इंदिरानगर : इंदिरानगर भागात यंदाच्या महापालिका निवडणुकीत विक्रमी चौकार, षटकार आणि हॅटट्रिक मारण्यासाठी सज्ज राजकीय घराण्याचे नव्याने इच्छुक उमेदवारांपुढे मोठे आव्हान आहे. विद्यमान महापौर सतीश कुलकर्णी सलग पाच वेळा या भागातून निवडून आले आहेत. यंदा ते स्वतः की त्यांच्या कन्या आणि भाजप महिला आघाडीच्या प्रदेश पदाधिकारी संध्या कुलकर्णी षटकार मारतात ही उत्सुकता आहे.
त्यांच्याच प्रभाग २३ मध्ये नगरसेवक असलेले चंद्रकांत खोडे यांनी यापूर्वीच चौकार मारला असून, त्यांचे कुटुंबदेखील पाचव्यांदा उमेदवारीचे दावेदार आहेत. त्यांचा पुतण्या संकेतदेखील त्यांच्या सोबत सर्वत्र झळकत असल्याने खोडे यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष आहे. याच प्रभागातील नगरसेविका रूपाली निकुळे यांचे पती यशवंत निकुळे हे गतवेळी मनसेचे नगरसेवक होते. शिवाजी वाडी आणि भारतनगर भागात त्यांनी आपले वर्चस्व निर्माण केले आहे. अनुसूचित जमाती या त्यांच्या गटात त्यांनी मोठे आव्हान उभे केले आहे. शेजारीच असलेल्या प्रभाग ३० चे विद्यमान नगरसेवक सतीश सोनवणे गतवेळी मनसेतर्फे निवडून आले. मात्र अवघ्या दोन वर्षात त्यांनी मनसेला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला.
सभागृह नेता म्हणून त्यांनी केलेली कामे, संपूर्ण प्रभागात विणलेले सीसीटीव्हीचे जाळे, वैयक्तिक संबंध आणि स्वच्छ प्रतिमेमुळे त्यांच्या हॅटट्रिकची प्रबळ दावेदारी आहे. याच प्रभागातील नगरसेविका सुप्रिया खोडे यांचे पती सुनील खोडे २००७ ला भाजपतर्फे निवडून आले होते. वैयक्तिक संबंध आणि वडाळा गावावर असलेली एक हाती पकड त्यांच्यासह पक्षाचे मोठे बलस्थान आहे. याच प्रभागातील नगरसेविका डॉ. दीपाली कुलकर्णी या गतवेळी मनसे आणि यंदा भाजपच्या नगरसेविका आहेत. त्यांचे पती सचिन यांचे येथील घराघरांत संबंध आहेत. स्वीकृत नगरसेवक असलेले ॲड. अजिंक्य साने यांचे वडील आणि भाजपचे ज्येष्ठ नेते विजय साने स्वतः रविवार कारंजा भागातून तीन वेळा निवडून आले आहेत. महापौर वगळता जवळपास सर्व प्रमुख पदांवर त्यांनी काम केले आहे. त्यांचे थेट वरिष्ठांचे असलेले संबंध सर्वश्रुत आहेत. त्यामुळे साने घराणेदेखील पंचक मारण्याच्या तयारीत आहे.
उमेदवार जाहीर करताना कसरत
शिवसेनेतदेखील अमोल जाधव १९९७ आणि २००७ असे दोन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. तर, त्यांच्या पत्नी संगीता जाधव या प्रभाग ३१ च्या विद्यमान नगरसेविका आहेत. चेतनानगर, राणेनगर आदी भागात त्यांचे वर्चस्व आहे. अजातशत्रू प्रतिमा आणि कोरोनाकाळात त्यांच्या ऑक्सिजन कंपनीमुळे सर्वसामान्यांना झालेली मदतीमुळे नागरिकांत त्यांची प्रतिमा उजळ आहे. हे कुटुंबदेखील चौकार मारण्याच्या तयारीत आहे. त्यांच्याच विहीनबाई असलेल्या वंदना बिरारी स्वतः २००७ आणि २०१२ च्या निवडणुकीत सेनेतर्फे नगरसेविका होत्या. त्यांच्या सासूबाई दिवंगत सुशीला बिरारी २००२ ला नगरसेविका राहिल्या आहेत. यंदा त्यांचे पती आणि माजी महानगरप्रमुख देवानंद बिरारी हे इच्छुक असून बिरारी घराणे चौकार मारण्यासाठी सज्ज झाले आहे. अर्थात उपरोक्त सर्वांसमोर नव्याने इच्छुक असलेल्यांनीदेखील आपल्या कामातून आपली जोरदार दावेदारी केली आहे. त्यामुळे शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षाच्या श्रेष्ठींना येथील काही जागांवर उमेदवार जाहीर करताना कसरत करावी लागेल असे चित्र आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.