election esakal
नाशिक

Market Committee Election: बाजार समितीसाठी अर्जांचा पाऊस; पिंपळगाव बसवंत, लासलगाव, सिन्नरला विक्रमी इच्छुक

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : जिल्ह्यातील बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी आज शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्जांचा अक्षरशः पाऊस पडल्याचे दिसून आले. जिल्ह्यातील सर्वात श्रीमंत आणि प्रतिष्ठेच्या पिंपळगाव बसवंत बाजार समितीसाठी विक्रमी ३०९ अर्ज दाखल झाले आहेत.

नाशिक महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती गणेश गिते यांच्यासह प्रणव पवार यांनी या बाजार समितीसाठी अर्ज दाखल केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. लासलगाव येथेही २११, घोटी येथे १५९, सिन्नर येथे.... तर येवला येथे .... अर्ज दाखल झाले आहेत.

यात नवतरूणांची संख्या जास्त असून शेतकरी उमेदवारी करू शकणार असल्याबाबत घेतलेल्या निर्णयाने यंदा बाजार समितींची निवडणूक प्रस्थापितांसाठी कसोटीची ठरणार आहे. (applications for Market Committee Election Record candidates for Pimpalgaon Baswant Lasalgaon Sinnar nashik news)

बाजार समितीसाठी येत्या २८ एप्रिलला मतदान होत असून या निवडणुकीत बाजार समितीच्या मतदारांसह शेतकऱ्यांना ही उमेदवारी करण्याची संधी देण्यात आली आहे त्यामुळे लासलगावसह सर्वच बाजार समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले.

अर्जाच्या या पावसामुळे प्रस्थापित नेत्यांची उमेदवार निवडताना कसोटी लागणार असून अनेक ठिकाणी यापूर्वी दुरंगी होणाऱ्या या लढती यंदा तिरंगी आणि अटीतटीच्या होणार हे निश्‍चित मानले जात आहे. दरम्यान येत्या ६ एप्रिलपासून २० एप्रिलपर्यंत माघारीसाठी अवधी असणार आहे, त्यामुळे हा मधला काळ सर्वांसाठी रात्र थोडी अन सोंगे फार असा असणार आहे.

पिंपळगावी इतिहास घडला

पिंपळगाव बसवंत : उत्तर महाराष्ट्रातील सर्वाधिक श्रीमंत पिंपळगाव बाजार समितीचे संचालक होण्यासाठी आज इच्छुकांची अक्षरशः जत्रा भरली. बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील ६९ गावापैकी प्रत्येक गावातून एक तरी उमेदवारी अर्ज भरला गेला आहे.

त्यामुळे समितीच्या इतिहासात आजपर्यतचा उमेदवारी अर्जाचा विक्रम नोंदविला गेला आहे. १८ जागांसाठी तब्बल ३०९ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. आमदार दिलीप बनकर व माजी आमदार अनिल कदम यांच्या लढतीत आता भाजपच्या नेत्यांनीही उडी घेतल्याने ही लढत तिरंगी होण्याची चिन्हे आहेत.

अर्ज दाखल करण्याच्या आजच्या अखेरच्या दिवशी प्रचंड चढाओढ दिसली. शेतकऱ्यांना उमेदवारीचा अधिकार दिल्याने अर्जाची संख्या तीनेशेच्या पार गेली. सोसायटीच्या गटाच्या ११ जागांसाठी १९७, ग्रामपंचायत गटातील ४ जागासाठी ८६ तर व्यापारी गटाच्या २ जागांसाठी १९ व हमाल मापारी गटाच्या १ जागेसाठी ७ असे एकूण ३०९ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे.

इच्छुकांची गर्दी पाहता माघारीसाठी बनकर व कदम यांना मोठी कसरत करावी लागणार आहे. दाखल झालेल्या अर्जाची बुधवारी (ता.5) छाननी होणार आहे. तालुक्यातील भाजपाकडून उमेदवारी अर्ज आज दाखल करण्यात आला.

त्यात तालुकाप्रमुख भागवतबाबा बोरस्ते, माजी जिल्हा परिषद सदस्य यतीन कदम, पिंपळगाव सोसायटीचे संचालक सतीश मोरे यांनी अर्ज दाखल केले. तिरंगी लढत होणार की भाजप बनकर किवा कदम गटाशी हातमिळवणी करणार याबाबत उत्सुकता आहे.

उमेदवारी अर्ज दाखल करताना इच्छुकांची चांगलीच धावपळ उडालेली दिसली. रहिवाशी दाखला, उत्पन्नाचा दाखला, बॅकखाते, शेती असल्याचा उतारा, नादेय दाखला अशी कागदपत्रे जमवितांना संचालक इच्छुकांच्या नाकी नऊ आले.

गणेश गिते, पवारांचा अर्ज

प्रणव पवार यांनी प्रथमच एखाद्या निवडणुकीत अर्ज दाखल केल्याने अनेकांच्या भुवय्या उंचावल्या आहेत. नाशिक महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष गणेश गिते यांनीही माजी आमदार कदम यांच्याकडून व्यापारी गटात उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पवार, गिते यांच्या उमेदवारी अर्जाने पिंपळगाव बाजार समितीच्या निवडणुकीला रंजक बनली आहे.

लासलगावला तब्बल २११ अर्ज

लासलगाव : लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी संचालकांच्या १८ जागांसाठी अर्ज दाखल करण्यासाठी आज सोमवारी (ता.३) दुपारी तीनपर्यत तब्बल २११ अर्ज दाखल झाले आहेत.

सोसायटी गटाच्या ११ जागांसाठी १२४, ग्रामपंचायत गटाच्या ४ जागांसाठी ६२ अर्ज, व्यापारी गटाच्या २ जागांसाठी १९ अर्ज तसेच हमाल मापारी गटाच्या १ जागेसाठी ६ अर्ज दाखल झाल्याने या पंचवार्षिक निवडणुकीत रंगत येणार आहे.

५ एप्रिलला उपबाजार आवार निफाड येथे अर्जांची छाननी होईल असे निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार शरद घोरपडे यांनी सांगितले.

येवल्यात २१७ उमेदवारी अर्ज

येवला : येथील बाजार समितीच्या निवडणुकीसाठी आज अखरेच्या दिवशी १८ जागांसाठी २१७ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट, भाजप, शिवसेना शिंदे गटातर्फे अर्ज दाखल झाले आहेत.

सोसायटी गटाच्या सर्वसाधारण सात जागांसाठी ९१ उमेदवारी अर्ज दाखल झाले असून महिला राखीव दोन जागांसाठी ८, आर्थिक दुर्बलच्या एका जागेसाठी १०, भटक्या विमुक्त एका जागेसाठी १८ ,अनुसूचित जाती जमातीच्या एका जागेसाठी ११, ग्रामपंचायत गटात ६२ अर्ज, व्यापारी गटाच्या दोन जागांसाठी ११ व हमाल मापारी गटासाठी १३ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी प्रमोद हिले, बाजार समितीचे सचिव कैलास व्यापारे यांनी दिली आहे.

१८ जागांसाठी तब्बल ३४१ उमेदवारी अर्जाची विक्री होऊन २१७ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस असल्याने उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यासाठी मोठी गर्दी केली होती.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून भुजबळ समर्थक दिलीप खैरे, ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, भुजबळांचे स्वीय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे, शिवसेना ठाकरे गटाकडून उपजिल्हाप्रमुख भास्कर कोंढरे, तालुकाप्रमुख रतन बोरणारे, भाजपकडून प्रांतिक सदस्य बाबासाहेब डमाळे, ॲड. शाहू शिंदे, नाना लहरे, शिवसेना शिंदे गटाकडून अतुल पालवे, पांडुरंग शेळके उपस्थित होते.

हेही वाचा : शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?

घोटीत १५९ अर्ज दाखल

इगतपुरी : इगतपुरी तालुक्यातील एकमेव घोटी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सर्वपक्षीय नेते सरसावले आहेत. यंदा यात युवकांची मोठ्या प्रमाणात सहभाग असणार आहे. आज अखेरच्या दिवशी अर्ज दाखल करण्यासाठी बाजार समिती आवाराला यात्रेचे स्वरूप आले होते.

आजअखेर सोसायटी गटाच्या ११ जागेसाठी १०५ अर्ज दाखल झाले. ग्रामपंचायत गटाच्या ४ जागेसाठी ४३ अर्ज, हमाल तोलारी गटाच्या १ जागेसाठी ३ अर्ज आले. व्यापारी गटाच्या दोन जागांसाठी ९ अर्ज आले. आजअखेर एकूण १५९ अर्ज दाखल झाले आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली आहे.

यंदा तालुक्यातील मातबर नेत्यांसह युवकांचेही मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल झाल्याने राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. अखेरच्या दिवशी तालुक्यातील मातब्बरांसह प्रतिष्ठित नेत्यांनी अर्ज दाखल झाल्याने बाजार समितीची ही निवडणुक अटीतटीची होणार असल्याचे दिसते.

सिन्नरला १८० इच्छुकांचे अर्ज

सिन्नर : सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी आजअखेर १८० इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. विशेष म्हणजे या निवडणुकीत माजी अध्यक्ष कचरू डावखर, विनायक घुमरे वगळता अन्य माजी पदाधिकारी निवडणुकीपासून दूर राहिले आहेत.

निवडणुकीनिमित्त आमदार माणिकराव कोकाटे व माजी आमदार राजाभाऊ वाजे- उदय सांगळे यांचे गट पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत. सोमवारी तब्बल १६२ इच्छुकांनी अर्ज दाखल केले. त्याआधी दोन दिवसात १८ अर्ज दाखल करण्यात आले होते. यात नवख्या उमेदवारांचे सर्वाधिक अर्ज दाखल करण्यात आले आहेत.

यात सोसायटी सर्वसाधारण गटाच्या ८ जागांसाठी ७३, सोसायटी महिला राखीव गटाच्या दोन जागांसाठी १६, सोसायटी इतर मागास प्रवर्ग गटाच्या एका जागेसाठी ११, विमुक्त जाती भटक्या जमाती गटाच्या एका जागेसाठी ११, व्यापारी गटाच्या दोन जागांसाठी १४, हमाल तोलारी गटासाठी ७, ग्रामपंचायत सर्वसाधारण गटाच्या दोन जागांसाठी ३०, ग्रामपंचायत अनुसूचित जाती गटाच्या एका जागेसाठी १०, ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल गटाच्या एका जागेसाठी ८ याप्रमाणे १८० इच्छुकांनी अर्ज दाखल केले.

सुरगाण्यात सात जागा बिनविरोध

सुरगाणा : सुरगाणा बाजार समिती निवडणुकीसाठी शेवटच्या दिवसापर्यंत एकूण ३० अर्ज विक्री झाले. यापैकी २५ जणांनी अर्ज दाखल केले. या निवडणुकीत शेतकरी व किसान विकास प्रगती पॅनलमध्ये लढत होणार आहे.

शेवटच्या दिवशी आज सोसायटी गटातील किसान विकास प्रगती पॅनलचे सोसायटी गटात ४, ग्रामपंचायत गटात १, व्यापारी गटात २ जागांवर विरोधी उमेदवार नसल्याने सात जागा बिनविरोध झाल्या आहेत. अर्ज माघारीनंतर सोसायटी गटात सर्वसाधारणमधूनही दोन तीन जागा बिनविरोध होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे पुन्हा एकदा सुरगाणा कृषी उत्पन्न बाजार समितीवर किसान विकास प्रगती पॅनलचे वर्चस्व प्रस्थापित होईल. सलग दोन दिवस २ याप्रमाणे केवळ चार अर्ज विक्री झाले होते. मात्र शेवटचा दिवस असल्याने २६ अर्जांची विक्री झाली. असे एकूण ३० अर्जांची विक्री झाली. यापैकी एकूण २५ उमेदवारी अर्ज दाखल झाले.

लखमापूरला १७२ अर्ज दाखल

लखमापूर : दिंडोरी बाजार समितीच्या निवडणुकीत चुरस वाढली असून मातब्बरांनी शेवटच्या दिवसाअखेरपर्यंत अर्ज दाखल केले. आजअखेर तब्बल १७२ अर्ज दाखल झाले आहेत. विद्यमान सभापती दत्तात्रय पाटील, उपसभापती अनिल देशमुख, संस्थापक सभापती तथा जिल्हा बँक संचालक गणपतराव पाटील, मविप्र संचालक प्रवीण जाधव, शिवसेना जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे आदींसह विविध सरपंच सोसायटी अध्यक्ष, पक्षाचे पदाधिकारी यांनी अर्ज दाखल केले.

दिडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीस प्रारंभ झाला आहे. सोमवारी 3 वाजेपर्यंत निवडणूकीसाठी अर्ज भरण्याचा कालावधी होता. त्या कालावधीत तालुक्यातील सर्व पक्षीय मातब्बरांनी अर्ज दाखल केल्याने ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरत चुरस वाढवणारी असल्याचे स्पष्ट झाले आहे.

एरव्ही ५० अर्ज दाखल होणे मुश्किल होत होते. परंतू यंदा १७२ अर्ज दाखल झाल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. अखेरच्या दिवशी तब्बल 100 अर्ज दाखल झाले आहेत. राष्ट्रवादी, शिवसेनेचे दोन्ही गट, कॉग्रेस, भाजप आदी प्रमुख पक्षांच्या पदाधिकार्‍यांसह कार्यकर्त्यांनी उमेद्वारी अर्ज दाखल केले आहेत.

आजअखेर दाखल अर्जात सहकारी संस्था गटात 62, इतर मागास प्रवर्ग गटात १५, विमुक्त जाती गटात १२, महिला राखीव गटात १२, ग्रामपंचायत (सर्वसाधारण) गटात २३, ग्रामपंचायत (अनु. जाती जमाती गटात १७, ग्रामपंचायत (आर्थिक दृष्ट्या दुर्बल गटात ११, व्यापारी मतदारसंघात १४, हमाल तोलारी गात ८, असे एकूण १७२ अर्झ दाखल झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Rathod won in Digras Assembly Election Results 2024: माणिकराव ठाकरेंचा पुन्हा पराभूत, हायव्होल्टेज लढतीत संजय राठोड विजयी

Eknath Shinde : एकनाथ शिंदे महाविकास आघाडीपेक्षा भारी, केलीय आता पुढची तयारी

"त्याने माझ्या तब्येतीची चौकशी केली आणि..." शुटिंगमुळे थकलेल्या सलमानच्या कृतीने भारावली हिना , म्हणाली...

Prakash Solanke won Majalgaon Assembly election 2024 final Result: माजलगावमध्ये अटीतटीच्या लढतीत प्रकाश सोळंके विजयी, शरद पवार गटाच्या उमेदवाराचा पराभव

Ballarpur Assembly Constituency Result 2024 : बल्लारपूरमध्ये भाजपचा गुलाल! सुधीर मुनगंटीवारांनी 105969 मतांनी गड राखला

SCROLL FOR NEXT