पल्लवी कुलकर्णी-शुक्ल : सकाळ वृत्तसेवा
नाशिक : दीपोत्सवातील साजशृंगारात दागिने हा महिलांचा आवडता विषय. पारंपरिक दागिने यांची तर महिलांना भुरळ पडते. पूर्वीच्या दागिन्यांची कलाकुसर, सुबकता, रेखीवपणा कमालीची असायची. नऊवारी साडीवर आजही महाराष्ट्रीयन पारंपरिक दागिने, पेशवेकालीन दागिने परिधान केले जातात. त्यात कंठा, वज्रटीक, कोल्हापुरी साज, मोत्याचे दागिने, चपलाहार, गहू तोडे, पैंजण असे आदी प्रकारही आहेत. बदलत्या युगानुसार पारंपरिक दागिने व आधुनिक पद्धतीत दागिने यांचा ताळमेळ घातला जात आहे.
पाषाणयुगापासून अलंकार, दागिन्यांचा वापर केला जातो. यात पूर्वी पाने, फुले, हस्तीदंताचे दागिने असायचे. प्रगती होत गेली तसे सोने-चांदीपासून दागिन्यांची कलाकुसर विकसित होत गेली. पेशवेकालीन दागिने लोकप्रिय पारंपरिक दागिने आहेत. दागिन्यांचे विविध प्रकार आहेत. (Celebrate Diwali with healthy Jewelry physical health have mysterious relationship Nashik News)
पारंपरिक दागिने प्रकार
चपलाहार, पुतळीहार, कोल्हापुरी साज, कंठा, वज्रटीक हार, चिंचपेटी, तन्मणी, राणीहार, बकुळीहार, गजराहार, जोंधळीहार, वाकी, बाजुबंद, झुबे, कर्णफुले, बुगडी, कुड्या, वेल, मासोळ्या, जोडवी, मेकला, छल्ला, नथ, पैंजण आदी. बांगड्यांमध्ये शिंदेशाही तोडे, गहू तोडे, पिचोडी, पाटल्या आदींचा समावेश होतो.
दागिने घेतात शरीरस्वाथ्याची काळजी
सौंदर्यवृद्धी करण्यासोबत दागिने आपल्या शरीरस्वास्थ्याची काळजी घेतात. काही रोग बरे करण्यास मदत करतात, असे आयुर्वेदात नमूद आहे. ज्या धातूचे दागिने असतात त्यांचा प्रभाव शरीरावर होतो. ते आपल्या शरीरातील काही नलिकाबिंदूंवर दबाव टाकतात आणि त्यामुळे शारीरिक समस्या दूर होण्यास मदत होते आणि मन व शरीर प्रसन्न राहाते. आयुर्वेदानुसार सोन्याच्या दागिन्यांना कमरेच्यावरील भागातील अंगावर, तर चांदीच्या दागिन्यांना संपूर्ण शरीरभर परिधान केले पाहिजे.
प्रमुख दागिन्यांविषयी...
नथ
परंपरागत नथ हा दागिना सर्व दागिन्यांना शोभा आणणारा दागिना. महाराष्ट्रीयन दागिन्यातील प्रिय असा दागिना. प्रामुख्याने मोत्याची नथ व त्यातील लाल डायमंड अतिशय सुरेख दिसतो.
वज्रटीक अथवा कंठा
अंबाबाईच्या दागिन्यातील प्रमुख दागिना म्हणजे वज्रटीक. हा दागिना महाराष्ट्राचे प्रमुख पीक ज्वारीने प्रेरित असून, त्यात जोंधळी मण्यांच्या तीन रांगा बसवलेली कापडी लालपट्टी विणलेली असते. तसेच या दागिन्यात बेलपानाच्या आकाराचे नक्षीकाम लक्षवेधक आहे. कंठा यात रेशीम धाग्यात मधोमध सोन्याच्या मण्यांची एकत्रित गुंफण असते. हा दागिना गळ्याजवळ अलगत व चपखल बसतो म्हणून याला कंठा असे म्हणतात.
चंद्रहार
पेशवेकालीन सुमारे अठराशे सालापासून प्रचलित असलेला चंद्रहार. हा एकात एक असा गुंफलेल्या गोल सोन्यांच्या मण्यांच्या माळा या लांब अथवा मध्यम स्वरूपात असतात. त्यामुळे गळ्याला भरगच्च ‘लूक’ येतो.
तन्मणी
तन्मणी यात पदकाचे वेगवेगळे प्रकार आहेत. मोत्यांच्या एक, तीन अथवा पाच सरींमध्ये असलेला एक खडा अथव अनेक खड्यांचे पदक असा हा दागिना. तसेच रेशमाच्या धाग्यात पदक गुंफलेले असते.
मोहनमाळ व बोरमाळ
मोहनमाळ महालक्ष्मीच्या दागिन्यातील दागिना आहे. कमी वजनात व दिसायला भारदस्त असल्याने महिलांमध्ये प्रिय आहे. तसेच बोरमाळमध्ये बोराच्या आकाराच्या सोन्याच्या मन्यात लाख भरलेली असल्याने तो भरगच्च असा दिसतो.
जोंधळी पोत
जोंधळी पोत विशेषतः महाराष्ट्रात वापरला जाणारा दागिना आहे. जोंधळ्याच्या दाण्यासारखे नक्षीकाम असलेल्या मण्यांच्या दोन अथवा तीन पदर एकत्र करून त्यात वेगवेगळ्या आकाराचे पदक वापरले जाते. तसेच पदक नसले तरी जोंधळी पोत छान व भरगच्च दिसते.
चपलाहार
पूर्वांपार चालत आलेला तसेच पोह्यांच्या आकाराचे नक्षीकाम असलेली माळ. यात तीन, पाच, सात पदरी एकत्रित गुंफण केलेली असते.
पाटल्या
पाटल्यांनी हात भरगच्च दिसतो. यात पाटल्यांचे नक्षीकाम हे चपट्या स्वरूपात असते. पिचोडी यात बांगडयांची एक बाजू सरळ असून, दुसऱ्या बाजूस नक्षीकाम असते. या काचेच्या बांगडयांच्या मागे घालण्यात येतात. म्हणून त्यांना पिचोडी असे म्हणतात. गहू तोडेमध्ये गहूच्या आकाराची डिझाइन असलेले तोडे व शिंदे तोडे यात पानांची नक्षीकाम असलेले तोडे आकर्षक दिसतात.
पुतलीहार
चपट्या स्वरूपातील गोल आकारावर लक्ष्मीची प्रतिमा असलेली पाने असतात. ही दोऱ्यात ओवलेली असतात. चपट्या स्वरूपातील अथवा पैशांच्या आकारासारखी असल्याने त्याला पुतलीहार असे संबोधले जाते.
मंगळसूत्र
सोन्याच्या चार मणी व मधोमध दोन वाट्या काळ्या मण्यात, गाठले, डोरले, गुंठण, तसेच सोन्याच्या नक्षीकामात गुंफलेले असते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.