Hemant Parakh Esakal
नाशिक

Hemant Parakh: बिल्‍डर पारख सुखरूप परतले! अपहरण नाट्याबाबत संशय कायम; संशयितांचा लागेना सुगावा

अखेर अपहरण झालेले बांधकाम व्यावसायिक हेमंत पारख यांची सुखरुप घरवापसी

सकाळ डिजिटल टीम

नाशिक शहरातील नामांकित गजरा उद्योगसमूहाचे संचालक व बांधकाम व्यावसायिक हेमंत पारख यांचे शनिवारी (ता. २) रात्री साडेनऊ-दहाच्या सुमारास इंदिरानगर परिसरातील बंगल्यासमोरून अपहरणानंतर रविवारी (ता. ३) सकाळी ते वलसाड (गुजरात) येथे सुखरूप असल्याचे समजले. त्यानंतर नातलग व त्याच मार्गावर गेलेल्या पोलिसांनी त्यांना दुपारी सुरक्षितरीत्या नाशिकमध्ये आणले. दरम्यान, पारख सुखरूप आले असले तरी त्यांचे अपहरण आणि झालेली सुटका तसेच संशयितांबाबत अद्यापही पोलिसांच्या हाती काहीही लागलेले नसल्याने या साऱ्या अपहरण नाट्यावर संशय व्यक्त होत आहे. (Latest Marathi News)

अपहरणानंतर पोलिस आयुक्त अंकुश शिंदे इंदिरानगर पोलिस ठाण्यात तळ ठोकून होते. रात्रभर पोलिसांकडून संशयिताचा माग काढून पथके परराज्यांत पोहोचली. हेमंत पारख यांचा इंदिरानगर परिसरात निहिता बंगला आहे. याच बंगल्याबाहेर पारख हे शनिवारी (ता. २) रात्री साडेनऊ-दहाच्या सुमारास फोनवर बोलत होते. त्या वेळी आलेल्या कारमधून संशयितांनी त्यांचे अपहरण केले. त्या वेळी पारख ‘वाचवा-वाचवा’ असे ओरडल्याने कुटुंबीयांनी घराबाहेर धाव घेईपर्यंत कार पसार झाली होती.(Latest Marathi News)

घटनेची माहिती मिळताच पोलिस आयुक्त शिंदे, गुन्हे शाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव, उपायुक्त मोनिका राऊत, इंदिरानगरचे निरीक्षक नितीन पगार यांच्यासह शहर गुन्हे शाखेच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. आमदार प्रा. देवयानी फरांदे याही घटनास्थळी पोहोचल्या. पोलिसांची पथके पेठ, दिंडोरी, त्र्यंबकमार्गे परराज्यांत पाठविण्यात आली. मुंबई-पुण्याच्या दिशेने काही पथके रवाना करण्यात आली. पोलिसांनी शहरातील सीसीटीव्हीतून संशयितांचा माग काढण्याचा प्रयत्न केला.

कुटुंबीय भावूक

पारख यांना सुखरूप घरी आलेले पाहून त्यांच्या आई पुष्पावती, वडील मदन पारख, पत्नी राजकुवर, मुलगी वास्तुविशारद नीतिशा आणि मुलगा निलय यांच्यासह संपूर्ण कुटुंबीयांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली. त्यांचे मित्र आणि नातेवाईकही भावूक झाले होते. अमेरिकेत असलेली मुलगी हिता हिनेही वडिलांशी संवाद साधला.(Latest Marathi News)

पोलिस पथके परराज्यांत

पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, उपायुक्त प्रशांत बच्छाव, मोनिका गावित यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेने सहा पथके मुंबई, पुण्यासह गुजरातच्या दिशेने रवाना केली. वरिष्ठ निरीक्षक नितीन पगार यांनी पारख त्यांना बसलेल्या मानसिक धक्क्यातून सावरल्यावर त्यांचा जबाब घेणार असल्याचे सांगितले. तसेच, त्यांच्या मोबाईलचे लोकेशन त्यांच्या घराजवळचेच असल्याचे सांगितले. पोलिसांनी राजस्थानच्या दिशेने तपास केंद्रित केला असून, या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे.

भुजबळांनी दिला धीर

पहाटे चारपर्यंत पोलिसांसह माजी नगरसेवक ॲड. श्याम बडोदे, सतीश सोनवणे, आनंद सोनवणे, बॉबी काळे आदी त्यांचा शोध घेत होते. आज ते सुखरूप घरी परत आल्याने त्यांच्या सर्व नातेवाइकांनी समाधान व्यक्त केले. दरम्यान, मंत्री छगन भुजबळ, आमदार प्रा. फरांदे यांनी पारख कुटुंबीयांची भेट घेत पारख यांना धीर दिला.

अपहरण, सुटकेनंतरही अनेक प्रश्न गुलदस्त्यात...

हेमंत पारख यांचे अपहरण झाल्यावर पहाटे साडेपाच-सहाच्या सुमारास त्यांना वलसाड येथे संशयितांनी मुक्त केले. मग संशयितांनी त्यांचे अपहरण कशासाठी व कोणी केले होते?

पारख यांच्या अपहरणानंतर त्यांच्या कुटुंबीयांना संशयितांकडून खंडणीसाठी संपर्क साधला का? याबाबत पोलिसांकडे कोणतीही माहिती नाही. पण, संशयित नेमके कोणाच्या संपर्कात होते? की खंडणी दिल्यावर त्यांची सुटका झाली?

पारख यांना ज्याठिकाणी संशयितांनी सोडले, त्याठिकाणी ना गुजरात पोलिस पोहोचले, ना नाशिक पोलिस. मित्र व नातलग आधी पोहोचले, ते कसे काय?

हा प्रकार व्यावसायिक स्पर्धेतून झाला की जमिनीच्या वादातून?

पोलिस सीसीटीव्ही तपासत आहेत; परंतु अद्याप त्यांना एकाही टोलनाक्यावर पारख यांचे अपहरण केलेले वाहन दिसून आलेले नाही, मग ते वाहन वलसाडला कसे पोहोचले?

संशयित परराज्यांतील आहेत, असे बोलले जाते; तर अद्याप त्यांचा कोणताही सुगावा पोलिसांना का लागू शकलेला नाही?

शहराबाहेर ग्रामीण पोलिसांची नाकाबंदी असताना हे वाहन त्यातून निसटले कसे? या आणि यांसारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे गुलदस्त्यात असून, पोलिस यांची उकल करतील का, असा प्रश्न यानिमित्त उपस्थित होतो.

हेमंत पारख यांनी सांगितली आपबिती...

पारख हे रविवारी (ता. ३) सकाळी साडेअकरा-दुपारी बाराच्या सुमारास नाशिकमध्ये पोहोचले. अपहरणामुळे त्यांना मोठा मानसिक धक्का पोहोचला होता. त्यातून सावरत त्यांनी आपबिती सांगितली. कारमध्ये असलेले चारही संशयित हे राजस्थानी भाषेत संवाद साधत होते. त्यातील दोघे कारबाहेर जायचे; तर दोघे कारमध्ये बसून असायचे. पारख यांच्या डोळ्यांवर पट्टी बांधण्यात आली होती.

संशयितांनी त्यांचा फोन काढून घेतला होता. तसेच, कोणत्या दिशेने आणि मार्गाने नेले, याबाबत त्यांना काहीही माहिती नाही. वलसाडजवळील पेट्रोलपंपाजवळ त्यांना पहाटे साडेपाच-सहाच्या सुमारास कारमधून उतरविण्यात आले. नंतर त्यांनी पेट्रोलपंपावरील मुलाच्या मोबाईलवरून भाऊ व मित्रांना संपर्क साधला. भावांनी वलसाडमधील नातलगांना संपर्क साधून त्यांच्याजवळ जाण्यास सांगितले. नाशिकमधून नातेवाईक व मित्र पहाटे पोहचले.

पारख कुटुंबीयांना धीर देण्यासाठी भेट घेतली. घराजवळून अपहरण होते, उद्या घरात घुसून अपहरण करतील. आम्हाला जेथे बोलायचे तेथे आम्ही बोलू. अपहरणकर्ते साधारण कोणत्या भागातील असावेत, याचा अंदाज आला आहे.

- छगन भुजबळ, मंत्री

सदरची घटना गंभीर आहे. याबाबत पोलिस आयुक्तांची भेट घेणार आहे. उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रत्यक्ष भेटून एकंदरच नाशिकमधील वाढत्या गुन्हेगारीबाबत त्यांना सत्यस्थिती कथन करणार आहे.

- प्रा. देवयानी फरांदे, आमदार

आई-वडिलांची पुण्याई आणि ज्येष्ठांच्या आशीर्वादामुळे सुखरूप घरी परत आलो आहे. पूर्ण प्रवासात डोळ्यांवर पट्टी बांधून ठेवल्याने आणि कुठेही उतरू न दिल्याने नेमके काय सुरू आहे, हे काही कळले नाही. अजूनही रात्रीचे ते आठ-दहा तास अंगावर शहारे आणतात.

- हेमंत पारख, बांधकाम व्यावसायिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT