा लागतो. काही शेतकऱ्यांना पाणी देखील विकत घेण्याची वेळ आली आहे. पशुखाद्याच्या किमती वाढल्या आहेत. एकूणच विचार केला तर दुधाचे दर वाढत नाही आणि उत्पादन खर्च मात्र टाळता येत नाही. यात मोठे नुकसान शेतकऱ्यांचेच आहे. पाऊस पडला नाही तर सिन्नरच्या पूर्व भागात लवकरच जनावरांसाठी चारा छावण्या सुरू कराव्या लागतील."
- दिलीप गलांडे (शेतकरी)
कृत्रिम पाऊस पाडावा..
"गेल्या हंगामातील अतिवृष्टीने झालेल्या नुकसानी पासून शेतकरी अद्याप वंचित आहेत. यंदा तर पावसाने देखील पाठ फिरवली. सरकार एक रुपयात पिक विमा नोंदणी करून घेण्याचे आवाहन करते आहे वास्तवात पिक विम्याचा शेतकऱ्यांना कितपत फायदा होईल हा संशोधनाचा विषय राहील. विमा कंपन्या मात्र आणखी श्रीमंत होतील. सिन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी व किमान जनावरांचे हाल टाळण्यासाठी सरकारने कृत्रिम पाऊस पाडण्याचा पर्याय देखील पडताळून पाहणे आवश्यक आहे."- गणेश वेलजाळी (सामाजिक कार्यकर्ता)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.