लेखक : ॲड. नितीन ठाकरे
पर्यावरणाबद्दल वारंवार चर्चा होत असते. पर्यावरणाचे रक्षण झाले पाहिजे, पर्यावरणपूरक वातावरण निर्माण झाले पाहिजे यासाठी सर्वांनी योगदान दिले पाहिजे अशा प्रकारचे आवाहन व सहभागाच्या बातम्या आपण नेहमीच ऐकत असतो. मात्र, पर्यावरणाचे रक्षण करताना ते शास्त्रशुद्धपणे केले तरच प्रयत्नांना यश अधिक मिळेल. लावलेल्या रोपांचे संवर्धन करण्याकडेही तेवढेच गांभीर्याने लक्ष दिले गेले पाहिजे, तरच आपला हेतू साध्य होईल. (article by author adv nitin thackeray Plant trees understand trees too )
झाडे निसर्गाचा अविभाज्य घटक आहेत, ती जगली पाहिजेत, वाचली पाहिजेत, नवीन वृक्षारोपण झाले पाहिजे, त्यांचे संवर्धन झाले पाहिजे, हे सर्व खरं आहे. याबद्दल प्रयत्नही होतात. मात्र, झालेल्या प्रयत्नांमध्ये आपण कमी पडत आहोत. फक्त प्रसिद्धीसाठी वृक्षरोपण केले जात असेल तर त्याचा काहीही उपयोग होत नाही. जे वृक्षारोपण आपण करणार आहोत, त्या वृक्षाबद्दलची प्रथम आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे.
वृक्षारोपण करताना त्याची पटकन वाढ व्हावी, अशी आपली अपेक्षा असते. पण, त्याचा निसर्गाला किती उपयोग आहे, आपल्या जीवनात आरोग्यासाठी किती लाभदायक आहे, हे आपण समजून घेतले पाहिजे. यासाठी पहिल्यांदा झाडे समजून घ्या! अशी अनेक देशी झाडे आहेत, की आपल्या जीवनात जीवनवाहिनीचे काम करतात. त्या झाडांचं रोपण व संवर्धन करण्याची जबाबदारी आपण नैतिकतेने स्वीकारण्याची आवश्यकता आहे.
आयुष्यात एका व्यक्तीने किमान काही वर्ष एका झाडाचे योग्यरीत्या संवर्धन करावे. सर्वत्र वड, पिंपळ, कडुलिंब, आंबा, फणस, उंबर, अशोका, नारळ, सुपारी आदी देशी वृक्ष लावले जायचे. मग ते शहरातील रस्ते असो किंवा राज्य महामार्ग किंवा राष्ट्रीय महामार्ग. भारतीय झाडांची वाढ खूप हळू असते, त्यांना देखभाल व पाणी देणे यासाठी बराच वेळ द्यावा लागतो.
पण, भारतीय झाडांची मुळे पहिले वाढतात व तदनंतर हळूहळू झाड वाढायला लागते. त्यामुळे ही झाडे अत्यंत भक्कम असतात. पन्नास-शंभर वर्षांहून अधिक वर्षे जगत असे. यासाठी झाडे आपल्याला ओळखता आली पाहिजेत. अगदी सर्वसामान्य निरीक्षणातूनही आपल्याला त्याबद्दलची माहिती सहज समजू शकते. (latest marathi news)
जिथे असतात पक्ष्यांची घरटी...
ज्या झाडांवर पक्ष्यांची घरटी असतात, ते झाड पर्यावरणाचा सोबती असते. ज्या झाडांवर पक्ष्यांची घरटी आढळतात, ते झाड वायू प्रदूषणापासून बचाव करायला सर्वांत महत्त्वाचे ठरतात. या झाडांमध्ये पिंपळ, कडुलिंब, पळस, वड या झाडांचा समावेश आहे. भारतीय संस्कृतीत सणासुदीच्या वेळी झाडांचे महत्त्व सांगितले आहे. यामागचे कारण म्हणजे वर्षातून एकदा तरी आपण या झाडांच्या संपर्कात यावे.
उंबर किंवा औदुंबराचे झाड अशा ठिकाणी वाढते, जिथे पाणी खूप प्रमाणात असेल. या झाडाचे महत्त्व म्हणजे हे उष्णता कमी करते. शहरात बांधकामामुळे तापमान वाढले आहे. ते कमी करण्यासाठी या झाडांची लागवड महत्त्वाची ठरू शकते. त्याचबरोबर सप्तपर्णी आणि मेंदीचे झाडही उष्णता कमी करण्यात मदत करतात. तुळशीमुळे प्राणवायू आणि ओझोन जास्त प्रमाणात मिळतो. तुळस ही खूप लवकर वाढते आणि कुठेही लावता येते.
वड अन पिंपळाला द्या प्राधान्य
झाडातून किती ऑक्सिजन निर्मिती होते, हा प्रश्न व याबद्दलचे कुतूहल आपल्याला नेहमीच आहे. पर्यावरणातील अशुद्ध वायू शुद्ध करण्याचे काम हे झाड करते. पिंपळ हा वातावरणातील १०० टक्के कार्बन डायऑक्साइड शोषून घेतो. पिंपळाचे झाड इतर कोणत्याही झाडाच्या तुलनेत अधिक ऑक्सिजन निर्माण करते. हे झाड ६० ते ८० फुटांपर्यंत लांब असू शकते. येत्या काही वर्षांत प्रत्येक ५०० मीटर अंतरावर एक पिंपळ आणि एक वडाचे झाड लावले तर भारत प्रदूषणमुक्त होईल, असेही प्रा. कुशल सेनाड यांनी सांगितले.
वडाचे झाड किती प्रमाणात ऑक्सिजन तयार करते, हे त्याच्या सावलीवर अवलंबून असते. झाड जितके मोठे असेल, तितका जास्त ऑक्सिजन मिळतो. अशोकाचे झाडही मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची निर्मिती करून पर्यावरणात सोडते. हे झाड दूषित गॅसही शुद्ध करण्याचे काम करते. अर्जुन वृक्षही मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन निर्माण करतो व वातावरणातील अशुद्ध वायू शुद्ध करतो.
गुलमोहर, निलगिरी, सुबाभूळ ही झाडे आपल्या देशातील पर्यावरणाला घातक आहेत. तरी पाश्चात्यांचे अंधानुकरण करून अगदी पर्यावरणाच्या बाबतीतही ज्या चुका घडल्या, त्या वड, पिंपळ, आंबा, चिंच आदी झाडे लावून पुढच्या पिढीला निरोगी आणि सुजलाम सुफलाम पर्यावरण देण्याचा प्रयत्न करूया.
कोणते वृक्ष कोठे लावावे, याबद्दल आपल्याला माहिती असणे फार आवश्यक आहे. निसर्गाने काही विशिष्ट जागा नेमून दिलेल्या आहेत, त्या ठिकाणी वृक्षारोपण झाले पाहिजे. जेणेकरून आपल्याला त्याचा अधिक लाभ मिळू शकतो.
जीवनदायी वृक्ष : वड, उंबर, पाखर, पिंपळ
मंदिराभोवती लावायची झाडे ः वड, उंबर, पाखर, पिंपळ, बेल, कदंब, शमी, आपटा, चिंच, चाफा, कडूनिंब, कांचन
रस्त्याच्या कडेला लावायची झाडे : कडूनिंब, सप्तपर्णी, करंज, वरवंटा, जारूळ, अमलतास, वड, उंबर, पाखर, नांद्रूक, पिंपळ, चिंच, शिसव, शिरीष
उद्यानास योग्य झाडे : पारिजातक, बकुळ, आवळा, उंबर, अमलतास, बांबू (पिवळा), जारूळ, चाफा, रक्तचंदन, सिल्वर ओक, आंबा, कुसुंब, सप्तपर्णी, बदाम, सीता, अशोक, कदंब
जलदगतीने वाढणारी झाडे : बकाणा, भेंडी, पांगारा, आकाशनिंब (बुच), महारुख, शाल्मली (सावर), कदंब
फळझाडे : बोर, चिंच, आवळा, मोहा, टेंभुर्णी, खिरणी, शिवण, जांभूळ, नारळ, शिंदी, ताडफळ, सीताफळ, रामफळ, कवठ, फणस, लिंबू, पेरू, चारोळी, आंबा
बांधावर उपयुक्त : खजुरिया, शिंदी, ताडफळ, बांबू, हादगा, शेवगा, शेवरी, तुती, भेंडी, तुळस, कडूलिंब
शेताच्या कुंपणासाठी : सागरगोटा, चिल्हार, शिकेकाई, हिंगणी (हिंगण बेट), घायपात, जेट्रोफा
सरपणासाठी उपयुक्त झाडे : देवबाभूळ, खैर, बाभूळ, हिवर, धावडा, बांबू, सुरू
औषधी झाडे : हिरडा, बेहडा, आवळा, अर्जुन, कडूनिंब, करंज, रिठा, निरगुडी, शिवन, टेंटू.
वनशेतीसाठी उपयुक्त : आवळा, अंजीर, फणस, चिंच, खिरणी, खजुरिया, शिंदी, तुती, करवंद
शेतजमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी : उंबर, करंज, ग्लिरिसिडीया, शेवरी
घराभोवती लावण्यास उपयुक्त : रक्तचंदन, चंदन, उंबर, बकुळ, पारिजातक, बेल, कुसुंब
कालव्याच्या काठाने लावण्यास उपयुक्त : वाळूंज (विलो), ताडफळ
बारा तासांपेक्षा अधिक काळ प्राणवायू देणारी झाडे : वड, पिंपळ, उंबर, नांद्रूक, कडूनिंब, कदंब
औद्योगिक क्षेत्रातील प्रदूषण निवारणासाठी : पिंपळ, पेल्टोफोरम, पुत्रजीवी, उंबर, अशोक (उंच व पसरणारा) शिरीष, आंबा, सीताफळ, जांभूळ, सप्तपर्णी, अमलतास, पेरू, बोर, कडूनिंब, आवळा, चिंच, कदंब, बेल
हवेतील प्रदूषण दर्शविणारी झाडे : हळद, पळस, चारोळी. हवेतील प्रदूषण मर्यादेपलीकडे गेल्यास वरील झाडांची पाने, फुले, साल, फळे यात विकृती निर्माण होते.
रस्त्यामधील भागात लावण्यास उपयुक्त झाडे : कोरफड, शेर, रुई, जेट्रोफा, अश्वगंधा, निवडुंगाचे प्रकार ही झाडे वाहनातून निर्माण होणारे वायूशोषण करून परिसर स्वच्छ ठेवतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.