इंदिरानगर : तत्कालीन पोलिस आयुक्त विश्वास नागरे पाटील यांनी चार वर्षांपूर्वी प्रायोगिक तत्त्वावर इंदिरानगर भागातील सुरू केलेली अवजड वाहनांची वाहतूक आता कायमस्वरूपी झाल्याने नागरिकांत प्रचंड रोष निर्माण झाला आहे.
चार वर्षात ३९ अपघात झाले असून, काहींना तर जीव गमवावा लागला आहे. प्रशासनाने गंभीर दखल घेतली नाही तर कोणत्याही क्षणी तीव्र आंदोलनाचा सामना प्रशासनाला करावा लागेल, असे संकेत मिळत आहेत. (Citizens furious due to heavy traffic Preparations for agitation in Indiranagar area Nashik News)
यासाठी कृती समितीदेखील गठित करणे सुरू असून ठिकठिकाणी लक्षवेधी फलक लावण्यास सुरवात झाली आहे. प्रायोगिक तत्त्वावर सुरू केलेली अवजड वाहतूक आता जीवघेणी ठरत आहे. या भागातून अवजड वाहतुकीचे प्रमाण खूप वाढल्यामुळे मागील चार वर्षात भयावह अपघात झाले आहेत.
स्थानिक आमदार, माजी नगरसेवक, विविध राजकीय पक्ष, सामाजिक मंडळ, ज्येष्ठ नागरिक संघ सगळ्यांनी निवेदन दिले, उपोषण केले परंतु वाहतूक विभागाने आतापर्यंत या विषयावर लक्ष दिले नाही.
तात्पुरते पाहणी दौरे, आश्वासने, बैठकांचे सोपस्कार, वरिष्ठांना अहवाल देणे हे सोपस्कार पार पाडून नागरिकांची बोळवण करण्यात प्रशासनाने धन्यता मानली आहे. सर्वच आता आरपार लढाईसाठी एकवटले आहेत.
त्यासाठी सोशल मीडियाचा वापर केला जात आहे. या प्रश्नाची धग अपघाताच्या माहितीच्या रूपात नागरिकांच्या जिवावर कशी उठली आहे, याबाबत जनजागृती केली जात आहे. त्याला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.
या संदर्भात तयार केलेल्या काही व्हाट्सॲप ग्रुपमध्ये काही वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचा देखील समावेश आहे हे विशेष. आतापर्यंत सर्वच सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सामंजस्याची आणि चर्चेची तयारी ठेवली आहे.
मात्र प्रशासनातर्फे कोणताही ठोस निर्णय होत नसल्याने आता सगळ्यांच्याच सहनशीलतेची अंत झाला आहे.
"या प्रश्नावर अजूनही प्रशासन निर्णय घेईल, अशी आशा आहे. मात्र कोणताही प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे जीव वाचवण्यासाठी उग्र आंदोलनाशिवाय पर्याय नाही. त्यासाठी सोशल मीडियाद्वारे जनजागृती सुरू करण्यात आली आहे."- जय कोतवाल, राजकीय पदाधिकारी
"अनेक निवेदनांना प्रशासनाने केराची टोपली दाखवली आहे. या समस्येचे कुणालाही गांभीर्य नसावे, हेच दुर्दैव आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी रस्त्यावर उतरणे हा एकच पर्याय शिल्लक आहे."- ॲड. श्याम बडोदे, माजी नगरसेवक
"अवजड वाहनांच्या भीतीने त्या रस्त्याने जाणेच बंद केले आहे. मोठ्या आकाराची अवजड वाहने भरधाव वेगाने जाताना बघून जीव घाबरा होतो."- नाना बच्छाव, ज्येष्ठ नागरिक
"शाळा सुटण्याच्या आणि भरण्याच्या वेळी विद्यार्थ्यांची मोठी काळजी वाटते. मुख्य रस्त्यावरूनच ही वाहतूक असल्याने विद्यार्थी सुरक्षा लक्षात घेऊन ही वाहतूक बंद केली पाहिजे."
- नितीन पाटील, मुख्याध्यापक
"सायकलद्वारे मी शाळेत येतो. मात्र शाळेत पोचणे आणि घरी परत जाताना जोरात जाणाऱ्या वाहनांमुळे पडण्याची भीती वाटते. कडेने सायकल चालवावी लागते. या मोठ्या गाड्या या रस्त्यावर बंद झाल्या पाहिजे."- श्रेयस नागरे, विद्यार्थी
"या रस्त्याच्या आसपास भाजी बाजार आहेत. महिला सायंकाळी बाजारासाठी बाहेर येतात. त्यात ज्येष्ठ महिलादेखील असतात. या वाहनांच्या समस्येमुळे अक्षरशः जीव मुठीत धरून चालावे लागते. तातडीने ही वाहतूक बंद झाली नाही तर जनआंदोलनासाठी रस्त्यावर उतरण्याची तयारी आहे."- वैशाली दळवी, सामाजिक कार्यकर्ता
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.