नाशिक : राज्यातील राजकारणाचे पडसाद नाशिक जिल्ह्यातही उमटू लागले आहेत. बंडखोरी केलेल्या मंत्री आणि आमदारांविरोधात ठिकठिकाणी रोष व्यक्त होत आहे. शिवसेनेच्या (Shiv sena) शालिमार येथील कार्यालयावरील बॅनवर असलेल्या कृषिमंत्री दादा भुसे (Agriculture Minister Dada Bhuse) आणि आमदार सुहास कांदे (MLA Suhas Kande) यांच्या नावाला आज शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी काळे फासून जोरदार घोषणाबाजी केली.
शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची दुपारी कार्यालयात बैठक झाली. त्यात पक्षातील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख व मुख्यमंत्र्यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी चर्चा झाली. त्यानंतर महिला आघाडी पदाधिकाऱ्यांनी शालिमार चौकातील कार्यालयावरील असलेल्या नामावलीत कृषिमंत्री दादा भुसे, तसेच आमदार सुहास कांदे यांच्या नावावर काळे फासले. या वेळी जोरदार घोषणाबाजी करीत, भुसे व कांदे यांच्या विरोधात लाखोली वाहिली. शिवसेनेच्या महानगर संघटक, तसेच महिला पदाधिकाऱ्यांनी आज दुपारी आंदोलन केले.
व्हॉट्सॲपग्रुपवर लाखोल्या
कृषिमंत्री दादा भुसे यांच्या स्वीय सहाय्यकांनी कृषी योजनांची माहिती देण्यासाठी काही व्हॉट्सॲप ग्रुप केले आहेत. त्यापैकीच एका ग्रुपवर गुलाबराव पाटील यांच्या जुन्या भाषणातील क्लिपपासून तर थेट मंत्र्यांच्या गद्दारीविषयी खुलेआम पोस्ट पाहायला मिळत आहे. चोंग्यापासून अनेक वाईट शब्दांत लिहिलेल्या शिवसेनेच्या फलकांचे फोटो तसेच अनेक विखारी टीकात्मक संदेशही टाकले आहेत. शिवसेना आणि ठाकरे नाव वगळून जगून दाखवा. आमदार घेऊन गेलात, मतदार घेऊन गेलेला नाहीत. मतदार मतदारसंघातच आहे. मुख्यमंत्री वेळ देत नव्हते, तुम्ही तरी मतदारसंघात कुठे वेळ देत होता, अशा प्रकारच्या पोस्टचा पाऊस सुरू आहे.
कांदेंचे कार्यालय चर्चेत
दुसरीकडे आमदार सुहास कांदे यांच्या नाशिक येथील कार्यालयात काही अक्रित घडायला नको म्हणून त्यांच्या कार्यकर्त्यांनी आज दिवसभर कार्यालयावर तळ ठोकला होता. कार्यालयाभोवती त्यांचे समर्थक कार्यकर्ते लक्ष ठेवून होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.