Khanderao Maharaj Yatrotsav : पौष पौर्णिमेच्या मुहूर्तावर चंदनपुरीचे जावई खंडेराव महाराजांच्या यात्रोत्सव गुरुवारपासून (ता. २५) सुरू झाला. येळकोट येळकोट जय मल्हार गजरात भंडारा, खोबरे उधळून देवांच्या पालखीची व काठ्या कवाडीच्या मिरवणुकीने जल्लोषात यात्रेची सुरुवात झाली.
सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) तथा पालकमंत्री दादा भुसे यांच्या पत्नी अनिता भुसे, सुरेश निकम सपत्नीक यांनी खंडेराव महाराजांच्या मंदिर आवारात तळी भरून व महापूजा करून यात्रोत्सवाचा प्रारंभ केला.
भंडारा व खोबऱ्याच्या उधळीने चंदनपुरी पिवळ्या रंगात न्हाहून निघाली. गुरुवारी सकाळी सातला कौतिक अहिरे यांच्या घरातून खंडेराव महाराज, म्हाळसाबाई व बानुबाईचे मुखवटे पालखीत ठेवून मिरवणुकीचा प्रारंभ झाला. डीजे ढोल ताशा यांच्या दणदणाटात शेकडो तरुण नाचत भंडाऱ्याची उधळण करत होती.
गावातील प्रमुख मार्गावरुन पालखी मिरवणूक मंदिरात आली. संपूर्ण गावात महिलांनी अंगणात सडा रांगोळी टाकून पालखीची घरोघरी पूजा करून स्वागत केले. मिरवणुकीत हजारो किलो भंडारा उधळला गेला. पहिल्या दिवशी किमान ८० हजाराहून अधिक भाविकांनी खंडेराव महाराजांचे दर्शन घेतले.
तालुक्यातील विविध डीजे चालकांनी व परिसरातील बहुसंख्य अश्वमालकांनी अश्वासह मंदिर परिसरात हजेरी लावली. अनेक अश्वांना फुलांच्या माळा घालून सजविण्यात आले होते. मिरवणुकीत अश्वांनीही ठेका धरला. वाघ्या मुरळींची मंदिर परिसरात व मंदिराबाहेर मोठी गर्दी होती.
असंख्य भाविक घरगुती देव्हाऱ्यातील देव भेटण्यासाठी मंदिरात घेऊन आले होते. खंडेराव महाराज यात्रा उत्सव मिरवणुकीत भाविक वीस ते पंचवीस फुटावून अधिक उंचीच्या देवांच्या काठ्या आणतात. मिरवणुकीत काठ्या नाचविल्या जातात.
यात्रा यशस्वितेसाठी सरपंच विनोद शेलार, ट्रस्ट अध्यक्ष सतीश पाटील, सचिन पाटील, बाबाजी सोनवणे, अशोक अहिरे, संजय पवार, कैलास शेलार, संजय अहिरे ,सुभाष पवार, दादा सोनवणे, बाबाजी शेलार व पदाधिकारी प्रयत्नशील होते.
बानूबाईंची सवाद्य मिरवणूक
मालेगावहुन भाविकांनी बानुबाईची मूर्ती जेजुरीला खंडेरायाला. भेटवून चंदनपुरीला मंदिरात सवाद्य भेटण्यासाठी आणली होती. बीड जिल्ह्यातील काकडा वाल्यांनी मंदिर परिसरात नृत्य करत काकडा अंगावर चालविला. सरपंच विनोद शेलार यांनी दादा भुसे व सुरेश निकम यांचा सत्कार केला.
''कसमादे पट्ट्यात दुष्काळी परिस्थिती आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. शेतकऱ्यांना दुष्काळमुक्त होवू दे. दुष्काळी संकट निवारण्याची शक्ती दे. संपुर्ण राज्यातील जनतेला सुख शांती व भरभराटी लाभू दे असे साकडे खंडेरायाची तळी भरताना घातले.''- दादा भुसे, पालकमंत्री
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.