समाजाच्या प्रवाहात पुढे जात कुटुंबाला सावरताना अनेक चढ-उतार येतात. मात्र स्वतःवर विश्वास असला तर परिस्थिती नक्कीच नतमस्तक होते. अल्पशिक्षित असूनही मनात कमीपणा न ठेवता बांगडी व्यवसायातून घरोघरी जाऊन विक्री करताना कष्ट आणि जिद्दीच्या जोरावर भव्य शॉपिंग मॉलच्या मालकीण बनल्या कळवणच्या मायाताई कासार... त्यांच्या या असामान्य जिद्दीचा प्रवास. (bengals seller maya kasar became mall owner after rising from small business Nashik Latest Marathi News)
मा याताई बाळकृष्ण कासार यांचे शिक्षण जेमतेम नववी... अभ्यासात हुशार असूनही परिस्थितीमुळे त्यांना नववीतच शिक्षण सोडावे लागले. रावळगावचे माहेर अन् सासर कळवणचे. वडील सुधाकर बाळाजी कुंभकर्ण यांच्या परिवारातील पत्नी कमलबाई आणि मायाताई यांच्यासह सहा जणांचे कुटुंब... रोज कमवून आणले नाही तर कुटुंबाला उपासमारीला सामोरे जावे लागणार, अशी स्थिती. या कुटुंबात मायाताई जन्माला आल्या.
वडिलांच्या पारंपरिक बांगड्या भरण्याच्या व्यवसायाने मायाताईंना प्रेरणा मिळत गेली. प्राथमिक शाळेत चौथीत शिक्षण घेत असतानाच कुंभकर्ण कुटुंबाला आर्थिक हातभार लागावा, यासाठी मायाताई शाळेची वेळ वगळता बांगड्या भरण्यासाठी घरोघरी जात. दोन पैसे मिळविण्यासाठी धडपड करीत होत्या. परिस्थितीमुळे वडिलांनी त्यांचा विवाह कळवण येथील कासार कुटुंबातील बाळकृष्ण कासार यांच्याशी करून दिला. कासार परिवाराची परिस्थितीही जेमतेमच होती.
सासरे अनंतराव व सासू शांताबाई यांनीही कुटुंबातील सदस्यांना आर्थिक परिस्थिती बेताचीच असतानाही मायाताईंनी परिवाराला नेहमीच प्रोत्साहन दिले. लग्नानंतर काही महिन्यांतच मायाताई यांनी परिवारासाठी आर्थिक मदत व्हावी, म्हणून बांगडी व्यवसायात मदत करण्यास सुरवात केली. कळवण शहर आणि परिसरात घरोघरी जाऊन बांगड्या विक्रीचा व्यवसाय त्यांनी सुरू केला.
व्यवसाय पोचला शिखरावर
पारंपरिक बांगडी व्यवसायातून कुटुंबाला बाहेर काढण्यासाठी मायाताई यांनी प्रचंड मेहनत घेतली. त्यांच्या धडपड्या प्रयत्नांना पती बाळकृष्ण यांनी साथ देतानाच त्यांना प्रोत्साहन दिले. याच काळात रावळगाव येथील भाऊ श्याम कुंभकर्ण यांनी त्यांना मदत केली. या काळात त्यांच्यासाठी कुटुंबाने सात हजार रुपयांचे भांडवल उपलब्ध करून देत दुकान टाकण्यासाठी पाठबळ दिले.
येथूनच खऱ्या अर्थाने १९९८ मध्ये मायाताई यांच्या प्रयत्नांना यश मिळत गेले. आज त्यांनी सुरू केलेला सात हजारांपासूनचा व्यवसाय कळवण आणि पंचक्रोशीत फोफावला आहे. शहरात भव्य तीन मॉल उभे करत मिळविलेले यश वर्णन करताना मात्र मायाताईंचे डोळे पाणावले.
कुटुंबाची जडणघडण उभी केली
परिस्थितीचे चटक्यांची कुटुंबाला एव्हाना जणू सवयच झाली होती, मात्र परिस्थितीला न घाबरता त्यांचे प्रयत्न सुरूच होते. याच काळात कुटुंबात मुलगा सचिन आणि शुभम यांच्या निमित्ताने सदस्यसंख्या वाढली. आयुष्यात परिस्थितीमुळे शिक्षण सुटलेल्या मायाताई यांनी मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष पुरविले.
त्यांच्या या जाणिवेतून सचिनने वाणिज्य शाखेत पदवी, तर शुभमने विज्ञान शाखेचे पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करत परिवाराचा विश्वास सार्थ ठरविला. मात्र मुलांनी नोकरीच्या मागे न लागता व्यवसायात येण्यासाठी त्यांचे प्रयत्न फळाला आले.
गरजू कुटुंबांसाठी बनल्या आधार
कळवण शहरात आज स्वामिनी या नावाने उभे असलेले भव्य दालन त्यांच्या कष्टाची साक्ष देते आहे. बॅग हाउस, साड्यांचे भव्य दुकान, भांडी विक्री तसेच लेडीज स्टोअर्सच्या निमित्ताने उभे केलेले उद्योजिका म्हणून मायाताई यांच्या कष्टाची साक्ष देते आहे. उद्योजिका म्हणून स्वतःची ओळख उभी करतानाच त्यांच्या मॉलमध्ये आज पंधरा महिलांना कायमस्वरूपी रोजगाराची संधी मिळाल्याने गरजू कुटुंबांसाठी यानिमित्ताने त्या आधार बनल्या आहेत.
महिलांनी पुढे यावे
स्वतःच्या मॉलबरोबरच परिसरातील लहान-मोठ्या दुकानदारांनाही मायाताई होलसेल दरात मालाची विक्री करतात. अतिशय कष्टमय परिस्थितीत सुरू झालेला हा प्रवास पुढे नेत असताना त्यांच्या प्रतिकूल काळात शहरातील वंदना परदेशी, शकुंतला मालपुरे, वसंत मालपुरे यांच्या कुटुंबांनी दिलेला आधार खूप मोलाचा असल्याचे त्या अभिमानाने सांगतात.
आता व्यवसायात पती बाळकृष्ण, मुलगा सचिन, शुभम तसेच सुना आरती आणि अश्विनी यांची मोलाची साथ मिळते आहे. परिस्थिती कशीही असली तरी स्वतःच्या प्रयत्नांनी त्यावर नक्कीच मात करता येते, असा धडा त्यांनी आपल्या कृतीतून घालून दिलेला आहे. कधीकाळी आर्थिक परिस्थितीमुळे प्राथमिक शाळेत असतानाच कुटुंबाला आर्थिक मदत व्हावी म्हणून बांगडी विकणाऱ्या मायाताई कासार आज उद्योजिका म्हणून महिलांसाठी प्रेरणास्थान बनल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.