Swami Samarth Gurupeeth : ‘भागवत हा असा ग्रंथ आहे, की कितीदा त्याची पारायणे केली तरी त्यातील गोडी कमी न होता ती अधिकाधिक वाढतच जाते. रामायण, महाभारतप्रमाणे यातील कथा प्रत्येक वेळी मनाला अधिक आनंद देतात.
पुरुषोत्तम किंवा अधिक मासात भागवत पारायणाची सेवा अधिक आनंददायी, फलदायी ठरत असल्याचा अनुभव आमच्या अनेक पिढ्यांनी घेतलेला असल्यामुळे सध्याच्या पुण्यकाळात श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सानिध्यात ही सेवा करणारे सेवेकरी, भाविक खरंच पुण्यवान आणि भाग्यवान आहेत.
भागवत निव्वळ कृष्णलीलाच सांगत नाही, तर सत्संग, भक्ती, ध्यानयोग, ज्ञानयोग अशा गोष्टींचे श्रेष्ठत्व सांगणारा पवित्र ग्रंथ आहे, असे उद्गार समर्थ गुरुपीठाचे महाव्यवस्थापक चंद्रकांतदादा मोरे यांनी आज काढले. (Chandrakant More guidance about Bhagavata devotional book nashik news)
पुरुषोत्तम मासाच्या पवित्र काळात त्र्यंबकेश्वर येथील श्री स्वामी समर्थ गुरुपीठात श्रीमद्भागवत साप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. पारायणाच्या दुसऱ्या दिवशी उपस्थित सेवेकरी, भाविकांशी संवाद साधताना चंद्रकांतदादा यांनी वरील उद्गार काढले.
रविवारी संकल्प करून पितृतरपणाने या सप्ताहाचा प्रारंभ झाला. आज नारायण कवचोद्धार, तर मंगळवारी (ता. १) श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा होणार आहे. या पारायणकाळात अनेक आनंदी प्रसंग मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरे केले जातात.
बुधवारी (ता. २) गोवर्धनपूजन, गुरुवारी (ता. ३) श्रीकृष्ण-रुक्मिणी विवाह, शुक्रवारी (ता. ४) श्रीदत्त महाराज पादुकापूजन होईल आणि शनिवारी (ता. ५) सत्यनारायणपूजन, अपुपदानाने सप्ताहाची सांगता होईल. शनिवारी गुरुमाउली अण्णासाहेब मोरे स्वतः उपस्थित राहून पारायणात सहभागी सेवेकरी, भाविकांना मार्गदर्शन करतील.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
आज पारायणकर्त्या महिला व पुरुष सेवेकऱ्यांशी संवाद साधताना चंद्रकांतदादा म्हणाले, की ‘श्रीकृष्ण जन्म, गोकुळात आगमन, नंद वासुदेव भेट, पुतणामोक्ष, कृष्णाच्या खोड्या, बाललीला, सुदामा कथा अशा छोट्या छोट्या गोष्टींमुळे आपल्या जीवनातील आनंद द्विगुणित होतो, तर ज्ञान, कर्म, भक्ती, संसारबंधन, सदभक्ती अशा अवघड वाटणाऱ्या गोष्टींचा सहज उलगडा भागवतात केला आहे.’
रोज सकाळी आठला भूपाळी आरतीने गुरुपीठातील या सोहळ्यास सुरवात होते. साडेदहापर्यंत पुरुषोत्तमपूजन आणि भागवत वाचन करून साडेदहाला नैवेद्य आरती होते. पुन्हा बारापर्यंत वाचन करून तीनपर्यंत भोजन व विश्रांती, तीन ते पाच लिंगार्चन व अधिकमास सेवा आणि पाच ते साडेसहा निरूपण, साडेसहाला सायंकाळची आरती आणि त्यानंतर रात्री आठपर्यंत गीता पंधरावा अध्याय आणि विष्णुसहस्त्रनाम वाचन, अशी भरगच्च सेवा करण्याची पर्वणी सर्वांना लाभत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.