नाशिक : शहरात साकारल्या जाणाऱ्या देशातील पहिल्या टायरबेस मेट्रो प्रकल्पासाठी ५० डब्यांचे (कोच) डिझाइन, उत्पादन, टेस्टिंग व पुरवठ्यासाठी केंद्र सरकारच्या भेल कंपनीने पुढाकार घेतला असून, भागीदार शोधण्यासाठी स्वारस्य देकार मागविल्याने मेट्रो निओ प्रकल्पाला चालना मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पंतप्रधान कार्यालयात मंजुरीसाठी असलेल्या नस्तीवरही आता निर्णय होणार असून, लवकरच प्रकल्पाचे काम हाती घेतले जाणार आहे.
प्रकल्पासाठी दोन हजार ९२ कोटींची तरतूद
नाशिक शहरातील वाढत्या लोकसंख्येला आधुनिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पुरविण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टायरबेस मेट्रो प्रकल्प देण्याचे जाहीर केले होते. त्यासाठी मेट्रोचे सर्वेक्षण करण्याचे काम सिडको आणि महामेट्रोला दिले. नाशिकमध्ये मेट्रो सेवेसाठी आवश्यक ताशी २० हजार प्रवासी क्षमता उपलब्ध नसल्याने मेट्रोऐवजी एलीव्हेटेड टायरबेस मेट्रो चालविण्याची शिफारस महामेट्रोने केली. त्यानुसार राइट्स संस्थेच्या अहवालानुसार टायरबेस मेट्रो सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. ‘मेट्रो निओ’च्या प्रकल्पास २९ ऑगस्ट २०१९ ला झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी दिल्यानंतर केंद्राच्या मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करण्यात आला. केंद्रीय अर्थसंकल्पात प्रकल्पासाठी दोन हजार ९२ कोटींची तरतूद करण्यात आली.
प्रकल्पासाठी महापालिका उपलब्ध करून देणार जागा
महामेट्रोच्या आराखड्यानुसार नाशिकच्या मेट्रो निओसाठी ३१ किलोमीटरचे दोन एलिव्हेडेट मार्ग तयार केले जाणार आहेत. या मार्गावर २५ मीटर लांबीची २५० प्रवासी क्षमता असलेली जोडबस धावणार आहे. चार वर्षांत हा प्रकल्प पूर्ण केला जाणार आहे. या प्रकल्पासाठी २१००.६ कोटी खर्च येणार असून, महाराष्ट्र सरकार, सिडको आणि महापालिकेचा वाटा २५५ कोटींचा असणार आहे. केंद्र सरकार ७०७ कोटी रुपये देणार आहे, तर एक हजार १६१ कोटींचे कर्ज यासाठी उभारले जाणार आहे. या प्रकल्पासाठी महापालिका जागा उपलब्ध करून देणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघातही टायरबेस मेट्रो प्रकल्प उभारला जाणार असल्याने आतापर्यंत पंतप्रधान कार्यालयात नस्ती पडून आहे.
कोचसाठी ‘भेल’चा पुढाकार
केंद्र सरकारच्या भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (BHEL)ने पहिल्या कॉरिडोरसाठी ३६, तर दुसऱ्या कॉरिडोरसाठी १४ असे एकूण ५० डब्यांचे (कोच) डिझाइन, उत्पादन, पुरवठ्यासाठी पुढाकार घेतला असून, भागीदारीसाठी स्वारस्य देकार मागविले आहेत. त्यामुळे प्रकल्पाला चालना मिळणार आहे.
(BHEL-initiative-for-coach-design-of-Nashik-Metro-marathi-news)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.